अमरावती: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ टाकू नये, याबाबत पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही निवडणूक काळात काही युझर्सकडून आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकले जात आहेत. दरम्यान, अशा पोस्ट, व्हिडीओ निदर्शनास येताच त्या काढून टाकणे तसेच संबधितांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून २४ बाय ७ सायबर पेट्रोलींग सुरू आहे. मागील पंधरा दिवसांत शहर पोलिसांच्या सायबर शाखेने अशा २१ युझर्सना नोटीस बजावली असून एकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आहे. चोवीस तासावर मत्तदान आले आहे. या काळात समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे.
स्टोरेज फुल झाल्यानंतर मिनिटांत असे करा खाली Gmail, ही आहे सोपी ट्रिक
या वेळी काहींकडून आक्षेपार्ह, खोट्या, संभ्रम पसरवणाऱ्या किंवा अफवा पसरवणाऱ्या पोस्ट किंवा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर टाकल्या जावू शकतात. अशा पोस्टमुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम पसरुन काही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सायबर पोलिसांकडून सातत्याने सायबर पेट्रोलींग सुरू आहे. यादरम्यान सायबर पोलिस विविध समाजमाध्यमावर वाँच ठेवून आहेत. पोलिसांच्या सायबर पेट्रोलींगमध्ये आक्षेपार्ह काही आढळल्यास पोलिस तत्काळ संबधित पोस्ट काढून टाकतात. तसेच पोस्ट टाकणाऱ्याला नोटीस देवून आयुक्तालयात हजर होण्याबाबत तंबी देतात. अशा प्रकरणात कोणी तक्रार दाखल केल्यास सायबर पोलिस संबंधिताविरुध्द गुन्हासुध्दा दाखल करणार आहेत, असे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले.
यासंदर्भात सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी अनिकेत कासार यांनी सांगितले की, सोशल मीडियावर कोणीही अफवा पसरवणाऱ्या पोस्ट किंवा व्हिडीओ व्हायरल करु नये. आम्ही चोवीस तास यावर लक्ष ठेवून आहोत. आमच्या तपासणीमध्ये आक्षेपार्ह आढळल्यास संबंधितांविरुध्द कारवाई होणार आहे. सर्व गृप अॅडमिनने विशेष खबरदारी घ्यावी. तसेच मॅसेज केवळ अॅडमिन पाठवेल, अशा पद्धतीने सेटींग करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.