Tuesday, January 21, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथन‘सादगी’ व्यक्तिमत्त्व जपणारी : अनघा कावले

‘सादगी’ व्यक्तिमत्त्व जपणारी : अनघा कावले

दी लेडी बॉस – अर्चना सोंडे

आजच्या घडीला बाजारात विविध प्रकारचे कपड्यांचे ब्रँड एस्टॅब्लिश झाले आहेत. असे असतानाही कपड्यांचा एक ब्रँड जो डिजिटलीसुद्धा आणि खासकरून विविध प्रदर्शनांमधून लोकप्रिय होत आहे. त्या ब्रँडचे नाव आहे ‘सादगी’. नावाप्रमाणेच साधेपणा जपणारा आणि कपडे परिधान केल्यावर व्यक्तिमत्त्वाला चार चाँद लावणारा ब्रँड डेव्हलप तसेच डिझाईन केलाय अनघा कावले या फॅशन डिझायनरने. बाजारात कपड्यांचे इतके ब्रँड असतानासुद्धा ‘सादगी’ला लॉन्च करणे आणि त्याचे कपडे घालण्याची ग्राहकांना चटक लावणे हे आवाहन अनघाने लीलया पेलले आहे.

विजयाची माळ कुणाच्या गळ्यात?

आपल्या ब्रॅण्डविषयी अनघा सांगते, ‘सादगी’ म्हणजे साधेपणा. माझ्या ‘सादगी’ या ब्रँडचे कपडे नावाप्रमाणेच साधे सोबर असतात. वनपीस, कुर्तीज, शॉर्ट टॉप, लॉन्ग टॉप या प्रकाच्या लेडीज कपड्यांची निर्मिती करते. कॉटन प्रकारातील कापडापासून कपडे तयार करण्यास प्राधान्य देते. कारण कॉटन फॅब्रिक तिन्ही सीजनमध्ये चालते. नेहमीच्या वापरण्यासाठीही अत्यंत चांगले आहे. ‘सादगी’चे कपडे हे सौम्य रंगसंगतीतले आणि नाजूक पण उठावदार प्रिंट्सचे असतात. त्यामुळे ऑफिस वेअर्ससाठी कधीही चांगले. कपड्यांचे दर खिशाला परवडणारेही असतात.”

‘सादगी’विषयी भरभरून बोलणाऱ्या अनघाचा सर्वसामान्य मुलगी ते फॅशन डिझायनर-मर्चन्टडायझर हा प्रवास रंजक आहे. अनघा सांगते, “माझे बालपण ते जडणघडणीचा सर्वात महत्त्वपूर्ण काळ हा ठाण्यात गेला आहे. शाळेत अभ्यासापेक्षा चित्रकला, नृत्य, खेळ या विषयांची आवड होती. अभ्यास सांभाळून या कलांना वेळ द्यायचे. सर्वात जास्त वेळ चित्रकलेला द्यायचे. शाळेत असल्यापासूनच मला नीटनेटके राहण्याची सवय होती. दहावीनंतर ठाण्याच्या के. बी. कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. कॉलेजमध्ये असताना माझी कपड्यांची स्टाईल माझ्या मैत्रिणींना खूप आवडायची.

कॉलेजमध्ये असतानाच फॅशन डिझायनिंगविषयी कळले. बारावीनंतर फॅशन डिझायनिंग शिकण्याचे ठरवले. फॅशन डिझायनिंगचा चार वर्षांचा डिग्री कोर्स करायचा होता. पण मुंबई-ठाण्यात त्यावेळेस कुठेच डिग्री कोर्स नव्हता. चर्चगेटच्या निर्मला निकेतनमध्ये फॅशन डिझायनिंगच्या डिप्लोमा कोर्सविषयी समजले. अॅडमिशन घेण्यापूर्वी माझा तिथल्या शिक्षकांनी इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू इंग्रजीतून घेतला. माझे इंग्रजी सुमार दर्जाचे होते. पण जिद्दीने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. निर्मला निकेतनमध्ये फॅशन डिझायनिंगच्या डिप्लोमा कोर्सला अॅडमिशन मिळाले. संस्थेतील वातावरणात इंग्रजी भाषेचा जास्त प्रभाव होता. इंग्रजी भाषेच्या भीतीमुळे कम्युनिकेशन स्किलमध्ये मागे पडायचे. बुजरी झाले.

गुणवत्ता असूनसुद्धा मी मागे पडले. त्याचा परिणाम माझ्या इंटर्नशिपवरही झाला. कोर्स पूर्ण केल्यावर संस्थेकडून इंटर्नशिप न मिळाल्यामुळे मी माझी इंटर्नशीप स्वतःची स्वतःच शोधली. पुन्हा इथेही इंग्रजी भाषेचा अडसर जाणवू लागला. इंग्रजी भाषेच्या अडसरावर मात करत इंटर्नशिप पूर्ण केली. त्यानंतर एका कंपनीत ११ वर्षे फॅशन डिझायनर-मर्चन्टडायझर या हुद्द्यावर काम केले. गुणवत्ता असूनसुद्धा आपण कुठे तरी मागे पडतोय, आपल्याला डावलले जातेय ही सल कुठे तरी मनाला बोचत होती. स्वतःचे काही तरी वेगळे सुरू करावेसे वाटू लागले. इथूनच ‘सादगी’चा प्रवास सुरू झाला.”

