Saturday, February 8, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीभगवंताजवळ काय मागावे?

भगवंताजवळ काय मागावे?

अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

कल्पना म्हणजे मायेचे हत्यार. कल्पनारहित थोडे नामदेखील फळ देईल. एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला आणि त्याला ‘तुम्ही कुठले?’ असे विचारले, तर तो आपल्या खेडेगावाचे नाव सांगेल. जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तो तालुक्याचे नाव सांगेल, इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल तसेच दुसऱ्या प्रांतात गेला तर आपल्या इलाख्याचे नाव सांगेल आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचे नाव सांगेल. म्हणजे, मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात. तसे मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्मांचे मूळ एकच असल्यामुळे, त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सारखेच. पण एवढी विशाल दृष्टी येईपर्यंत, जो ज्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचे आचरण करणे हेच हिताचे असते.

सुख मिळविण्याच्या आपल्या सर्व कल्पना आज खोट्या ठरल्या आहेत. आपण प्रथम अशी कल्पना केली की, श्रीमंतीमध्ये सुख आहे. त्याप्रमाणे रग्गड पैसा मिळविला तरी आपल्याला जर सुख मिळाले नाही, तर आपली कल्पना खोटी होती असे म्हणायला काय हरकत आहे? एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुसऱ्याला दु:खरूप वाटते; म्हणजे ती वस्तू मुळात दोन्ही नाही, सुखरूप नाही किंवा दु:खरूपही नाही. जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते, ती उद्या तशी वाटेलच असे नाही. आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही, म्हणून त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पनादेखील खोटीच असली पाहिजे; ती तेवढी खरी आहे असे आपण का म्हणावे? जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो. ती नाही म्हणायला किंवा विसरायला आपणच तयार होतो. आपल्यावर संकट आले की, आपल्याला पूर्वीच्या गोष्टी, नाती वगैरे गोड लागत नाहीत. त्या वेळी आपल्याला चैन पडत नाही. हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे.

एका काट्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोन्ही टाकून द्यावे, त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्यात. कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करू या, भगवंत हा दाता आहे. त्राता आहे. सुख देणारा आहे, अशी कल्पना आपण करू या. त्यात खरे हित आहे आणि त्यानेच संसार खरा सुखाचा होईल. कल्पनेचे खरेखोटेपण हे अनुभवांती कळते, म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे. अशा रीतीने कल्पना थांबल्यावर आणि वृत्ती स्थिर झाल्यावर तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे. “अमुक एक वस्तू मजपाशी आहे म्हणून मी सुखी आहे,” या वृत्तीमध्ये राम नसून, काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे आणि वृत्ती भगवंतापाशी स्थिर झाली पाहिजे. हेच परमार्थाचे खरे मर्म आहे.

तात्पर्य : कल्पना? म्हणजे मायेचे हत्यार. कल्पनारहित थोडे नामही फळ देईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -