Friday, February 14, 2025
Homeसाप्ताहिककोलाजडॉक्टरचा हलगर्जीपणा, जीव गेला बालकाचा

डॉक्टरचा हलगर्जीपणा, जीव गेला बालकाचा

अ‍ॅड. रिया करंजकर

डॉक्टरला आपण देवदूत समजतो आणि आपल्या आजारातून आपल्याला हे देवदूत बाहेर काढतील हा पूर्ण विश्वास रुग्णांना असतो. या विश्वासावरच रुग्ण शंभर टक्क्यांमधील पस्तीस टक्के तरी बरे होतात. डॉक्टरांच्या बोलण्याने अर्धा आजार निघून जातो. गावामध्ये सरकारी दवाखाने व काही ठिकाणी हॉस्पिटल लोकांच्या गरजा बघून उभारले गेलेले आहेत. या ठिकाणी काम करणारे डॉक्टर हे सरकारी डॉक्टर म्हणून ओळखले जातात. पण काही डॉक्टर असे असतात की हॉस्पिटलमध्ये काम करूनही ते स्वतःचं स्वतंत्र क्लिनिक चालू करतात. हे सर्रास आपल्याला बघायला मिळते. काही डॉक्टर सरकारी दवाखान्यात येणाऱ्या पेशंटला आपल्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये बोलावूनही त्यांच्यावर उपचार करतात. पैसा उकळण्याचा हा एक नवीन धंदा सुरू झालेला आहे. आर्यन हा चार वर्षांचा मुलगा घरासमोरच खेळत होता. त्यावेळी त्याला विंचू चावल्यामुळे त्याचे वडील दवाखान्यात घेऊन गेले. त्यावेळी कितीही प्राथमिक उपचार केले तरी रुग्ण बरा झाला नाही, तर त्याला सरकारी दवाखान्यात नेण्याचा सल्ला देण्यात येई. आर्यनला पण सरकारी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. दवाखान्यात त्याचे वडील तिथे वॉचमन म्हणून काम करत होते. त्यांनी लगेचच आर्यनला दवाखान्यात नेऊन सुधाकर नावाच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू केले. तिथे मुख्य असलेल्या डॉक्टर मेहता यांना कॉल करून पेशंटबद्दल माहिती दिली. दुपारची तीनची वेळ असल्याने मेहता डॉक्टर ड्युटीवर असणे आवश्यक होते. पण त्यावेळी ते आपल्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये होते. त्यांनी तिथून सांगितले की, मला यायला वेळ लागेल तोपर्यंत प्राथमिक उपचार चालू ठेवा.

सुदामाचे मित्र प्रेम

चार तासांनंतर दवाखान्यात आल्यामुळे त्यांनी सांगितले की, मला आता जमणार नाही तुम्ही शहरातल्या चांगल्या दवाखान्यात घेऊन जा. आर्यनचे वडील तिथे वॉचमन असल्यामुळे त्यांना माहीत होते की, विंचू चावल्यावर हेच डॉक्टर इंजेक्शन देतात आणि कितीतरी लोक वाचलेले आहेत. आज त्यांच्याच मुलासाठी डॉक्टर तिथे उपलब्ध नव्हते. डॉक्टरने सांगितले म्हणून शहरातल्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आर्यनचे वडील तयार झाले. विंचूच्या चाव्याने विष अंगात भिनल्याने रस्त्यातच आर्यनचा मृत्यू झाला. वेळेवर त्याला उपचार, इंजेक्शन दिले असते, तर कदाचित इतर माणसांप्रमाणे गावातल्या सरकारी दवाखान्यात आर्यन वाचला असता. पण ऑनड्युटी असतानाही मात्र डॉक्टर आपल्या क्लिनिकमध्ये प्रायव्हेट पेशंट बघण्यासाठी व्यस्त होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आर्यनने आपला जीव गमावला होता. हॉस्पिटलला आर्यनचे वडील वॉचमन म्हणून कामाला होते पण आपल्या मुलाला ते वाचवू शकले नाहीत. आपल्या मुलाचा जीव हा डॉक्टरांमुळे गेला आहे कारण ते आपल्या ड्युटीवर उपस्थित नव्हते आणि उपस्थित नसल्यामुळे ते आपल्या मुलाला उपचार करू शकले नाहीत म्हणून त्यांनी डॉक्टरांविरुद्ध एफआयआर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला. गावातील लोकांनी, वडिलांनी डॉक्टरवर केसेस दाखल केले. सरकारी दवाखान्यांमध्ये डॉक्टर या पदावर कार्यरत असतानाही त्यांनी आपली प्रायव्हेट क्लिनिक चालू केली होती. क्लिनिकमध्ये त्यावेळी पेशंट बघत होते. त्यांनी कायदेशीर गुन्हा केला होता. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे एका नाहक बालकाचा जीव मात्र गमवावा लागला होता. अशा अनेक ठिकाणी सरकारी डॉक्टर म्हणून असलेले डॉक्टर आपल्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये आपली प्रॅक्टिस चालू ठेवतात आणि सरकारी दवाखान्यात येणाऱ्या पेशंटकडे हलगर्जीपणा दाखवला जातो.
(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -