Saturday, February 8, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly : महाराष्ट्र विधानसभेसाठी आज मतदान

Maharashtra Assembly : महाराष्ट्र विधानसभेसाठी आज मतदान

मुंबई : राज्य विधानसभेच्या २८८ जागा (Maharashtra Assembly) आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या, बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानुषंगाने निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांवर अपक्षांसह विविध पक्षांचे एकूण चार हजार १३६ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यात एक लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राहील. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकूण १५८ लहान-मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी ६ मोठे पक्ष मविआ आणि महायुती या २ आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत. शिंदे गटातील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील महाआघाडीचा भाग आहेत. तर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना (उबाठा) आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) म्हणजेच एनसीपी (एसपी) हे महाविकास आघाडीचा भाग आहेत.

पैसे वाटपावरून ठाकरे-शिंदे गट आमनेसामने; पालघरमध्ये तणाव

दरम्यान, गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली होती. तेव्हा भाजपने १०५, तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला ४४ तर राष्ट्रवादीला ५४ जागा मिळाल्या होत्या. भाजप-शिवसेना सहज सत्तेवर येऊ शकले असते, पण मुख्यमंत्रिपदावरुन युती तुटली. मोठ्या राजकीय गोंधळानंतर २३ नोव्हेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, जो राजकीय इतिहासात ‘पहाटेचा शपथविधी’ म्हणून गाजतो. मात्र बहुमत चाचणीपूर्वीच २६ नोव्हेंबरला दोघांनाही राजीनामा द्यावा लागला. २८ नोव्हेंबर रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सुमारे अडीच वर्षांनंतर शिवसेनेत आणि त्याच्या वर्षभरानंतर राष्ट्रवादीत बंडखोरी होऊन दोन्ही पक्ष चार पक्षांमध्ये विभागले गेले. या राजकीय पार्श्वभूमीवरच लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना आघाडी मिळाली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, अपक्षांसह विविध पक्षांचे एकूण ४ हजार १३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) ने यापैकी २ हजार २०१ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी करून अहवाल तयार केला आहे. त्यानुसार जवळपास २९ टक्के म्हणजेच ६२९ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यापैकी ४१२ जणांवर खून, अपहरण, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ५० उमेदवारांवर महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे आरोप आहेत. सुमारे ३१% म्हणजेच ६८६ उमेदवारांचे वय २५ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे. ३१७ (१४%) उमेदवार ६१ ते ८० वर्षे वयोगटातील आहेत, तर दोघे उमेदवार ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. या २ हजार २०१ पैकी फक्त २०४ महिला उमेदवार (९ टक्के) आहेत. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पाहता, ४७% जणांचे शिक्षण पाचवी ते बारावीच्या दरम्यान आहे. ७४ उमेदवार डिप्लोमा धारक, ५८ साक्षर, तर दहा जणांनी स्वतःला अशिक्षित म्हणून घोषित केले आहे.

लढत असलेल्या जागा…

महायुती

भाजप – १४९
शिवसेना – ८१
राष्ट्रवादी – ५९

महाविकास आघाडी

काँग्रेस – १०१
शिवसेना (उबाठा)- ९५
राष्ट्रवादी (शरद पवार) – ८६
इतर – ०६

Vinod Tawde: भाजपा नेते विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा ठाकूरांचा आरोप; तर तावडेंनी आरोप फेटाळले!

एक कोटी दोन लाख मुंबईकर आज निवडणार ३६ आमदार; मुंबई शहर, उपनगरात एकूण ४२० उमेदवार

मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांतील एकूण ४२० उमेदवारांमधून आपले ३६ आमदार निवडण्यासाठी आज बुधवारी शहर आणि उपनगरातील एक कोटी दोन लाख २९ हजार ७०८ मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सुवर्णसंधी चालून आलेली असताना १० हजार ११७ मतदान केंद्रांवर मतदार राजाचे स्वागत करण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. केवळ मतदानच नाही तर, त्यानंतर ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ठेवण्यासाठीच्या स्ट्राँगरूमचे व्यवस्थापन आणि मतमोजणी केंद्रे यांची जय्यत तयारी झाली आहे, अशी माहिती निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आली.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संथ गतीने झाल्याने मतदारांना रांगांमध्ये ताटकळत उभे राहावे लागले होते. या प्रकारच्या तक्रारी लक्षात घेऊन या वेळी विधानसभेच्या मतदानासाठी केंद्रांवर आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे. मतदान केंद्रांची फेररचना केल्यानंतर मुंबई शहरात ६७१ ठिकाणी दोन हजार ५३८ केंद्रे, तर उपनगरात एक हजार ४१४ ठिकाणी सात हजार ५७९ केंद्रे उभारली आहेत. म्हणजेच संपूर्ण मुंबईत दोन हजार ८५ ठिकाणी १० हजार ११७ मतदान केंद्रे उभारली आहेत. त्यामुळे एकाच केंद्रावर मतदारांची खूप गर्दी होणार नाही. त्याशिवाय रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. एक मतदार बुथमध्ये गेल्यानंतर मतदानासाठी सुमारे ४५ सेकंद ते ६० सेकंद लागतात, असे गृहित धरून रांग कायम पुढे सरकत राहील, असे नियोजन केले आहे. त्याशिवाय जर गर्दी वाढली तर मतदारांना बसण्यासाठी बाकडी, खुर्च्या तसेच प्रतीक्षा गृह अशी व्यवस्था आहे. तसेच मतदारांना पिण्याचे पाणी मिळेल आणि तेथे प्रसाधन गृहाची सुविधाही ठेवली आहे. त्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचे खास कर्मचारी नेमले आहेत. दिव्यांग मतदारांसाठी प्रथमच दिव्यांग मित्र नियुक्त केले आहेत. या वेळी सुमारे नऊ टक्के मतदान केंद्रे ही उंच इमारतींमध्ये ठेवली आहेत. या वेळी मतदारांना तक्रारीसाठी कुठेही जागा ठेवलेली नाही, अशी माहिती मुंबईचे (शहर आणि उपनगर) जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी तसेच अतिरिक्त निवडणूक अधिकारी विपिन शर्मा यांनी दिली. या पार्श्वभूमीवर या वेळी मुंबईत मतदानाचा टक्का चांगलाच वधारेल, असा विश्वास गगराणी यांनी व्यक्त केला आहे. एकूण मतदार केंद्रांपैकी ८४ मॉडेल मतदान केंद्रे आहेत. यातील प्रत्येकी ३८ मतदार केंद्रांचे संचालन महिला आणि तरुण कर्मचारी वर्गांकडून केला जाणार आहे. तर, आठ मतदार केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारा संचालित केले जाणार आहे. आज विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मुंबईतील सर्व मतदारांनी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी हाजीर हो!

मतदान केंद्रावर मोबाइल बंदी

लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly) वेळी मतदान केंद्रावर मतदारांना मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांना मतदान केंद्रावर मोबाइल नेता येणार नाही किंवा मोबाइल नेला तरी तो बाहेर ठेवण्याची जबाबदारी मतदारांचीच असणार आहे. ही बाब मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबईचे निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केली. मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास परवानगी दिल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बंदी करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मतदान करतानाच्या ध्वनिचित्रफिती तयार केल्या जाऊ शकतात किंवा त्याकरीता एखाद्या उमेदवाराकडून मतदारांवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यामुळे मोबाइल बंदीची सक्ती करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -