दोन डिसेंबरला न्यायालयात हजर रहाण्याचे न्यायालयाचे आदेश
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात राहुल गांधी यांनी येत्या दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे, अशा आदेश पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याबाबत सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. त्यामुळे सुनावणीसाठी राहुल गांधी उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता होती.
या प्रकरणी सुनावणीदरम्यान गांधी यांना पोस्टाद्वारे पाठविलेले समन्स त्यांच्या दिल्लीतील पत्यावर मिळाल्याचे फिर्यादी सावरकर यांच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले. समन्स मिळूनही ते हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना जामीनपात्र वॉरंट काढावे, असा अर्ज फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केला.