मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आता उमेदवारांकडे छुप्या प्रचारासाठी अवघे काही तास राहिले आहेत. दरम्यान आज लालबाग मेघवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी शेवटची प्रचार सभा पार पडली. राज ठाकरे यांनी या सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला.
दोन दिवसांपूर्वी माझी तब्ब्येत बिघडली. मला बोलता येत नव्हतं. शिवसेना आणि भाजपचे आभार मानतो की बाळा नांदगावकर यांना त्यांनी पाठिंबा दिला. खरं तर हे आभार अनेक ठिकाणी मागता येऊ शकत होते पण जाऊ दे. महाराष्ट्रात अत्यंत वाईट स्थिती आहे, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, असे अनेक विषय आहेत की ते सोडवले नाही म्हणून तुमचे लक्ष दुसरीकडे वळावे यासाठी जाणीवपूर्वक दुसऱ्या निरर्थक गोष्टींची सोय केली. शरद पवार यांनी हिंदुत्वाने भारावलेल्या महाराष्ट्रात वाद निर्माण करायचे काम केलं. राजकीय पक्ष मेले तरी चालेल पण महाराष्ट्र जगला पाहिजे, अशी बोचरी टीका यावेळी त्यांनी केली आहे.
पुढे राज ठाकरे म्हणाले की, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जे राजकारण चालत ते इथे होऊ नये. संतांची शिकवण यांच्या स्वार्थी राजकारणासाठी विसरत चाललो आहे. २०१९ ची निवडणूक आठवून पाहा. या शिवडीमध्ये शिवसेना भाजपला मतदान केलं. पण निवडणूक झाल्यावर शिवसेना उठली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेली. तुम्हाला तुमच्या मतांचं अपमान नाही वाटतं? हा देशाचा अपमान आहे. विरोधात लढले आणि बरोबर जाऊन बसले. हा तुमच्या मताचा अपमान नाही का? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितलं की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर तिथे पहिल्यांदा कोणी गेलं असेल तर ज्योतिबा फुले गेले. त्यांनी शपथ घेतली की तुमच्या विचारांचा प्रचार करेन. १८ पगड जाती एकत्र आणेन. मग तिथे लोकमान्य टिळक गेले. इथे समाधी बांधली गेली पाहिजे. विविध जातीतून पैसे दिले. जात प्रिय असणे समजू शकतो. पण जातीबाबत सध्याची परिस्थिती भीषण आहे.
PM Modi Nigeria Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले नायजेरियातील मराठी समुदायाचे कौतुक
पुढे बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेब देखील अनेकदा आपल्या भाषणांमध्ये मशिदीवरील भोंग्यांबाबत बोलले होते. त्यांची देखील मशिदीवरील भोंगे हटवण्याची इच्छा होती. ते काम माझ्या पक्षानं केलं तर यांनी माझ्या १७ हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले. यांना यांचा पक्ष सांभाळता आला नाही, आमदार फुटले त्यांना हे गद्दार म्हणतायेत. अरे गद्दार तर इथे आहे जो घरामध्ये बसला आहे. गद्दारी तर यांनी पक्षासी केली असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान बाळा नांदगावकर यांच्या समोरील रेल्वे इंजिनचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.
महाराष्ट्रात २०१९ पासून घडलेल्या राजकीय उलथापालथींसाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. पक्ष आणि राज्याच्या हितापेक्षा स्वार्थासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. काँग्रेस आणि राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घ्यायला ज्यांना लाज वाटते, त्यांच्याबरोबर जाऊन उद्धव ठाकरे बसले आहेत. मला मुख्यमंत्री करा आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते जाऊन बसले होते. एका माणसाने आख्ख्या पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले त्यांना हे गद्दार म्हणत आहेत. गद्दार तर घरात बसला आहे ज्याने पक्षासोबत गद्दारी केली.
राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या वागणुकीमुळे नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि मी स्वतःही शिवसेनेतून बाहेर पडलो. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना गद्दार म्हटले जात आहे, पण खऱ्या अर्थाने पक्षाशी गद्दारी करणारा माणूस पक्षाच्या आतच आहे. मग बाळासाहेबांना त्रास देऊन जाणाऱ्या छगन भुजबळांना उद्धव ठाकरे मातोश्रीवर जेवायला बोलवतात. भुजबळांनी त्रास दिला त्याचे काही देणेघेणे नाही आणि बाकीचे यांचे शत्रू आहेत. गेल्या पाच वर्षात काय झालं, हा माणूस कसा वागला , कोरोना काळात कसा वागला. या सगळ्या गोष्टी आठवा आणि २० तारखेला मतदानाला जा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केलं.