मुंबई : नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीत दाखल होणार आहेत. यावेळी सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याशिवाय मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु झाले असून सध्या काही नावांची चर्चा आहे, मात्र त्यावर कुठलेही अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असे जाहीर सभेत अमित शाह यांनी बोलून देखिल दाखवले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे. याशिवाय अनेक आमदारांनीही फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे दिल्ली दरबारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे सांगितले जात आहे.
Western Railway: पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या ८३ रेल्वेगाड्यांच्या थांब्यात मोठे बदल
नव्या फॉर्म्युलानुसार एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सरकारमध्ये असतील. नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भाजपाचे सर्वाधिक मंत्री असणार असून अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला समसमान मंत्रिपदं देण्यात येतील, अशी माहिती समोर येत आहे.
मंत्रीमंडळातील संभाव्य यादी…
भाजपात जुन्यांसोबत नव्यांनाही संधी मिळणार
राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, संभाजी पाटील निलंगेकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड अशा ११ जणांची नावे सध्या समोर आली आहेत.
शिवसेना
शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची देखील नावे समोर आली आहेत. यात एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे या ११ जणांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी
अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांचीही यादी आली असून यात अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे या १३ जणांचा समावेश आहे.