पूनम राणे
संवाद ही माणसाची भूक आहे. आणि उत्तम संवाद कौशल्य असणे, ही मानवाला मिळालेली अनमोल देणगी आहे.
निसर्गात पाहिले तर, सर्वांचा संवाद चाललेला असतो. पक्षी आपल्या किलबिलाटातून, निर्झर आपल्या खळखळाटातून, वसंत ऋतू धारेतून, शिशिर ऋतू गुलाबी थंडीतून. परंतु मानवाच्या बाबतीत हा संवाद सुसंवाद जेव्हा होतो, तेव्हा अनोखं व्यक्तिमत्व उदयाला येतं. आणि अशाच काही व्यक्तिमत्त्वांची ओळख स्नेहधारा या सदरातून मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे.विद्यार्थी मित्रांनो, यातून आपल्याला प्रेरणा मिळेल आणि आपल्याला आपल्या बलस्थानची ओळख होऊन आपल्या व्यक्तिमत्व विकास नक्कीच घडेल.मानवाला परमेश्वराने रंग, रूप, उंची दिली हे आपल्याला बदलता येत नाही.परंतु सुसंस्काराने आपल्याला आपले व्यक्तिमत्व मात्र निश्चित बदलता येते.आजची कथा आहे, उंचीने छोट्या असणाऱ्या एका मुलीची. बरं का मित्रांनो, शाळेत आपल्याला उंचीप्रमाणे बसवतात. उंची छोटी असल्याने प्रत्येक वेळेला अगदी दहावीपर्यंत पहिल्या बाकावर बसावे लागते आणि नेहमी बाईंच्या नजरेत राहावे लागते. त्यामुळे वर्गातील काही मुले उंचीने लहान असलेल्या मुलांना बुटकी, बुटुक बैंगन म्हणून चिडवतात.असेच एकदा या मुलीला वर्गातील मुलींनी चिडवले. ती घरी आली. दुखीकष्टी झाली आणि एक दिवस आईला म्हणाली, ‘‘आई, का, गं, अशी मी बुटकी!” देवाने मला उंची का दिली नाही? सांग ना गं आई. असे म्हणून ती रडायला लागली. आई तात्काळ म्हणाली , “वेडी गं वेडी’’ ‘‘अगं, तुला कोणी सांगितले की, उंची शरीराने मोजतात. अगं उंची बुद्धीची मोजतात, डोक्याची मोजतात.”तू वाईट वाटून घेऊ नकोस . ‘‘मला अभिमान आहे माझ्या लेकीच्या बुद्धीचा.” अगं तुझ्या डोक्याची उंची भली मोठी आहे याची जाणीव आहे का तुला. आई म्हणाली. आणि लक्षात ठेव, “तुझ्या हातून एवढे मोठे काम होईल की, तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या माणसाला तुझ्या गळ्यात हार घालताना वाकावं लागेल.”
असाच एक प्रसंग रक्षाबंधनाच्या दिवशी घडला. आई, “मी कुणाला राखी बांधणार? मला भाऊ का नाही.” आईने मात्र विचारपूर्वक उत्तर दिले ती म्हणाली, ‘‘भाऊ नाही काय म्हणतेस,” अगं, “आपल्यासमोर जे हनुमंताचे मंदिर आहे ना, तोच तुझा भाऊ!” शक्तिमान, बुद्धिमान, सामर्थ्यवान! चल, त्यालाच राखी बांध.”तिला खूप आनंद झाला, दरवर्षी ती हनुमंताला राखी बांधू लागली.आईच्या चपलक संवादातून मुलगी घडत होती. संस्कारित होत होती.व्यक्तिमत्व घडत होते. आईच्या डोक्यात आपल्या लेकीविषयी ठासून भरलेला अभिमान ऐकून मुलीच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. यानंतर ती कधी रागवलीच नाही. परमेश्वराला दूषण लावली नाहीत. ती अभ्यासात चमकत राहिली. प्रथम क्रमांक तिने सोडलाच नाही. मोठी पेडिॲट्रिक सर्जन झाली. सायन हॉस्पिटलची डीन झाली.आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठाची कुलगुरू ! बरं का मुलांनो, आज जे तुमच्या नावासोबत बाबांबरोबर तुमच्या आईचे नाव लावावे हा ठोस निर्णय ज्यांनी घेतला त्या डॉ. स्नेहलता देशमुख, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू. आईचे शब्द तंतोतंत खरे ठरले.त्यांचे बिंब- प्रतिबिंब, शब्द फुले, स्नेहमयी, पेडियाट्रिक सर्जरी, अरे संस्कार संस्कार, तंत्र युगातील उमलती मने, गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, या विषयावर पुस्तके व कॅसेटही प्रकाशित झाले आहेत.तसेच पॅरालॉजिक फाउंडेशन या संस्थेच्या उपाध्यक्ष, मुंबई मेडिकल फाउंडेशन या संस्थेच्या उपाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, हरगोविंद मेडिकल फाउंडेशनच्या उपाध्यक्ष तसेच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू अशी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत.
तात्पर्य : आईच्या उत्तम संवाद कौशल्यातून या प्रकारची महान व्यक्तिमत्व घडत असतात आणि अापल्या कर्तृत्वातून आभाळाएवढी उंची गाठून अजरामर होतात.