महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आता थंडावणार आहेत. गेली पंधरा-वीस दिवस निवडणूक प्रचाराच्या धुरळ्याने महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून निघाला. कुठे हायटेक प्रचार, तर कुठे घरटी जनसंपर्क. यामुळे राजकारणात कमालीचा धुरळा उडालेला पाहावयास मिळतोय. महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी ही विधानसभा निवडणूक अस्तित्वाची व प्रतिष्ठेची आहे. महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी व काँग्रेस, तर महायुतीकडून भाजपा, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी अशी निवडणूक रिंगणात आहे. बच्चू कडूंचा प्रहार, प्रकाश आंबेडकरांची वंचित बहूजन आघाडी, छत्रपती संभाजी महाराजांची स्वराज्य संघटना, एमआयएमसारखे पक्षही आपला जनाधार व राजकीय उपद्रवमूल्य मतपेटीतून स्पष्ट करण्यासाठी निवडणूक रिंगणात सहभागी झाले आहेत.
पंतप्रधान मोदींसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसह अन्य राज्याचे भाजपा मुख्यमंत्री, भाजपा मंत्री व पदाधिकारी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढत आहेत.
महाराष्ट्र राज्याचे भाजपामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, नितीन गडकरी, नारायण राणे यांच्यासह रथी-महारथी प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धुरा उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरेंवर, तर शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अवलंबून आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रचाराची धुरा नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्यासह अनेकांवर अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्यासह अनेक मातब्बर नेतेमंडळी सांभाळत आहेत. शिवसेना उबाठा गटाच्या प्रचाराची धुरा स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक रथी-महारथी प्रचार यंत्रणा राबवत आहेत.
Devendra Fadnavis : तर आम्हीही मतांसाठी धर्मयुद्ध करण्यास तयार!
निवडणुकीच्या सर्वेकडून परस्परविरोधी दावे केले जात असल्याने राजकीय संभ्रम वाढीस लागला आहे. काही सर्वे महाविकास आघाडीची, तर काही सर्वे महायुतीची सत्ता येणार असल्याचे बोलत आहेत. अनेकांच्या भाषणांमध्ये विकासाऐवजी राजकीय आरोप-प्रत्यारोपावर भर दिला जात आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून राबविण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावेळी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राज्यातील महिलांना महायुती सरकारकडून दर महिना दीड हजार रुपयांच्या आर्थिक मदतीने राज्याच्या समीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली. राज्यातील महिला मतदार महायुतीच्या पाठीशी उभ्या राहाणार असल्याने महाविकास आघाडीकडून महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेमध्ये वाढ करण्याचे वचननाम्यात नमूद केले आहे व त्यास महालक्ष्मी योजना असे नाव देण्यात आले; परंतु महाविकास आघाडीची राज्यात अडीच वर्षांची सत्ता असताना त्यांनी ही योजना का राबविली नाही, अशी विचारणा राज्यातील महिला मतदारांकडून करण्यात येत असल्याने महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे. सत्ता असताना महिलांना मदतीची योजना राबविली नाही. सत्ता गेल्यावर सत्ता येण्यासाठी महिलांना मदतीचे आमिष दाखविले जात असल्याचा आरोप राज्यातील महिला मतदारांकडून करण्यात येत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीमुळे शहरी व ग्रामीण भागात आर्थिक उलाढालही वाढली आहे. हॉटेलवाले, ढाबेवाले, खानावळीवाले यांच्या व्यवसायात तेजी आली आहे. पेट्रोलपंपावरही अचानक डिझेल, पेट्रोल, गॅस भरण्यासाठी गर्दी वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारी निवडणूक चिन्ह मिळाल्याने तुतारी वाजविणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शपग गटाकडून जाहीर सभा, प्रचार अभियानादरम्यान तुतारी वाजविणाऱ्यांना खऱ्या अर्थाने लगीनसराई नसतानाही सुगीचे दिवस आलेेत. महायुती व महाआघाडीमुळे त्या-त्या पक्षातील निवडणूक लढवू पाहणाऱ्या मातबरांची कोंडी झाली. जागा वाटपात मित्र पक्षाला जागा गेल्याने एक तर मित्रपक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागत आहे. मित्रपक्षाचा प्रचार करणे अथवा बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणे हाच पर्याय शिल्लक असल्याने अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरी झालेली पाहावयास मिळत आहे. प्रस्थापितापेक्षा अपक्ष म्हणून निवडणूक लढवू पाहणारे बंडखोर अधिक खर्च करत असल्याने व प्रचार अभियानामध्ये आघाडी घेत असल्याने काही मतदारसंघामध्ये राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ झाली आहे. सोमवारी सांयकाळी ५ वाजता प्रचार समाप्त होत आहे. उमेदवार मतदारसंघामध्ये रॅली काढत असून प्रत्येक विभागामध्ये, वार्डामध्ये उमेदवार रॅलीतून जनसंपर्क करत आहे. निवडणूक विधानसभेची असली तरी उमेदवाराच्या निकटवर्तीयांनी, समर्थकांनी, पक्षीय पदाधिकाऱ्यांनी, आघाडी व महायुतीच्या नेतेमंडळींनी प्रचार अभियानामध्ये स्वत:ला झोकून दिल्याने ही निवडणूक जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकाप्रमाणे लढविली जात आहे. आपला कार्यकर्ता, पदाधिकारी तसेच आघाडी, युतीचा कार्यकर्ता व पदाधिकारी समोरच्या उमेदवाराच्या छावणीत जाऊ नये अथवा दगाफटका करू नये यासाठी सर्वांनाच आर्थिक रसद पुरविण्याची खबरदारी उमेदवारांनी घेतलेली आहे. प्रचार संपण्यास आता अवघ्या काही तासांचाच कालावधी शिल्लक राहील्याने मतदारांशी प्रत्यक्ष संपर्कावर अधिकाधिक भर दिला जात आहे. बुधवारी होणाऱ्या मतदानावर राज्यात कोणाचे सरकार येणार हे निश्चित होणार आहे. त्यामुळे प्रचार अभियानासोबत मतदानासाठी स्लीपा पाठविण्याची भूमिकाही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पार पाडावी लागत आहे. सध्या हायटेक काळ असल्याने मतदारांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवरही स्लीपा पाठविल्या जात आहे. पंधरा दिवसांत न झालेला प्रचार आता अवघ्या काही तासांमध्ये करण्याची जबाबदारी उमेदवार व उमेदवारांच्या कार्यकर्त्यांवर आहे. सोमवारी सांयकाळी पाच वाजता प्रचार संपुष्ठात येणार असला तरी मतदानाच्या दिवशी सांयकाळी ६ वाजेपर्यंत अळीमिळी गुपचिळीच असते.