मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. या घवघवीत यशानंतर दरदरुन घाम फुटलेल्या मौलाना सज्जाद नोमानी यांनी ‘व्होट जिहाद’बाबत केलेल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. कोणत्याही समाजाला दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असे त्यांनी आता स्पष्ट केले आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने २३५ जागा मिळवल्य़ाने आता सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. एकट्या भाजपाने एकूण १३२ जागा जिंकल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहिण योजना, व्होट जिहाद आणि मराठा आरक्षण असे अनेक मुद्दे गाजले. त्यातील एक व्होट जिहादचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. मौलाना सज्जाद नोमानी यांनी भाजपाला पाठिंबा देणा-या मुस्लिमांची खिल्ली उडवली आणि स्वत:चे नाव धनश्याम ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नोमानी यांनी बिनशर्त जाहीर माफी मागितली आहे. त्यांचा हेतू कोणत्याही विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याचा किंवा फतवा काढण्याचा नव्हता, असे त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मौलाना सज्जाद नोमानी यांनी निवडणुकीदरम्यान वादग्रस्त फतवा काढला होता. राज्यातील भाजपाला पाठिंबा देणा-या मुस्लिमांना इस्लामच्या कक्षेबाहेर फेकून दिले पाहिजे. तसेच त्यादरम्यान त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी भाजपाला पाठिंबा देणा-या मुस्लिमांची खिल्ली उडवली. तसेच ज्या मुसलमानांनी भाजपाला पाठिंबा दिला त्यांनी आपले नाव बदलून धनश्याम करा, असा टोला लगावला होता.
मात्र निवडणुकीच्या निकालानंतर नोमानी यांचे एक पत्र समोर आले आहे. ज्यामध्ये त्यांनी त्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत लोकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवलेल्या लोकांसाठी ते वक्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपले शब्द त्या व्यक्तींसाठी आहेत, व्यापक मुस्लिम समाजासाठी नाहीत, असेही ते म्हणाले आहेत. तसेच माझे हे विधान महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीचे आहे. माझा कोणत्याही समाजावर टिप्पणी करण्याचा हेतू नव्हता, तसेच आम्ही फतवाही काढला नव्हता, असे म्हणत नोमानी यांनी आपल्या पत्रात बिनशर्त माफी मागितली आहे.