Friday, February 7, 2025

ज्ञान तोचि नारायण…

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

आज काही विज्ञाननिष्ठ लोक असे म्हणतात की, आम्ही परमेश्वराला मानत नाही. ते म्हणतात की, विज्ञान हाच आमचा देव व आम्ही अन्य कुठलेही देव मानत नाही. जीवनविद्या सुद्धा हेच सांगते की, विज्ञान हा देवच आहे.
तुम्ही म्हणाल कसे काय? सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेले आहे,
“तुका म्हणे ज्ञान तोचि नारायण, जाणती सज्ञान गुरुपुत्र”
किंवा
“तुका म्हणे ज्ञान विठ्ठलची पूर्ण, सर्व अणुरेणू वागवीत’’

भगवंताजवळ काय मागावे?

तुकाराम महाराजांनी ज्ञान हाच देव आहे असे सांगितलेले आहे. विज्ञान हे ज्ञान आहे म्हणून विज्ञान हासुद्धा देवच आहे. ज्ञान हाच देव, तर विज्ञान हा सुद्धा देव. किंबहुना कुठल्याही क्षेत्रातले ज्ञान हे देवच असते. स्वयंपाक करण्याचे ज्ञान हेही देवच आहे. देव देव कुणाला म्हणतात? जो देतो तो देव. आम्ही देवाची व्याख्या साधीसोपी केली. जीवनविद्येचे सगळे सोपे आहे. इतर लोक कठीण करून सांगतात. आम्ही काय सांगतो, ‘‘जो देतो तो देव”. ज्ञान आपल्याला सर्व देते. ज्ञान आपल्याला काय देते असे तुम्ही विचारलेत, तर ज्ञान काय देत नाही ते सांगा असे आम्ही तुम्हाला विचारू. आज निरनिराळे शोध लागले ते ज्ञानामुळेच. स्वयंपाकाच्या निरनिराळ्या रेसिपीजमुळे आपण मस्त जेवतो की नाही? नाही तर रोज तोच भात, तीच आमटी, तीच पोळी, तीच भाजी तर नवरा म्हणणार चला आपण हॉटेलमध्ये जावूया. तो घरी जेवणारच नाही. पाककलेचे ज्ञान ज्यांनी घेतलेले आहे त्यांचे जेवण किती सुंदर होईल. खावे तर आमच्या बायकोच्या हातचे खावे. आम्ही कधीच हॉटेलमध्ये जात नाही. तिच्या हातचेच जेवतो कारण तिच्या हातचा स्वयंपाक सुंदर होतो, चविष्ट असतो. आता हे ज्ञानच आहे की नाही. स्वयंपाकाचे ज्ञान नाही ती बाई काय करेल? चिमूटभर मीठ टाकण्याऐवजी मूठभर मीठ टाकेल. कारण ज्ञानच नाही. स्वयंपाकाचे ज्ञान असो नाही तर इन्स्ट्रुमेंटचे ज्ञान असो प्रत्येक क्षेत्रात ज्ञान असते. ऑर्थोपेडिक इन्स्ट्रुमेंटचे ज्ञान असलेले लोक पाय अधू झालेल्यांना पाय देतात, हात अधू झालेल्यांना हात देतात.

प्रत्येक क्षेत्रांत निरनिराळे शोध लागतात ते ज्ञानामुळे लागतात. विज्ञानाने शोध लावले म्हणजे ते ज्ञानामुळे लावले. सर्व शोधांचा संबंध ज्ञानाशी आहे, विज्ञानाशी आहे. दुःखाचा संबंध अज्ञानाशी आहे. अज्ञान, ज्ञान, विज्ञान यांचा जर विचार केला तर दुःख कधी होते? अज्ञानामुळे दुःख होते, तर ज्ञानामुळे सुख होते. विज्ञान हे सुद्धा ज्ञान आहे पण या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा तुम्हीच ठरवले पाहिजे. विज्ञानाने जे निरनिराळे शोध लावले ते ज्ञानाच्या पोटी लावले पण या ज्ञानाचा उपयोग माणसाच्या विनाशासाठीसुद्धा केला जातो. पूर्वीच्या काळी तलवारीने फार तर दहा-बारा लोक मारले जायचे, पण आज ती ए. के. ४६ बंदूक घेतात आणि असे फिरवतात की, एका वेळेला अनेक लोक मारले जातात. मागच्या वर्षी ताजमहाल हॉटेलमध्ये त्या लोकांनी काय केले हे तुम्ही पाहिले असेलच. आता हा बंदुकीचा शोध कुणी लावला? ज्ञानानेच लावला म्हणून ज्ञान हा देव आहे तसा दैत्यही आहे हे पहिले लक्षात ठेवले पाहिजे. ज्ञानाचा उपयोग तुम्ही कसा करता? तलवार ही चांगली आहे व वाईटही आहे. तलवार ही स्वसंरक्षणासाठी चांगली आहे तशी ती इतरांना मारत सुटलात, तर जो तुमच्या कक्षेत येईल तो मरेल. विस्तव हा चांगला की वाईट हे तुझ्या हातात आहे. विस्तवावर स्वयंपाक करायचा की, कुणाच्या घरावर ठेवायचा हे तुझ्या हातात आहे, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -