क्राइम – अॅड. रिया करंजकर
लग्न म्हणजे आज-काल लॉटरी सारखं झालं आहे. लागली तर लागली नाहीतर नाही. टिकणारे लग्न म्हणजे एखाद्या लॉटरी लागण्यासारखंच आहे. आजकालची लग्न टिकण्यापेक्षा मोडतच चाललेली आहेत.
शामलाने अनिलसोबत लग्न करताना कुठलाही विचार न करता त्याच्यावर विश्वास ठेवून लग्न केले. सुशिक्षित आणि नोकरदार मुलगी जेव्हा एका चालू मुलाच्या प्रेमात पडते आणि स्वतःचे आयुष्य बरबाद करते तसे शामलाचे झाले होते. अनिल हा शामलाच्या मैत्रिणीचा भाऊ होता. तो आपल्या मैत्रिणीला चांगले ओळखत होता. शामलाला वाटले तिचा भाऊही चांगला असेल. पण खरं तर शामलाच्या मैत्रिणीने आपल्या भावाची खरी माहिती दिली नसून तिने आपल्या मैत्रिणीची फसवणूक केली होती. तो इंजिनियर आहे असे तिला सांगण्यात आले. तिने घरच्यांचे मन वळवून या लग्नाला लोकांना तयार केले होते. लग्न झाल्यानंतर तिला आठवड्यातच सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. लग्न होऊन सुट्टीचे दिवस संपलेत तरी आपला नवरा कामावर का जात नाहीये असा विचार तिला आला. तेव्हा तो मला बाहेरगावी जायचे असल्यामुळे कामाची प्रोसिजर चालू असल्याचे अनिल तिला सांगू लागला. एक महिना झाला, दोन महिने झाले तरी अजून प्रोसिजर कशी चालू आहे हे तिला समजत नव्हते. कारण ती स्वतःही वर्किंग वुमन होती. म्हणून एक दिवस तुझे सगळे कागदपत्र दाखव मी चौकशी करते असे त्याला बोलू लागली. तेव्हा तो तिला कारणं देऊ लागला. या सगळ्या गोष्टींमध्ये शामलाची सासू मूल लवकर होऊ दे यासाठी तिच्यावर दबा देऊ लागली. कारण पहिले मूल झाले की, तू तुझ्या कामावर लक्ष देशील. दोन महिन्यांत ती गरोदर राहिली. गरोदर असतानाही शामला सगळा औषध पाण्याचा खर्च, डॉक्टरचे पैसे, गोळ्या करते. माझा नवरा माझ्यासाठी एकही रुपया देत नसल्याचे तिला जाणवू लागले. सातव्या महिन्यानंतर ती माहेरी गेली ती परत आलीच नाही. तिला सरळ स्पष्ट समजून आले होते की, आपण ज्या मुलाशी लग्न केलं तो इंजिनिअर वगैरे काही नसून तो साधा दहावी शिकलेला आहे. आपल्या मैत्रिणीने आपली फसवणूक केली होती.
मुलगी जन्माला आली तिचे पुढचे भविष्य काय या चिंतेत शामला राहू लागली. ज्या घरातल्या लोकांनी तिची फसवणूक केली त्या घरात तिला परत जायचे नव्हते. तिच्या माहेरच्यांनी तिला भावनिक, आर्थिक सगळ्याच गोष्टीचा आधार दिला. शामलाने अनिलवर कौटुंबिक हिंसाचाराखाली केस दाखल केली. केस सुरू झाल्यानंतर मेंटेनस सुरू झाला. तो मेंटेनसही तो देऊ शकत नव्हता. अशी दोन-तीन वर्षे केस कोर्टात चालूच होती. अचानक एक दिवस अनिल पुन्हा लग्न करतोय ही खबर तिला लागली. तशीच शामला तडक आपल्या मुलीला आणि माहेरच्यांना घेऊन जिथे लग्न होतं त्या ठिकाणी दाखल झाली. माझी फसवणूक झाली आहे तशी दुसऱ्या मुलीची फसवणूक होऊ नये हाच तिचा हेतू होता.
अनिलने एक नाही तर पाच-सहा मुलींना फसवले होते. या मुलींना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तो त्यांच्याकडून पैसे घेत होता. मला तुमच्याशी लग्न करायचे आहे पण आर्थिक अडचण आहे. त्याच्यामुळे मला मदत करा असे त्यांना सांगून अनेक मुलींनी त्याला लाखोंच्या रकमा दिलेल्या होत्या. त्यामधील श्रद्धा नावाची जी मुलगी होती ती फार हुशार होती. तिने त्याला पाच लाख रुपये दिले होते. पण नक्की काहीतरी चुकतंय याची तिला जाणीव झाली आणि तिने अनिलची इत्थंभूत चौकशी करायला सुरुवात केली. त्याच्या मित्रांकडे चौकशी केल्यावर तिला समजले की, त्याचे लग्न झाले आहे. त्याची कोर्टामध्ये केस चालू होती. त्या मुलीने शेवटी शामलाचा नंबर घेतला आणि ती शामलापर्यंत पोहोचली.
अनिलशी माझे लग्न होणार आहे पण मला कुठेतरी काहीतरी खटकते म्हणून मी चौकशी केली तर मला तू त्याची पत्नी असल्याचे समजले पण खरं की खोटं हे पाहण्यासाठी मी तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट केला असे तिने सांगितले. लग्नाला एक दिवस बाकी होता आणि शामलाची आणि श्रद्धाची भेट झाली होती. लग्न हे गुपचूप पद्धतीने केले जाणार होते. ते श्रद्धाला खटकत होते. श्रद्धाने शामलाला सांगितले की, लग्नाच्या इथे तू अचानक हजर राहा आपोआप सर्वांना खरी परिस्थिती समजेल. त्याचप्रमाणे अनिल आणि श्रद्धाचे लग्न होत असताना अचानक शामला तिथे आली. शामला आणि मुलीला बघून अनिल, अनिलची आई, बहीण तेथून पसार झाले.
(सत्यघटनेवर आधारित)