Friday, February 14, 2025
Homeसाप्ताहिककोलाजतटस्थतेच्या अवकाशातून...

तटस्थतेच्या अवकाशातून…

वृंदा कांबळी

“बेटा घाबरू नकोस मी खंबीर आहे.’’ मी पियूच्या कानात हळूच सांगितले. डाॅक्टरांच्या हातात माझे रिपोर्ट्स होते. समोर मी व पिया बसलो होतो. डाॅक्टर कुलकर्णी माझे रिपोर्ट्स गंभीरपणे बघत होते. डाॅक्टरांच्या चेहऱ्याकडे बघूनच मी समजलो होतो. पण आता काहीही ऐकण्याची व सोसण्याची माझ्या मनाची तयारी ठेवली होती. पियूचे डोळे आभाळात भरून येत होते. मी मन घट्ट केले. भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञाचे लक्षण आठवण्याचा खूप प्रयत्न केला, खूप वेळ आठवेना. नंतर आठवले एकदाचे. तेच मनात आळवित राहिलो. डाॅक्टरांनी काहीही सांगितले, ते कितीही कटू असले तरी आता ते स्वीकारायलाच हवे ना…? त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवले म्हणून जे होणार आहे, जे माझ्या शरीरात घर करून बसले आहे ते टळणार आहे थोडेच? डाॅक्टरांच्या गंभीर हालचालींकडे पाहता मी उगीच असाच काहीतरी विचार करत बसलो होतो. माझे सगळे रिपोर्ट्स त्यांच्या हातात होते. ते आलटून पालटून सगळेच बघत होते. माझी पत्नी अनघाला आग्रहाने घरीच ठेवले होते. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती. ती डाॅक्टरांची केबिन, उत्सुकता ताणलेली, पुतळ्यासारखे स्तब्ध आम्ही दोघे, पियूचे भरून भरून येणारे डोळे, डाॅक्टरांच्या हातातले कागद हलल्याचाही जाणवणारा आवाज. बाकी सगळे स्तब्ध! भयाण अशा शांततेची चादर पसरलेले!

त्या भयाण ताणलेल्या शांततेचा भंग करीत डाॅक्टर म्हणाले, तुम्ही जरा बाहेर थांबता का? मला यांच्याशी बोलायचे आहे. प्रियांकाकडे पाहत डाॅक्टर म्हणाले. ‘‘नाही डाॅक्टर, बोला तुम्ही. काय असेल ते स्पष्ट बोला. माझे बाबा मनाने खंबीर आहेत आणि बाबांना त्यांच्या आजाराची कल्पना आहे. त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवायचे नाही. काय बोलायचे ते त्यांच्या समोरच बोला’’ डाॅक्टर कुलकर्णींनी एकदा अविश्वासाने माझ्याकडे पाहिले. ‘‘तसे नाही मिस्टर केतकर, असे काही सांगताना आम्ही पेशंटला सांगत नसतो. पेशंटबरोबर आलेल्या नातेवाइकांना विश्वासात घेऊन सांगतो.’’ “काही हरकत नाही. मला माहिती आहे माझा आजार. फक्त स्टेज कोणती आहे एवढेच जाणून घ्यायचे आहे.” मी डाॅक्टर कुलकर्णींच्या नजरेला नजर भिडवत ठामपणे म्हणालो. डाॅक्टर माझ्याकडे आश्चर्याने पाहत परत म्हणाले, “हा म्हणजे कॅन्सर आहे हे तुम्हाला माहिती आहे तर. हा पण खूप उशीर झालाय. ताबडतोब दोन दिवसांत ऑपरेशन करावे लागेल. आजाराची जी मुळे आजूबाजूला पसरू लागली आहेत ती खरवडून काढावी लागतील. तुमच्या प्रोस्टेड ग्रंथींपाशी गाठ होती. पण त्यानंतर तिची मुळे वाढत जाऊन तुमचा ब्लॅडर, किडनी, यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे जास्त वेळ काढून चालणार नाही.’’
“ठीक आहे. तुम्ही सांगाल तेव्हा मी येतो ऑपरेशनला.” मी ठामपणे बोललो.

उंची आभाळाएवढी

पियू रडवेली होऊन नुसतीच पाहत होती. एकदा माझ्याकडे आणि एकदा डाॅक्टरांकडे. ती आता कोणत्याही क्षणी कोसळून रडू लागेल असे वाटत होते. डाॅक्टरांच्या केबिनमधून आम्ही बाहेर पडलो. मेडिकल स्टोअरमधून दिलेली औषधे घेतली. माझ्या हाताचा कंप आता मला जाणवत होता. मी शांत असल्याचा वरून देखावा करत होतो. गाडीकडे जाताना पियूने माझा हात हातात घेतला. माझा कंप तिला जाणवू नये यासाठी मी प्रयत्न करत होतो. “बाबा, आपण लढू. कोणतीही स्टेज असू दे. आपण या संकटाशी दोन हात करू. मी, आई आणि तुमचा जावई आशीष हे सगळे तुमच्याबरोबरच आहोत. “ पियू एखाद्या योद्ध्याच्या आविर्भावात मला सांभाळत होती. पण तिचाही हा वरवरचा आवेशाचा पडदा गळून पडेल असे वाटत होते. आतापर्यंत नुसती शंकेची पालच चुकचुकत होती. आता त्या भीषण काळोखावर शिक्कामोर्तबच झाले होते. मी काळोख्या अरुंद बोगद्यातून वेगाने खाली खाली घरंगळत जात होतो. माझा तोल जाईल की काय? मी? मी कोण? मी कुठे चाललोय? कुठे पोहोचणार आहे? मृत्येचे हेच द्वार असेल काय?

