Saturday, February 8, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलमांजरीला सापडलं दप्तर!

मांजरीला सापडलं दप्तर!

कथा – रमेश तांबे

एक होती मांजर. सगळ्यांची आवडती. सगळे तिला मनी म्हणायचे. एकदा हीच मनी रस्त्याच्या कडेकडेने फिरत होती. फिरता फिरता तिला दिसले एक दप्तर. रस्त्याच्या कडेला पडलेले. मग तिने ते दप्तर उचलून अडकवले पाठीवर आणि निघाली ठुमकत ठुमकत. चालता चालता तिला भेटली तिची मैत्रीण. मैत्रीण म्हणाली,

मने मने ऐक ना जरा
पाठीवर तुझ्या आहे तरी काय
छोट्या मुलांचं दिसतंय दप्तर
त्याचा तुला उपयोग नाय!
तशी मनी तोऱ्यातच म्हणाली,
पाठीवर माझ्या आहे दप्तर
पुस्तकं आहेत त्यात सत्तर.
शाळेत जाणार, अभ्यास करणार
रोज देणार पटापट उत्तर!

जांभई कशी येते?

मग नाक मुरडत मुरडत मनी पुढे निघाली. चालता चालता तिला दिसला एक कुत्रा. मनीच्या पाठीवरचे ओझे बघून कुत्र्याला तर हसायलाच आले. तो हसत हसतच मनीला म्हणाला,
मने मने खरंच सांग
कोणी केली शिक्षा तुला
पाठीवर ओझं घेऊन फिरतेस
पाठदुखी होईल तुला!
कुत्र्याचे बोलणे ऐकून मनी खो-खो हसू लागली आणि त्याला म्हणाली,
अरे पाठीवर माझ्या आहे दप्तर
पुस्तकं आहेत त्यात सत्तर.
शाळेत जाणार, अभ्यास करणार
रोज देणार पटापट उत्तर!

पण कुत्र्याला मनीचे बोलणे काही कळलेच नाही. तो तर डोके खाजवत खाजवत निघून गेला. मनी मात्र आपल्या धुंदीत. कधी चालत, कधी उड्या मारत. पाठीवरचे दप्तर रुबाबात मिरवत चालली होती. तेवढ्यात मनीच्या समोर आली एक खारूताई! डोळ्यांत पाणी आणून ती मनीला म्हणाली,
मने मने अगं वाईट झालं
पाठीला तुझ्या टेंगूळ आलं
डाॅक्टरकडे जाऊन औषध घे
उगाच रस्त्यावर नको फिरू!

खारुताईचे बोलणे ऐकून मनीला हसावे की, रडावे तेच कळत नव्हते. मग मनी खारुताईला म्हणाली,
अगं पाठीवर माझ्या आहे दप्तर.
पुस्तकं आहेत त्यात सत्तर.
शाळेत जाणार, अभ्यास करणार
रोज देणार पटापट उत्तर!
मनीचे उत्तर ऐकून खारुताईला वाटले मनीला वेडच लागले. असे म्हणून ती गेली सरसर झाडावर चढून. मग मनी निघाली पाठीवरचे दप्तर मिरवत, इकडे
तिकडे बघत…

तेवढ्यात दोन पिटुकले उंदीर तिच्यासमोर उभे ठाकले. मनीला बघून दोघे एकदम म्हणाले,
एका मुलाचं दप्तर हरवलंय
ते रस्त्याच्या कडेने रडत चाललंय
दे ते दप्तर आमच्याकडे
देऊन येतो आम्ही पटकन!
तशी मनी त्यांना घुश्यातच म्हणाली,
मला तुम्ही फसवू नका.
माझ्या दप्तरावर तुमचा डोळा.
राग माझा वाढत चाललाय,
तुम्ही दोघे इथून पळा!

मनीचे लाल लाल डोळे बघून दोघांनी जोराची धूम ठोकली आणि दिसेनासे झाले. इकडे मनी निघाली ठुमकत ठुमकत. चालता चालता तिला दिसली शाळा. शाळेच्या पायरीवर एक मुलगा रडत बसला होता. मनी त्याच्याजवळ गेली आणि त्याला म्हणाली,
अरेरे पोरा बाहेर का बसलास,
घरचा अभ्यास नाही का केलास,
का वर्गात करून भांडणतंटा,
शिक्षा भोगायला बाहेर आलास?
मनीचे बोलणे ऐकून तो मुलगा मनीकडे न बघताच म्हणाला,
मने मने काय सांगू तुला
रस्त्यात माझं दप्तर हरवलंय
शोध शोध सगळीकडे शोधलं
दप्तर नाही म्हणून सरांनी मारलं

मनीला त्या मुलाची दया आली. तिने लगेच आपल्या पाठीवरचे दप्तर त्याला दिले आणि म्हणाली हेच ना तुझे दप्तर! घे आणि जा वर्गात. दप्तर पाहून मुलाला खूप आनंद झाला. ते दप्तर हातात घेऊन तो पटकन वर्गात शिरला आणि मनी आनंदाने म्याँव म्याँव करीत तेथून गेली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -