पुणे पोलीस आयुक्तांची माहिती
पुणे : दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेला प्रवाशाला हेल्मेटसक्ती कारवाई (Helmet Rule) करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या आदेशापासून पुणेकरांना (Pune News) तुर्तास दिलासा मिळाला आहे. वाहतुकीबाबत शहरात कार्यरत असलेले विविध विभाग, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी अशा सर्वांची चर्चा करत, हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती केल्यानंतर जानेवारीमध्ये कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे पुणे पोलिसांनी (Pune Police) स्पष्ट केले आहे. (Helmet Mandatory Rule)
विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या अशा दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षकांना दिले होते. आत्तापर्यंत केवळ विना हेल्मेट असलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येत होती. आता मात्र सहप्रवाशावर देखील करवाई केली जाणार होती. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई-चलन मशिनमध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार काही ठिकाणी कारवाई देखील सुरू करण्यात आली. त्याला विविध स्तरातून विरोध होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे याबाबत समाजातील विविध घटकांशी आणि प्रशासकीय यंत्रणांशी चर्चाकरून जानेवारी महिन्यात कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
पुण्यात हेल्मेटसक्ती (Helmet Mandatory Rule) लागू करण्यात येवू नये, या मागणीसाठी आमदार हेमंत रासने यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असल्याने महामार्गांवरील दुचाकीस्वार व सहप्रवाशांसाठी हे आदेश काढण्यात आल्याचे यावेळी आयुक्तांनी त्यांना सांगितले. स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहनचालकांनी नियमित हेल्मेटचा वापर करावा, यासाठी आम्ही जनजागृती करण्यावर भर देणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.