सातारा: कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपीकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपीकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र, फळपीकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतक-यांच्या फळपीकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी पुर्नरचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. विमा कंपनी प्रतिनिधी पडताळणी करण्यास आल्यास संबंधित शेतकरी यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा. विमा कंपनी प्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी केल्यास तात्काळ तक्रार द्यावी. अशा विमा कंपनी प्रतिनिधी/कंपनीवर फौजदारी कारवाई करणेत येईल, अशी माहीती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.
या योजनंतर्गत गत ३ वर्षांमध्ये भाग घेतल्यापैकी सुमारे २९ हजार बोगस अर्ज आढळून आले आहेत. त्याअनुषंगाने प्रधान सचिव (कृषि) यांनी मृग बहार २०२४ मधील १०० टक्के सहभागी अर्जाची क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांचेमार्फत तपासणी करुन त्याचा अहवाल सादर करणेबाबत सूचित केले आहे. प्रधान सचिव (कृषि) यांचे आदेशान्वये जिल्ह्यातील मृग बहार २०२४ मधील सर्व बागांची पडताळणी कृषि विभागाच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे, तथापि विमा कंपनी प्रतिनिधी शेतक-यांच्या शेतावर अथवा निवासस्थानी जाऊन मी विमा कंपनीचा प्रतिनिधी आहे व शासनाच्या आदेशावरुन आपल्या फळबागेची पडताळणी करणेस आलो आहे, अशी बतावणी करुन आपली फळबाग आहे असा माझा अहवाल गेल्याशिवाय आपणास विमा नुकसान भरपाई रक्कम मिळणार नाही असे खोटे सांगून काही शेतक-यांकडून पैसे मागत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी ही बाब निदर्शनास आली आहे, याबाबत विमा कंपनी प्रतिनिधीविरोधात रितसर पोलीस तक्रार दाखल झाली आहे. अशा प्रकारचे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी मागणी केल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी.