Friday, May 9, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, नवनीत राणांनी बच्चू कडूंना डिवचलं

Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, नवनीत राणांनी बच्चू कडूंना डिवचलं

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातून चारवेळा निवडून आलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख, बच्चू कडू यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे बच्चू कडू यांचे कट्टर विरोधक रवी राणा (Ravi Rana) हे विजयी झाले असून राणा दाम्पत्यामुळे बच्चू कडू यांचा पराभव झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीचं चर्चा रंगली आहे. अमरावतीत बच्चू कडू यांच्या पराभवामागे राणा दाम्पत्य असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, मला पाडण्याची राणा दाम्पत्याची लायकी नाही, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला होता. याला माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर देताना कडू यांना डिवचलं आहे.



दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं


नवनीत राणा म्हणाल्या की, हे माझे श्रेय नाही आहे. या निवडणुकीत माझ्या जनतेने बदला घेतलाय. दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, असे म्हणत त्यांनी बच्चू कडूंना डिवचलं आहे. मी लहान आहे. पण, आता कसं वाटतं, तुमची औकात काढली. स्वतःच्या मतदारसंघात दिवे लावले नाही, दुसरीकडे काय लावणार? अशी घणाघाती टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याबाबत प्रश्न विचारले असता मी त्यांना शुभेच्छा द्यायला आली होती. अपेक्षित निकालापेक्षा जास्त निकाल आला आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार, असे मला वाटते. आम्ही देवेंद्रजींचे सैनिक आहोत, असं नवनीत राणा यांनी म्हटले.



मी पाच वर्षानंतर बच्चू कडू यांचे आव्हान स्वीकारेन...


बच्चू कडूंच्या टीकेवर रवी राणा म्हणाले, “आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही. त्यांना लोकांनी हटवलं आहे. ‘बच्चू कडू हटाव’ हा नारा लोकांनी दिला. त्यांनी म्हटलं होतं, ‘मी मुख्यमंत्री होईल.’ मात्र, त्यांनी आता बोलणं बंद करायला हवे. मी पाच वर्षानंतर बच्चू कडू यांचे आव्हान स्वीकारेन. ते सांगतील तिथे मी उभा राहीन. कडू कुणाच्या तरी पक्षात प्रवेश करतील. लोकसभेला त्यांनी मतांचे विभाजन केले. त्यामुळे जनतेने त्यांचा बदला घेतला.”


Comments
Add Comment