फिक्स्ड इन्कम देणारी नोकरी सोडण्याचा निर्णय घेणे हे अनघासाठी सोपे नव्हते. अनघा सांगते,“नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझे लग्न झाले होते. नवरा आशय कावलेला विश्वासात घेऊन नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करत असल्याचा निर्णय सांगितला. त्याच्या पाठिंब्यामुळे नोकरी सोडणे जड गेले नाही. फॅशन डिझायनर, मर्चन्टडायझर या कामांचा अनुभव असल्यामुळे स्वतःच्या ब्रँड खाली कपड्यांचे प्रॉडक्शन करायचे ठरवले. ब्रँडचे नाव ठरले ‘सादगी’. माझी जाऊ विभूती कावलेच्या कल्पनेतून आले. नावाला साजेशीच ब्रँड अंतर्गत कपड्यांची निर्मिती करण्याचे ठरले.”

नोकरी सोडली. ब्रँडचे नामकरण झाले; पण अनघाचा स्ट्रगल संपला नव्हता. अनघा सांगते, “मला डिझायनिंगची कला चांगली अवगत होती. टेलरिंग काम माहिती होते. पण एकटी शिवून शिवून शिवणार किती? शेवटी टेलर्स हायर करायचे ठरले. माझ्या डिझाइन्स घेऊन ओळखी-पाळखीच्या सर्व टेलर्सना भेटायचे. पण त्यांना कमी प्रमाणातील काम नको हवे होते. त्यांना कमीत कमी ५०० ते हजार नगाचे काम हवे होते. मी त्यांना समजावून सांगायचे की, माझी सुरुवात आहे.

एकदा का जम बसला की, जास्त प्रमाणात काम आल्यावर तुम्हालाच देणार. सुरुवातीचे माझे काम ३०-४० कुर्त्यांचे असायचे. जे टेलर तयार व्हायचे त्यांचे शिलाईचे दर जास्त असायचे. त्यातूनही काहींसोबत शिलाई दराबाबत घासघीस करून त्यांना तयार केले, ते आजही ‘सादगी’ सोबत जोडले गेले आहेत. टेलरनंतर कापड उत्पादकांसोबतही घासघीस करावी लागली. स्वस्त कापड सुरतला मिळते. त्यामुळे नवऱ्यासोबत सुरत गाठले. तिथेही मला परवडेल असे चांगल्या दर्जाचे कॉटन कापड मिळविण्यासाठी अख्खं सुरत पालथे घातले. एका ठिकाणी मिळालेसुद्धा. पण एकदा पसंत केलेला कापडाचा तोच तागा कुरियरद्वारे मिळेल याची शाश्वती नव्हती. माणुसकीवर विश्वास ठेवत त्या कापड विक्रेत्याला पैसे दिले. त्यानेही आमच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. टेलर, कापड व्यापाऱ्यांनंतर उत्पादनांना ग्राहक मिळवितानाही स्ट्रगल करावे लागले. ‘सादगी’च्या पहिल्या वर्षी कपड्यांची विशेष निर्मिती केली नाही. त्या वर्षी माझी आई युगंधरा शिंदे हिने माझ्याकडून ‘सादगी’चे कुर्ते दराशी कोणतीही घासाघीस न करता रोख पैसे देऊन विकत घेतले. त्यावेळी खूप भरून आले. माझ्या आईने हे कुर्ते तिच्या ओळखीच्यांना भेट म्हणून दिले. ती सादगीची पहिली माऊथ पब्लिसिटी ठरली. त्याच्यानंतर ‘सादगी’ची जी लोकप्रियता वाढली ती आजही कायम आहे.”

डिसेंबर २०२४ मध्ये ‘सादगी’ला तीन वर्षे पूर्ण होतील. अनघा सांगते, “गेल्या अडीच ते पावणेतीन वर्षांच्या कालावधीत सादगीने चार हजारांपर्यंत ऑर्डर्स डिस्पॅच केल्या आहेत. तसेच मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरातून झालेल्या १५ प्रमुख प्रदर्शनांमधून सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनांतून सादगीला लाभलेल्या ग्राहकांची संख्या चांगली आहे. ‘सादगी’ची लोकप्रियता सेलिब्रिटीज मध्येही कायम आहे, वनिता खरात, सायली संजीव, तितीक्षा तावडे, मधुराणी गोखले-प्रभुलकर, गौरी कुलकर्णी यांच्या ‘वॉर्डरोब’मध्ये ‘सादगी’च्या कपड्यांनी स्थान मिळवले आहे. ‘सादगी’चे हे यश म्हणजे माझी आई युगंधरा शिंदे, वडील सुहास शिंदे, भाऊ कमलेश शिंदे आणि वहिनी काव्या शिंदे, दीर सुजय कावले, जाऊ विभूती कावले, नवरा आशय कावले यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचे फलितच मी समजते.”

चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेत स्वतःच कपड्यांचा ब्रँड स्थापून एक स्टार्टअप सुरू करण्याचे धाडस अनघा कावले हिने केले. अनघा फक्त ब्रँडची निर्मिती करून थांबली नाही; तर ती त्या व्यवसायात जातीने लक्ष घालते. डिझायनिंग, प्रोडक्शन, प्रमोशन, मॅनुफॅक्चुरिन्ग, ब्रॅण्डिंग, डिस्पॅचिंग अशा सर्व जबाबदाऱ्या ती एकहाती एकटी लीलया सांभाळते आहे. त्यामुळेच ती लेडी बॉस ठरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -