Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Pushpa 2 : ‘पुष्पा 2’च्या ट्रेलर लाँचदरम्यान चाहत्यांची तुंबाड गर्दी; चप्पल फेक, लाठीचार्ज अन्..

Pushpa 2 : ‘पुष्पा 2’च्या ट्रेलर लाँचदरम्यान चाहत्यांची तुंबाड गर्दी; चप्पल फेक, लाठीचार्ज अन्..

पाटणा : अखेर प्रतीक्षा संपली... गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांच्या मनात ज्याची प्रतीक्षा होती, अखेर तो ‘पुष्पा २: द रुल’चा ट्रेलर काल संध्याकाळी एका भव्यदिव्य कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला होता. पाटणा येथील गांधी मैदानमध्ये ट्रेलर लाँचचं आयोजन करण्यात आलं होतं. या ट्रेलर लाँचला अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे दोघं मुख्य असणारे कलाकार उपस्थित होते. तब्बल १० हजारांहून अधिक चाहत्यांनी या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात गर्दी केली होती. गांधी मैदानमध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची एक झलक पाहण्यासाठी तुंबाड गर्दी झाली होती. काही चाहते बॅरिगेट्स आणि स्टँडवरदेखील चढले होते. इथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर येत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी जमावावर नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक चाहते कार्यक्रमादरम्यान सेलिब्रिटींना पाहण्यासाठी पाटणा इथल्या गांधी मैदानात उभारलेल्या स्टँडवर चढले होते. तिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने जमावावर नियंत्रण आणण्यासाठी लाठीचार्ज केला. या कार्यक्रमातील सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यातल्या काही व्हिडीओंमध्ये पहायला मिळतंय की पोलिसांवर गर्दीतील चाहते चप्पल आणि इतर गोष्टी फेकत आहेत. स्टेजच्या जवळ जाण्यास आणि स्टँडवर चढण्यास मनाई करताच गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

परिस्थिती काही वेळानंतर नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. “कार्यक्रमात जे लोक बॅरिकेड्स ओलांडून स्टेजच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना तिथून तातडीने हटवण्यात आलं. गांधी मैदानात पुरेशी सुरक्षाव्यवस्था तैनात आहे”, असं पाटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले. पाटणाचे जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनीसुद्धा सर्वकाही नियंत्रणात असल्याचं सांगितलं.

‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं असून २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचा हा सीक्वेल भाग आहे. पहिल्या भागात अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता सीक्वेलमध्येही त्यांच्याच मुख्य भूमिका आहेत. या सीक्वेलचा बजेट तब्बल ३०० कोटी असल्याचं सांगितलं जातंय. सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळत असून त्याला आतापर्यंत १ कोटीपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. येत्या ५ डिसेंबर रोजी ‘पुष्पा २’ चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Comments
Add Comment