पाच लाख साधू तर पाच कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज
नाशिक : विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) संपताच कुंभमेळा (Nashik Kumbhmela) नियोजनाला गती मिळाली आहे. कुंभमेळ्यात पाच लाख साधु-महंत तसेच पाच कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने एकूण सहा हजार ९०० कोटींचा अंतिम आराखडा जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केला. यात साधुग्राममध्ये तीन जलकुंभ व शहरात नऊ उड्डाणपूल प्रस्तावित केले आहेत. नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे, त्यासाठी आतापासून तयारी सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी दर मंगळवारी महापालिकेचा आढावा घेणार आहेत. त्यानुसार पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. महापालिका आयुक्त अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
Malegaon News : मालेगाव शहरातील स्टॅम्प वेंडरकडून जनतेची व शासनाची शेकडो कोटींची फसवणूक
२०२७ च्या कुंभमेळ्यासाठी देशविदेशातील पाच कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तविली जाते. साधू, महंत, आखाडे, भाविकांची संख्या विचारात घेता आराखड्यात रिंग रोड, नवीन रस्ते, प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती, वाहनतळ, तात्पुरती निवारागृहे, साधुग्राम आदी कामांचा समावेश आहे. रिंग रोडला २० मिसिंग लिंक जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेने रिंग रोडच्या मिसिंग लिंकच्या भूसंपादनासह सुमारे १७ हजार कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला होता.
आराखड्याला लावली कात्री
कुंभमेळ्याचा आराखडा तयार करताना महापालिकेने साधुग्रामच्या भूसंपादनासह इतर बाबींचा समावेश करून एकूण १७ हजार कोटींचा प्रारूप आराखडा सादर केला; परंतु भूसंपादन ही महापालिकेची जबाबदारी असल्याने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्याला ११ हजार कोटींची कात्री लावल्याने हा आराखडा आता सहा हजार ९०० कोटींपर्यंत कमी झाला आहे.
२०२७ चे असे असेल नियोजन
साधुग्रामसाठी ५०० एकर जागा आरक्षित करत तीन हजार प्लॉटचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे तीन आखाडे, एक हजार १०० खालसे यातील पाच लाख साधूंची व्यवस्था या ठिकाणी करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक पर्वणीला ८० लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून पाच कोटी भाविकांचा अंदाज गृहीत धरण्यात आला आहे. येणाऱ्या भाविकांसाठी १५ हजार फिरती शौचालये, नऊ नवीन उड्डाणपूल, पाच हजार दिशादर्शक कमानी, शहरात प्रवेश करताना स्वागत कमानी, ३५० किलोमीटर अंतर्गत रस्तेविकास, ६० किलोमीटर बॅरिकेडिंग तसेच सेक्टर ऑफिसर, रेशन दुकाने, दूध वितरण व्यवस्था, एटीएम, बस वाहतूक आदी नियोजन करण्यात येत आहे.