नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील भारत मंडपमच्या भव्य सभागृहात नॅफस्कॉबच्या रजत जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या देखण्या कार्यक्रमात देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या राज्य सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका आणि विविध कार्यकारी संस्थांमधून उत्कृष्ट कामगिरी करणा-या संस्थांना देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी व्यासपिठावर सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व कृष्णपाल गुजर, एन.सी.यु.आयचे अध्यक्ष दिलीप संघानी, नॅफस्कॉबचे अध्यक्ष रविंद्रन राव आणि केंद्रीय सहकार खात्याचे मुख्य सचिव आशिषकुमार भुतानी हजर होते.
राज्य सहकारी बँकांच्या प्रवर्गात महाराष्ट्र राज्याची शिखर बँक असलेल्या दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल अमित शहा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राज्य बँकेच्यावतीने मा.प्रशासक विद्याधर अनास्कर व व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी अमित शाह यांच्या हस्ते सन्मान चिन्ह स्वीकारले.
Nashik Kumbhmela : त्र्यंबकेश्वरचा २०२७ मधील कुंभमेळ्याचा आराखडा तयार!
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक ही संपूर्ण भारतात सर्वात जास्त ऊलाढाल, नेटवर्थ व निव्वळ नफा कमाविणारी राज्य सहकारी बँक आहे. दिनांक ३१ मार्च २०२४ अखेर राज्य बँकेची ऊलाढाल रु.७,२६५ कोटी, स्व-निधी रु.७,१२१ कोटी, नक्त नफा रु.६१५ कोटी, नेटवर्थ रु.४,६१८ कोटी इतके आहे.
राज्य सहकारी बँकेने भांडवल पर्याप्तता व इतर सर्वच आर्थिक आघाड्यांवर रिझर्व्ह बँकेचे आदर्श प्रमाण व राष्ट्रीय सरासरी मानांकनापेक्षा सरस कामगिरी केली आहे.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सहकारी आर्थिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी `सहकारांतर्गत सहकार’ हे सहकाराचे मुलभूत तत्व राबविण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. तसेच सहकाराच्या या तत्वानुसार सर्व प्राथमिक सहकारी संस्थांनी आपल्या ठेवी संबंधित जिल्हा बँकांमध्ये व सर्व जिल्हा बँकांनी आपल्या ठेवी संबंधित राज्याच्या शिखर बँकेतच ठेवण्याचे आवाहन केले. या संदर्भात गुजरातमधील दोन जिल्हयांचे उदाहरण देताना या तत्वाचे पालन केल्याने तेथील जिल्हा व राज्य बँकेच्या ठेवींमध्ये २० टक्केची वाढ झाल्याचे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले व सर्वांनी गुजरातमधील या संबंधित बँकांना भेट देण्याचे निमंत्रण दिले.