सरन्यायाधीश यांच्यामधील सर्वात वेगळेपण म्हणजे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सरन्यायाधीश म्हणून दाखवलेली उत्कटता आणि करुणा. सरन्यायाधीश म्हणून त्यांनी अनेक निवाडे दिले आहेत. डॉ. चंद्रचूड हावर्डमध्ये शिकलेले होते आणि त्यांनी घटनात्मक कायद्यात पीएच. डी. केली आहे. ते घटनात्मक कायद्यातील एक अधिकारी आहेत आणि त्यांचे कार्य आणि निर्णय जगाच्या विविध भागांतील न्यायालयांद्वारे संदर्भित केले जातात
ॲड. अमित कारखानीस एल. एल. एम. (यूके)
नुकतेच डॉ. डी. वाय. चंद्रचूड भारताचे सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. त्यांचा कार्यकाळ या देशाने पाहिलेल्या इतर अनेक सरन्यायाधीशांपेक्षा वेगळा होता. त्यांच्या आणि इतर सरन्यायाधीश यांच्यामधील सर्वात वेगळेपण म्हणजे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सरन्यायाधीश म्हणून दाखवलेली उत्कटता आणि करुणा. आपल्या कामाबद्दल एवढी तळमळ असणारा आणि समाजासाठी योगदान देण्याची ज्वलंत इच्छा असणारा न्यायाधीश आपल्याला क्वचित सापडतो. न्यायाधीश व सरन्यायाधीश म्हणून त्यांनी अध्यक्षपद भूषवलेले प्रत्येक िदवस अनोखे होते. मुंबई उच्च न्यायालयात ते भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल असताना मला त्यांना अनेकदा भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी ॲड. गिरीश कुलकर्णी (जे आता मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश आहेत) यांच्या हाताखाली काम करत असलेला कनिष्ठ वकील होतो.
एक कनिष्ठ वकील म्हणूनही आम्हाला त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर संवाद साधण्याची उत्तम संधी मिळाली, हा माझ्यासाठी देखील एक उत्तम शिकण्याचा अनुभव होता हे नमूद करावे लागेल. त्यानंतर त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि तेथे त्यांनी विविध प्रकारची कार्ये सांभाळली. एक कनिष्ठ वकील म्हणून आम्ही नेहमी त्यांच्यासमोर हजर राहण्यास उत्सुक होतो कारण त्यांच्याकडे खूप संयम होता आणि त्यांनी नेहमी कनिष्ठ वकिलांना स्वतःहून वाद-विवाद करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्यासमोर हजर राहताना कोणत्याही कनिष्ठ वकिलाला कधीही तणाव जाणवला नाही. कौटुंबिक प्रकरणांमध्ये आणि कुटुंबांमधील वादांमध्ये मध्यस्थी करण्यास प्रोत्साहन देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. यावरून प्रलंबितता कमी करण्याची आणि न्याय मिळवून देण्याची त्यांची आवड आणि इच्छा दिसून आली. त्यांनीच कनिष्ठ वकिलांना मध्यस्थ म्हणून नियुक्ती करण्याची आणि पक्षकारांमध्ये समझोता करण्यास प्रोत्साहन देण्याची प्रथा सुरू केली. या प्रथेला नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या इतर न्यायमूतींनी उचलून धरले. जे कनिष्ठ वकिलांच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास आणि आत्मविश्वास दर्शवते आणि आम्हा सर्वांसाठी खूप उत्साहवर्धक होते.
डॉ. डी. वाय. चंद्रचूड क्वचितच कोर्टात चिडले असतील. कोर्टात त्यांनी नेहमीच शांतता आणि संयम दाखवला. फार क्वचितच ते रागवत आणि जरी ते रागावले किंवा नाराज झाले तरी ते नंतर नम्र होत. सरन्यायाधीश म्हणून त्यांनी अनेक निवाडे दिले आहेत ज्यांनी स्वतःच एक इतिहास रचला आहे. गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून धारण करणारा पुट्टास्वामी प्रकरणातील त्यांचा निकाल उल्लेखनीय आहे. या देशातील कायदेशीर न्यायशास्त्रात देखील त्यांनी मोठे योगदान दिले आहे आणि त्यांचे कार्य व निर्णय पुढील अनेक वर्षे संदर्भित आणि लक्षात राहतील. डॉ. चंद्रचूड हावर्डमध्ये शिकलेले होते आणि त्यांनी घटनात्मक कायद्यात पीएच. डी. केली आहे. ते घटनात्मक कायद्यातील एक अधिकारी आहेत आणि त्यांचे कार्य आणि निर्णय जगाच्या विविध भागांतील न्यायालयांद्वारे संदर्भित केले जातात. बाबरी मशीद प्रकरणात त्यांनी घटनात्मक कायद्यातील त्यांच्या ज्ञानाचे श्रेष्ठत्व दाखवून दिले. त्यातच त्यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने प्रदीर्घ काळ चाललेला वाद सर्वांना मान्य होईल अशा पद्धतीने संपुष्टात आणला. कायद्याची अंमलबजावणी करताना कायद्याचा समतोल साधण्याचे आणि त्याचवेळी संविधानाचे पालन करण्याचे दुर्मीळ कौशल्य त्यांच्याकडे आहे. ते अत्यंत कष्टाळू आहेत आणि सरन्यायाधीश म्हणून आपल्या कार्यकाळात त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबितता कमी करण्यासाठी त्यांनी विविध धोरणे राबवली. त्यांनी ऑनलाइन सुनावणीला प्रोत्साहन दिले. ऑनलाइन सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या ज्यामुळे पक्षकारांसाठी खटल्याच्या खर्चात बचत झाली. सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट आता वापरण्याकरिता अत्यंत सोयीस्कर झाली आहे आणि कोणीही निवाड्यांमध्ये विनामूल्य प्रवेश करू शकतो. डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सुप्रीम कोर्टात आता एक यूट्युब चॅनेल आहे आणि घटनापीठासमोरील प्रकरणे थेट प्रक्षेपित केली जातात.