Tuesday, January 21, 2025

आनंदी अमृतपान

ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

अमृताने भरलेल्या अवीट गोडीचा ग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’! त्याचा समारोप होतो, त्यावेळी ज्ञानदेव या ग्रंथाचे अलौकिक स्वरूप सांगतात. अर्थात या मागे श्रीनिवृत्तीनाथांची कृपा हे ते आवर्जून नमूद करतात. या ‘ज्ञानेश्वरी’च्या रचनेसाठी त्यांनी ‘ओवी’ हा प्रकार निवडला. त्याचे वर्णन ऐकूया त्यांच्याच शब्दांत…

सुरेख संगम…

‘अथवा वसंत ऋतूतील वाटोळी मोगऱ्याची फुले जशी गुंफून गजरा केला अथवा मोकळी घेतली तरी त्यांच्या वासात कमीपणा नसतो,’ ओवी क्र. १७३९

‘तसा गाणारा भेटला तरी त्याला शोभा देतो, आणि गाणारा नसला तरी त्याचे तेज पडते. असा सर्व लाभदायक ओवीप्रबंधाने मी हा ग्रंथ केला आहे.’ ओवी क्र. १७४०

या ग्रंथात आबालवृद्धांस समजण्याजोग्या ओवीच्या प्रबंधाने सर्व ब्रह्मरसाने भरलेल्या अशा अक्षरांची योजना केली आहे.’ ओवी क्र. १७४१

ही ओवी अशी –
ना ना गुंफिलीं कां मोकळीं। उणीं न होती परिमळीं।
वसंतागमींची वाटोळीं। मोगरीं जैसीं॥
मोगऱ्याची फुले आपण सर्वांनी पाहिली आहेत. कशी असतात ती? सुंदर. त्यांना एक खास गोलाई असते. ही गोलाई ज्ञानदेवांनी ओवींमधील शब्दांतही आणली आहे. ही त्यांची प्रतिभा! त्यासाठी त्यांनी ‘ळी’ या अक्षराची पुन्हा पुन्हा योजना केली आहे. ‘ळ’ या अक्षरात गोलपण आहे. पण ‘ळी’ केले की, त्यात वेलांटीमुळे ते अधिकच वाढते. ‘ळी’ या अक्षरात मोगऱ्याचे फूल दिसते दृष्टीला! अर्थाचा विचार आपण करूच, पण केवळ शब्दांचा विचार केला तरी यातील नजाकत जाणवते. आता पाहा याचा अर्थही किती साजेसा! ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथासाठी योजलेला आहे ‘ओवी’ हा रचनाप्रकार. तो कशाप्रमाणे आहे? तर जणू मोगऱ्याच्या फुलांप्रमाणे. मोकळी किंवा गुंफलेली कशीही असोत, ती सुगंध देणार. त्याप्रमाणे ‘ओवी’ हा रचनाबंध आहे. ज्याला गाता येते, त्याने या ओव्या गाव्या, त्यातील आनंद घ्यावा. ज्याला गाता येत नाही त्यानेदेखील याचा आनंद घ्यावा, कारण यात नादमयता असते. पुढे ज्ञानदेवांनी या ग्रंथाचा अजून एक विशेष सांगितला आहे की, तो लहांनापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना समजण्यासारखा आहे. त्यातील अक्षरे तर ब्रह्मरसाने भरलेली आहेत.

हे सांगण्याचे कारण म्हणजे हा ग्रंथ ज्यावर आधारित आहे, ती ‘गीता’ अशी अवीट गोडीची आहे; परंतु ती संस्कृतमध्ये असल्याने समाजातील ठरावीक वर्गापुरती होती. म्हणून सर्व समाजासाठी निवृत्तीनाथांच्या आज्ञेने मराठीत ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’ची निर्मिती केली. त्यामुळे ती सगळ्यांना समजण्याजोगी झाली. त्यात ज्ञानदेवांनी त्यासाठी ‘ओवी’ हा रचनाप्रकार निवडला. हा प्रकार ऐकायला गोड, कळायला सोपा, सुटसुटीत आहे. मोगऱ्याच्या एकेका मोकळ्या फुलात जी सुंदरता, सुगंध आहे, तशी यातील एकेका शब्दांत सुंदरता आहे, अर्थाचा सुगंध आहे. सुगंधी फुलात मध असतो, तर ज्ञानेश्वरीतील अक्षरांत ब्रह्मज्ञानाचा मध आहे. मग अशा अवीट ग्रंथाचा आनंद आपण सगळ्यांनी का घेऊ नये? तर चला, करूया सुरुवात या अमृतपानाला!

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -