भारताच्या दृष्टीने समाधानकारक बाब म्हणजे ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर निकटचे संबंध आहेत. मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियममध्ये ट्रम्प यांना फिरवले होते, तेव्हा ’’अगली बार ट्रम्प सरकार’’ असा नारा दिला होता.
अभय गोखले
डोनाल्ड ट्रम्प परत आलेत. अर्थात ते परत येणारच होते, मात्र अमेरिकेतील बऱ्याच जणांना असे वाटत होते की, त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस या त्यांना अटीतटीची लढत देतील. तो अंदाज खोटा ठरवत, ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना सहजरीत्या पराभूत केले आहे. हा लेख लिहीत असताना, ट्रम्प यांना २९५ इलेक्टोरल व्होटस मिळाली होती, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांना २२६ इलेक्टोरल व्होटस मिळाली होती. विजयासाठी आवश्यक असणारा २७० हा जादूई आकडा ट्रम्प यांनी केव्हाच पार केला आहे. मात्र कमला हॅरिस या जादूई आकड्यापासून बऱ्याच लांब राहिल्या आहेत. पेन्सिल्वेनिया, जॉर्जिया आणि विस्कॉन्सिन या राज्यांचा ट्रम्प यांच्या विजयात मोलाचा वाटा आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सेनेटच्या काही जागांसाठी झालेल्या मतदानात डेमोक्रॅट्सकडून तीन जागा खेचून घेतल्याने, त्यांना सेनेटमध्ये बहुमत मिळाले आहे. प्रतिनिधी सभागृहात रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाल्यास अध्यक्ष आणि काँग्रेस एकाच पक्षाचे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल आणि ट्रम्प यांचे हात आणखी बळकट होतील. महाभियोग, निरनिराळे खटले यांना मागे सारून ट्रम्प पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. स्थलांतरितांबाबत ट्रम्प यांची कडक भूमिका, हल्ल्यातून बचावल्यामुळे त्यांना लाभलेली सार्वत्रिक सहानुभूती, त्यांच्या आर्थिक धोरणाविषयी सर्वसाधारणपणे अनुकूल जनमत या गोष्टी ट्रम्प यांच्या विजयासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या आहेत.
अमेरिका फर्स्ट ही ट्रम्प यांची स्लोगन अमेरिकेतील बहुसंख्य मतदारांना भावलेली दिसत आहे. भारताच्या दृष्टीने समाधानकारक बाब म्हणजे ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर निकटचे संबंध आहेत. मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियममध्ये ट्रम्प यांना फिरवले होते, तेव्हा “अगली बार ट्रम्प सरकार’’ असा नारा दिला होता. ती गोष्ट अध्यक्ष जो बायडेन यांनी गंभीरपणे घेतली नाही, हे बरे झाले. ट्रम्प यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्याचा सर्वात जास्त आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाला असेल. ट्रम्प यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बोलण्यात सातत्य नसते. कधी ते भारताशी खूप जवळीक दाखवतात, तर कधी ते भारताविषयी वादग्रस्त वक्तव्य करून भारताची नाराजी ओढवून घेतात. आपल्या अगोदरच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवून भारताची नाराजी ओढवून घेतली होती. अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर सर्वात जास्त कर भारताकडून आकारला जातो अशी टीका ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान केली होती. आता या बाबतीत ट्रम्प प्रशासनाने जशास तशी भूमिका घेतली तर भारताला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागेल. आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये ट्रम्प यांचे भारताविषयी काय धोरण राहिले हे जवळून पाहावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरील ट्रम्प यांची मैत्री कितपत लाभदायक ठरते ते पाहावे लागेल. स्थलांतरितांविषयीच्या ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेचा सर्वात जास्त फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर चीनबाबत ट्रम्प यांची असलेली आक्रमक भूमिका भारताच्या पथ्यावर पडू शकेल. अर्थात तैवानबाबत त्यांनी या अगोदर घेतलेली भूमिका विचित्र होती. तैवानला चीनपासून संरक्षण हवे असेल, तर अमेरिका प्रोटेक्शन मनीची मागणी करू शकेल असे विधान त्यांनी पहिल्या टर्ममध्ये केले होते.
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची ट्रम्प यांच्याबरोबर असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. त्याचा परिणाम म्हणजे रशिया – युक्रेन संघर्षात युक्रेनची बाजू कमकुवत होऊ शकेल. ट्रम्प यांनी युक्रेनला अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीत कपात केल्यास, युक्रेनला त्याचा मोठा फटका बसू शकेल, शिवाय रशिया आणखी आक्रमक होऊ शकेल. नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन)बाबत ट्रम्प यांची भूमिका फारशी अनुकूल नसल्याने नाटोमधील सदस्य राष्ट्रांना आता संरक्षणासाठी अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून राहता येणार नाही. अमेरिका फर्स्ट या ट्रम्प यांच्या आग्रही भूमिकेमुळे जागतिक व्यापारावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या भारताच्या आश्रयाला आलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्यासाठी, ट्रम्प यांचे पुनरागमन दिलासादायक ठरणार आहे.शेख हसीना आणि ट्रम्प यांच्यातील जुने मैत्रीचे संबंध, त्यांचे बांगलादेशात पुनर्वसन करू शकतील का, ते पाहावे लागेल. ट्रम्प यांचे वागणे नेहमीच अनाकलनीय राहिले आहे. २०२० मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव होऊनही, त्यांनी पराभव स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी त्यांच्या रिपब्लिकन साथीदारांना त्यांना सांगावे लागले की, आता पुरे झाले, पराभव स्वीकारा. तर असे आहेत डोनाल्ड ट्रम्प. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करा असे बहुधा ट्रम्प यांना सांगायचे असते. अमेरिकेतील मतदार प्रगल्भ आहे, तरीसुद्धा ट्रम्प यांच्यासारख्या वादग्रस्त व्यक्तीवर त्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. जो बायडेन हे सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याने, नाईलाजाने अमेरिकन मतदारांनी ट्रम्प यांना पुन्हा संधी दिली असावी.