घरी गेल्यावर वातावरणातला ताण हलका करण्याचा मी प्रयत्न करत होतो. पण हे सगळे प्रयत्न वरवरचे आहेत हे आतून जाणवत होते. जणू काही घडलेलेच नाही असे दाखवण्यासाठी छोट्या अर्जुनबरोबर खेळत, दंगा-मस्ती करत होतो. सगळ्यांच्या मनावरील ताण हलका होण्यासाठी मी सगळे प्रयत्न करत होतो. पण तरीही एखादा क्षण आतून हादरवून टाकत होता. दोन दिवसांत ऑपरेशनला सामोरे जायचे आहे. पैशाची सगळी व्यवस्था मी केलेलीच होती. माझी आर्थिक गुंतवणूक, सगळे आर्थिक व्यवहार एका डायरीत लिहून ते अनघाकडे दिले होतेच. आर्थिक विवंचना नसली तरी माझ्या ऑपरेशनमुळे अनेक समस्या निर्माण होणार होत्या. प्रियंकाच्या मुलाला अर्जुनला सांभाळण्यासाठी आम्ही दोघे कोकणातला बंगला बंद ठेवून इकडे पुण्यात आलो होतो. इथे आल्यावर मला तो त्रास जाणवू लागला होता. प्रियंकाचा थ्री बीएचके असल्याने कोणताच प्रश्न येत नव्हता. मृत्यू! आजपर्यंतच्या आयुष्यात किती लोकांचे मृत्यू पाहिलेत, ऐकलेत, पचवलेत. पण स्वतःच्या मृत्यूची जाणीव इतकी भयावह असू शकते? मृत्यूची जाणीव इतकी घुसळून काढू शकते?
माझ्या दिनक्रमात मी खंड पडू देत नव्हतो. पण परमेश्वर माझी परीक्षाच घेत होता. अनघा तर कसले कसले ज्यूस करून प्यायला लावायची. ती मनातून खचली होती. कोणी कसले औषध सांगितले की, ती ते औषध मला जबरदस्तीने घ्यायला लावायची. काही खावं तर ते उलटून पडायचं आणि ही तर कसली कसली औषधं, ज्यूस मला पाजायची. मला रागही यायचा. पण त्यातली तिची तळमळ समजायची व मी निमूटपणे सगळे घ्यायचो.

माझ्या ऑपरेशनमुळे अनघाला माझीच सेवा करावी लागणार. अर्जुनकडे आतासारखं लक्ष देता येणार नाही. घरातलं सगळं ती आज निगुतीने सांभाळतेय. ती तेवढं काम आता करू शकणार नाही. मला माझ्या शारीरिक वेदने एवढ्याच या समस्या मानसिक वेदना देत होत्या. आता इथून गावात जाणेही शक्य नव्हते. पियू माझ्याजवळ बसून माझ्या पाठीवरून हात फिरवित होती. आज तीच माझी आई झाली होती. तिचे शब्द मनाला आश्वस्त करत होते. “बाबा, तुम्ही आमचा कुठल्याही प्रकारचा विचार करू नका. आपल्याला परवा हाॅस्पिटलमध्ये जायचे आहे. तुम्हाला ऑपरेशनपूर्वी अॅडमिट व्हावे लागेल. काही चाचण्या घेतील. आता तुम्ही कोणताच विचार करायचा नाही. आशीष आणि मी आहोत ना? आम्ही सगळी व्यवस्था केली आहे.’’ ‘‘अग पण सगळं तिला एकटीला कसे जमणार?’’ बाबा आम्ही आहोत ना? असे काय करताय? मी काही दिवस रजा घेईन. अर्जुनला सांभाळण्यासाठी, स्वयंपाक कामासाठी बायका बघितल्या आहेत.
पियू माझा हात हातात घेऊन असच बोलत होती खूप वेळ. तिच्या आश्वस्त शब्दांनी मनाला धीर येत होता. माझ्या डोळ्यांतून वाहाणारे अश्रू खळकन पियूच्या हातावर पडले. पियूने माझे डोळे पुसले. ‘‘बाबा, प्लिज तुम्ही असे करू नका. तुमची ही गुड्डी आहे ना तुमच्याबरोबर. आशीषही आहेच.’’

मला भेडसावणाऱ्या घरातील समस्यांचा निचरा पियूने किती सहजतेने केला! आता माझ्या हातात काहीच नव्हते. जे घडेल त्याला सामोरे जाणे एवढेच आता मी करू शकत होतो. मृत्यू! जीवनाचा शेवट! पण जीवन म्हणजे तरी काय? या तीन अक्षरी शब्दाचा अर्थ किती व्यापक स्वरूपात पसरलेला होता! ७०, ७२ वर्षे या जीवाने जे सोसले, जे पाहिले, जे भोगले त्या साऱ्या शृंखलेचा आता अंत होणार होता. ती शृंखला अचानक तुटणार. जिवंतपणाचे एकमेव लक्षण असणारा श्वासही संपणार. मन, बुद्धी, मेंदू यांचे चाललेले अखंड कार्य आता संपणार. हे सारेच थांबण्याची जी प्रक्रिया घडेल त्या क्षणी आपल्याला त्याची जाणीव होत असेल काय? तेव्हा समोर काय असेल? फक्त एका प्रकाशाची जाणीव असेल की, काळाकुट्ट खोल खोल अंधार असेल? तो मुक्तीचा क्षण असेल की यातनामय असेल? असले काहीतरी विचार करत उगाचच मेंदूचा भुगा करण्यात आता काहीच अर्थ नव्हता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -