राज्य विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) या तीन पक्षांच्या महायुतीने देदीप्यमान विजय संपादन केला. विधानसभेच्या २८८ पैकी २३० पेक्षा जास्त जागांवर विजय संपादन करून विधिमंडळाच्या इतिहासात एक नवा विक्रम निर्माण केला. भारतीय जनता पक्षाने, तर २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून आणून एक इतिहास निर्माण केला. गद्दारांना पाडा, अदानींना हटवा अशा घोषणांचा घोशा लावणाऱ्यांना आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला विरोध करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शब्दात सांगायचे तर सावत्र भावांना बहिणींनी या निवडणुकीत जोडा दाखवला.
यंदाची विधानसभेची निवडणूक महायुती व महाआघाडीच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची होती. राज्यात गेल्या पाच वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असे अडीच वर्षे महाआघाडीचे सरकार होते आणि नंतर शिवसेना व राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजितदादा) या पक्षांचे महायुतीचे सरकार जनतेने अडीच वर्षे अनुभवले. महायुतीचे सरकार चांगले होते की महाआघाडीचे असा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत होता. मतदारांनी महायुतीवर महाविश्वास प्रकट केला, तर महाआघाडीवर अविश्वास दाखवला. असे का झाले, याचे आत्मचिंतन महाआघाडीच्या तिनही पक्षांनी केले पाहिजे. केवळ नकारात्मक भूमिका घेऊन राजकारण करणे अंगलट येते तसेच दुसऱ्याला सतत गद्दार म्हणताना आपण खूप प्रामाणिक आहोत असा आव आणणे हेही जनतेला पसंत पडलेले नाही. माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी या निवडणुकीत कमाल केली. सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे राणेच हे निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेनेच सिद्ध करून दाखवले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा सर्वाधिक विश्वास नारायण राणे व त्यांच्या परिवारावर आहे हे निकालानंतर स्पष्ट झाले. कुडाळमधून निलेश राणे, कणकवलीतून नितेश राणे आणि सावंतवाडीतून दीपक केसरकर निवडून आले. संपूर्ण जिल्ह्याने महायुतीला भरभरून मतदान केले.
सन २०१४ मध्ये वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता, त्या पराभवाचे उट्टे निलेश राणे यांनी यावेळच्या निवडणुकीत काढले. आपल्या हिंदुत्वाला मतदारांनी पसंती दिली, हिंदुत्व हे सर्वमान्य आहे हेच निकालाने दाखवून दिले अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली, तर शिवसेना खरी कोणाची याचे उत्तर जनतेने मतदानातून दिले असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात मिळून विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत, पैकी सात मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयी मिरवणुका निघाल्या. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जात असे. त्याच बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा सेनेला सर्वत्र पराभव पत्करावा लागला आहे. कोकणातील जनतेने उबाठा सेनेला या निवडणुकीतून हद्दपार केले आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून प्रचंड विजय मिळवला. उबाठा सेनेला धूळ चारली. आता राणे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत महायुतीने उबाठा सेनेचा धुव्वा उडवला. राज्यात जिथे-जिथे खोटे नाटे आरोप करून, बनावट कथानके रचून आणि पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना गद्दार असे संबोधून त्यांना पाडण्याचे आवाहन उबाठा सेनेने केले, तेथे उबाठा सेनेलाच फटका बसला. हिंदुत्वाचा त्याग करून उद्धव ठाकरे यांनी महाआघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद मिळवले ते लोकांना पसंत नव्हते. निवडणुका भाजपाबरोबर युती करून लढवायच्या व नंतर काँग्रेसबरोबर आघाडी करून सरकार स्थापन करायचे हा डबल गेम महाराष्ट्रातील जनतेला आवडला नव्हता.
२०१९ मध्ये जनतेने ठाकरे यांच्या पक्षाला काँग्रेसच्या विरोधात मतदान केले होते, पण निकालानंतर त्यांनी काँग्रेसशी केलेला घरोबा जनतेला पसंत पडला नाही. त्याची शिक्षा विधानसभा निवडणुकीत मतदारांनी उबाठा सेनेला दिली. दारुण पराभव झाल्यानंतर ईव्हिएम मशीनवर संशय घेणे आणि ईव्हिएम मशीन्स मॅनेज केली असे सांगणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असे म्हणावे लागेल. राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी या केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर चार लाखांचे मताधिक्य घेऊन निवडून आल्या. उबाठा सेनेचे भांडुपच्या प्रवक्त्यांचे बंधु हे विक्रोळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले, पक्ष प्रमुखांच्या परिवारातील एक जण वरळीतून व दुसरा वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडून आला, झारखंडमध्ये तर झारखंड मुक्ती मोर्चा पुन्हा सत्तेवर आला, जेलमध्ये राहिलेले मुख्यमंत्री हेमंत सोरेनसुद्धा पुन्हा निवडून आले. जिथे महाआघाडी किंवा इंडियाचे आमदार निवडून आले तिथे मात्र ईव्हिएम मशीन्स एकदम व्यवस्थित होती आणि पराभव झाला तिथे गडबड होती असे दुटप्पी बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? आपण निवडून आलो तर जनादेश मिळाला म्हणून सांगायचे, पराभूत झालो तर ईव्हिएम मशीन्समधे गडबड केली असा आरोप करायचा, हा खोटारडेपणा झाला. इंदिरा गांधींच्या काळातही काँग्रेस पक्षाला १९७१ च्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळाल्यावर हा विजय बाईचा नाही, गाईचा नाही, तर शाईचा आहे असा आरोप झाला होता. तेव्हा तर निवडणुकीत मतपत्रिका होत्या.
पराभूत झाल्यावर निवडणूक यंत्रणा व व्यवस्थेवर खापर फोडायचे व आपल्या दुर्बलतेला झाकायचे त्यातलाच हा प्रकार आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला निकाल खुल्या मनाने स्वीकारावा आणि भाजपाने जे भव्य दिव्य यश संपादन केले त्याबद्दल देवाभाऊंचे अभिनंदन करावे असा दिलदारपणा महाआघाडीकडे नाही, हेच दिसून आले. जनतेने आपल्याला नाकारले आहे, हे महाआघाडीने मान्य केले पाहिजे व महायुतीच्या नव्या सरकारला राज्याच्या विकासासाठी साथ देण्याची तयारी दर्शवली पाहिजे.