ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
दृष्टी ही एकच असून ज्याप्रमाणे पापण्यांच्या केसांमुळे चंवरीच्या केसाप्रमाणे चिरल्यासारखी दिसते.’ ओवी क्र.३२७
‘अथवा घरात असलेला एकच दिवा झरोक्यातून पाहिला असता जसे त्याचे पुष्कळ दिवे दिसतात.’ ओवी क्र. ३२८
‘किंवा एकच पुरुष शृंगार, वीर, करुण इत्यादी नवरसांचे आविर्भाव दाखवू लागला म्हणजे तो जसा नऊ प्रकारचा वाटू लागतो.’
‘कां एकुचि पुरुषु जैसा। अनुसरत नवा रसां॥
नवविधु ऐसा । आवडों लागे॥’ ओवी क्र. ३२९
हे सूचक, सुंदर दाखले देऊन ज्ञानदेव काय सांगतात? ते म्हणतात, ‘तसे बुद्धीचे एकच ज्ञान असून ते नेत्र आदी इंद्रियांच्या निराळेपणाने बाहेर येऊ लागते. ओवी क्र. ३३०
आता पाहा, अठराव्या अध्यायात एक विषय सुरू आहे. तो आहे-कर्म घडण्याची कारणं कोणती? यातील एक कारण सांगितलं आहे इंद्रियं. डोळे, नाक, कान इ. विविध इंद्रियांकडून जगाचा अनुभव घेतला जातो. पण या सगळ्यामागे असणारी बुद्धी एकच आहे. हा विचार स्पष्ट करताना माऊली वरील दृष्टान्त देतात. ते पाहूया आता.
पहिला दृष्टान्त दृष्टीचा दिला आहे. किती सूचक, तरल आहे हा! आपण शांतपणे बसलो, भोवताली पाहू लागलो की काय होतं? बारीक अशा पापण्यांच्या केसांमुळे दृष्टी चिरली असं वाटू लागतं. किती सूक्ष्म निरीक्षण आहे यात! इथे दृष्टीची उपमा बुद्धीला दिली आहे. दृष्टी एक आहे, पण पापण्यांमुळे ती विलग वाटते. त्याप्रमाणे बुद्धी एक आहे, पण अनेक इंद्रियांमुळे ती वेगळी वाटते. पापण्या हलणाऱ्या आहेत त्याप्रमाणे इंद्रियं चंचल आहेत, हेच यातून सुचवलं आहे.
यानंतरचा दृष्टान्त किती चित्रमय! घरात असलेला एक दिवा. त्यासारखी आहे जीवांची बुद्धी, जिच्या ठिकाणी मनातील अंधार दूर करण्याइतकं तेज आहे. पण झरोक्यांतून पाहिलं असता अनेक दिव्यांचा भास होतो. याचप्रमाणे एकच बुद्धी कान, नाक इ. इंद्रियांमुळे वेगवेगळी भासते. म्हणून ही इंद्रियं म्हणजे भासमान दिवे होत. यानंतरचा दृष्टान्त हा सोपासा, खास सांसारिक जनांसाठी दिलेला आहे. पुरुष एकच, पण त्याच्या ठिकाणी शांत, शृंगार, करूण अशा विविध भावना, आविर्भाव निर्माण होतात. त्यामुळे तो वेगवेगळा वाटतो. तशी बुद्धीही एक आहे, परंतु भिन्न इंद्रियांनुसार ती भिन्न वाटते. जसे की, डोळ्यांनी पाहणारी, कानाने ऐकणारी इ.
या सर्व अप्रतिम दाखल्यांतून प्रकटते ज्ञानदेवांची प्रज्ञा आणि प्रतिभा! अपार बुद्धिसामर्थ्याने त्यांनी गीतेतील तत्त्व सामान्यांसाठी उलगडलं. ते करताना आपल्या प्रतिभेने श्रोत्यांसमोर साकारल्या सुंदर प्रतिमा! या प्रतिमाही सर्व प्रकारच्या, जसं की इथे येणारी दृष्टी व पापण्या, दिवा आणि भासमान दिवे, पुरुष व भावना होय. या दृष्टान्तात विविधताही किती आहे! सहजताही केवढी! दृष्टी आणि पापण्यांचे केस हा तरल दाखला, तर दिवा आणि झरोक्यातील भासमान दिवे हा चित्रमय आणि पुरुष व विविध भावना हा किती सहज सोपा दृष्टान्त! यामुळे ज्ञानेश्वरी अनुभवताना त्यातील तत्त्वज्ञानाचा आपल्यावर संस्कार होऊ लागतो, त्याचवेळी त्यातील सांगण्याच्या सुंदर पद्धतीमुळे आपल्यातून रसिकतेचा झंकार उमटू लागतो. याचं कारण ज्ञानेश्वरी आहे तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा सुरेख संगम!