कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत . प्रत्येक पक्षाने आपापल्या पक्षाचा प्रचार अधिक जोमाने केला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. त्याचदरम्यान, कोल्हापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर काही अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संताजी घोरपडे हे काल रात्री प्रचार संपवून आपल्या सहकाऱ्यांसह कोल्हापूरकडे परत येत होते. त्यावेळी मनवाड येथे सहा ते सात लोकांनी त्यांची कार थांबवली. पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला भेटायला थांबले असतील, असं घोरपडे यांना वाटलं. त्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांसह या लोकांची विचारपूस करण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्यावेळी बाहेरील लोकांनी काठ्या आणि भाल्यासह संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला केला.
संताजी घोरपडे यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये संताजी घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्यातून आणि हातामधून रक्तस्राव होत होता. मारेकऱ्यांचा हल्ला संताजी घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या परीने परतावून लावला. त्यानंतर हल्लेखोर रस्त्यालगत असणाऱ्या शेतात पळून गेले. जाताना त्यांनी संताजी घोरपडे यांच्या गाडीवरही दगडफेक केली.
या प्रकरणी कळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला करणारे लोक कोण होते, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. यंदा करवीर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. संताजी घोरपडे हे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ला राजकीय हेतूने प्रेरित आहे का, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.