Tuesday, February 11, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यविजयाची माळ कुणाच्या गळ्यात?

विजयाची माळ कुणाच्या गळ्यात?

रवींद्र तांबे

महाराष्ट्र राज्यातील १५ व्या विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान सकाळी ७ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ६ वाजता संपले. मतदाना दिवशी मुंबईतील १७४ कुर्ला (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाच्या प्रवेश द्वारावर रांगोळीच्या मध्ये निवडणूक विधानसभा २०२४, सुस्वागतम तसेच प्रवेशद्वाराच्या आत रंगीबेरंगी फुगविलेल्या फुग्यांनी कमानी सजविली होती. आज दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात सध्या अनुसूचित जाती व जमाती यांना अनुक्रमे २९ व २५ मतदारसंघ राखीव आहेत. राज्यात २८८ जागांसाठी ४१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यासाठी १ लाख १८६ मतदान केंद्रावर मतदान झाले. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ९६,६५४ मतदान केंद्रे होती. यावेळी ३,५३२ केंद्रे अधिक आहेत. राज्यात ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या १२ लाख ४८ हजार होती.

भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात सरासरी ६५.०२ टक्के मतदान झाले. राज्यातील एकूण जिल्ह्यांचा विचार करता गडचिरोली जिल्ह्यात (६९.६३ टक्के) सर्वात जास्त मतदान झाले, तर सर्वात कमी मतदान मुंबई शहर जिल्ह्यात (४९.०७ टक्के) झाले. तेव्हा कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे याचा आज फैसला होईल. म्हणजे विजयी उमेदवार घोषित केला जाईल. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली. उमेदवारांनी प्रचाराच्या कार्यकाळात एकमेकांची धुणीभांडी तसेच घोषणांचा पाऊस पाडण्यात आला असला तरी त्यात जर-तरचा प्रश्न आहे. त्यामुळे यावेळच्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अटीतटीच्या होणार आहेत. विशेष म्हणजे मतदान झाल्यानंतर कोणकोणत्या मतदारसंघात कोण निवडून येणार त्याबद्दल तर्कवितर्क चालू असले तरी आज विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आहे हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. नंतर विजयाचा गुलाल उधळला जाईल. मात्र मतदार राजाने सतर्क राहणे आवश्यक आहे. तेव्हा उद्यापासून म्हणण्यापेक्षा आजपासून विजयी उमेदवारांनी जनतेच्या शुभेच्छा स्वीकारून कामाला लागले पाहिजे. ही राज्यातील सर्वसाधारण जनतेची अपेक्षा आहे. म्हणजे आता निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींनी घोषणांची अंमलबजावणी करावी.

आपल्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मतदारांना दिलेली आश्वासाने विजयी उमेदवार कशाप्रकारे पार पाडणार आहेत. त्यावर मतदारांनी आजपासून त्यांच्या आश्वासनांकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील विधानसभेच्या उमेदवारीसाठी २९ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत अर्ज भरण्यात आले. ३० ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी एकूण उमेदवारांपैकी ३३०२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. ५ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. पहाटेचा गारवा आणि दुपारचा उष्मा अशा हवामानाचा सामना करीत राज्यातील विविध विभागातील शासकीय सेवकांनी घड्याळ्याच्या काट्याकडे लक्ष न देता एकाग्रतेने काम केले. आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे मार्गदर्शन व राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अचूक नियोजन यामुळे या निवडणुका सुरळीत पार पाडल्या गेल्या.

या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ज्यांच्या हातात सकाळी झाडू असायची अशा सेवक वर्गांच्या हातात भारत निवडणूक आयोगाने पेन देऊन त्यांना अधिकारी बनविले. त्यामुळे आज विजयी होणाऱ्या राज्यातील प्रत्येक उमेदवाराने भारत निवडणूक आयोगाला सलाम करावा. तसेच अशा सेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. त्यानंतर आपल्या विधानसभा मतदारसंघाचा विकास कसा करता येईल त्या अनुषंगाने आपल्या अधिकारातील विकास आराखडा बनवावा. त्यासाठी प्रथम स्थानिक नागरिकांच्या हाताला काम कसे मिळेल याकडे अधिक लक्ष द्यावे. निवडणुकीच्या तोंडावर मोफत योजना राबविण्यापेक्षा आतापासून आपल्या मतदारसंघातील शेतकरी, दारिद्र्य रेषेखालील असणारे नागरिक, बहीण, भाऊ, ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शेतकरी, मदतनीस, कोतवाल, गावचे सरपंच, गावचे पोलीस पाटील, सुशिक्षित बेकार, वृद्धांना किमान वेतन, रेशन दुकानावर वेळीच धान्यांचा पुरवठा करणे, कंत्राटी भरती यांना किमान वेतन मिळणे आवश्यक आहे. त्या अानुषंगाने प्रयत्न करून त्याची अंमलबजावणी करणे. तसेच गाव, वाड्या-वस्ती सुधारणा करण्यासाठी आपला विकास निधी योग्य प्रकारे कसा खर्च करता येईल त्या दृष्टिकोनातून नि:पक्षपातीपणे प्रयत्न करावा. समाज कल्याण विभागातील विविध योजना राबवून दलित वस्त्यांचा विकास साधने, काही ठिकाणी राज्यात समाज कल्याण विभागाचा निधी दलित वस्त्यांच्या नावाखाली गावातील सार्वजनिक ठिकाणी केला जात आहे याकडे अधिक लक्ष द्यावे. तरच दलित वस्त्यांचा विकास होईल. तेव्हा आज महाराष्ट्र राज्यातील विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या वेळापत्रकाप्रमाणे लवकरच मतमोजणीला सुरुवात होऊन निवडणुकीचे निकाल घोषित होतील. तेव्हा विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे आता लवकरच समजेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -