भालचंद्र ठोंबरे
गवान श्रीकृष्ण, मानवी रूपातील साक्षात देवच. त्यामुळे त्यांची प्रत्येक गोष्ट ही न्यायोचीत, अद्भुत तसेच मानवी तसेच दैवी लिलाच होती, जसे द्रौपदीचे लज्जारक्षण, जयद्रथ वधाच्या वेळीचा भासमान सूर्यास्त, शिशुपालाचा वध, कौरव सभेतील आपले विराट रूपदर्शन वगैरे सर्व अद्भुतच. तरी मानवी अवतारामुळे मानवाने पाळावयाचे नियमही त्यांनी कसोशीने पाळले. श्रीकृष्ण मानवी रूपातील साक्षात भगवानच होते. त्यामुळे त्रिकाल ज्ञानी व सर्वज्ञ असणारच यात शंकाच नाही; परंतु मानवी जन्मातील त्यावेळीच्या रीतीरीवाजाप्रमाणे मुलांनी गुरुकुलमध्ये जाऊन विद्याग्रहण करणे हा एक आवश्यक भाग होता. त्यासाठी श्रीकृष्ण बलरामासह संदीपनी ऋषींच्या आश्रमात विद्यार्जनासाठी गेले. गुरुकुलात त्यांनी गुरू आज्ञेप्रमाणे आचरण करून विद्याग्रहण केली. गुरू आज्ञा पालन, गुरू मातेसाठी जंगलातून लाकडे आणणे, पाणी भरणे, पूजेची तयारी करणे, तसेच गुरू व गुरू माता सांगेल त्याप्रमाणे काम करून विद्यार्जन करणे आदी दिनचर्या त्यांनी मानवी रीतीरीवाजाप्रमाणेच केल्या. विद्यार्जन पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणा देणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य असते. त्यानुसार श्रीकृष्णांनी गुरू संदीपनींना गुरुदक्षिणेत मी काय द्यावे त्याप्रमाणे आज्ञा करावी, अशी विनंती केली. मात्र गुरू संदीपनी म्हणाले, दक्षिणेच्या लालचेने केलेले ज्ञानदान हे खऱ्या गुरूचे कर्तव्य नव्हे. त्यामुळे मला काहीही नको. मात्र देण्याची इच्छाच असेल तर मला एकच वचन द्या की, मी दिलेल्या विद्येचा, ज्ञानाचा उपयोग जग कल्याणासाठी तसेच मानवी कल्याणासाठीच करावा. त्याचा दुरुपयोग करू नये, तसेच कोणालाही दुःखी अथवा कोणावरही अन्याय करण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग करू नये एवढीच इच्छा आहे.
गुरूंना त्यांनी सांगितलेल्या शब्दाचे काटेकोर पालन केले जाईल, असे आश्वासन देऊन श्रीकृष्ण गुरू मातेजवळ निरोप घेण्यासाठी गेले. गुरू मातेलाही मी आपल्यासाठी काय करावे अशी आपली इच्छा आहे, अशी विचारणा केली. मला जे हवे ते मला कोणी देऊ शकणार नाही असे गुरू माता म्हणाली. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आपण मागून तर पाहा. तेव्हा पूत्रवियोगाने दुःखी असणारी गुरू माता म्हणाली, माझा एकुलता एक पुत्र पुनर्दत्त तरुणपणीच मरण पावला. तो मला परत आणून देऊ शकशील का? अशी मातेने कळवळून विचारणा केली. माते त्याला काय झाले होते? तो कसा मरण पावला? मला सर्व सांग, असे भगवान कृष्ण म्हणाले. तेव्हा माता म्हणाली, प्रभास क्षेत्रात पुण्यस्नानासाठी आम्ही सहकुटुंब गेलो असता तो सागर किनारी गेला. त्याचवेळी सागराच्या एका लाटेने तो समुद्रात ओढला गेला व तेव्हापासून तो आम्हा सगळ्यांना परका झाला.
गुरू मातेचे सात्वंन करून व शोक न करण्यास सांगून भगवान श्रीकृष्ण सागराकडे गेले. सागराला प्रार्थना करून आपला गुरू पुत्र परत करण्याची त्याला आज्ञा केली. सागराने प्रकट होऊन आपल्या अंतरंगात खोलवर असलेल्या शंखासूर (पांचजन्य) नावाच्या राक्षसाने बहुधा त्या गुरुपुत्राला गिळंकृत केले असावे, अशी शक्यता नम्रपणे व्यक्त केली. तेव्हा श्रीकृष्णाने सागरात जाऊन शंखात झोपलेल्या पांचजन्न्यास युद्धासाठी पुकारले व त्याचा वध केला. मात्र तेथेही गुरू पुत्र पुनर्दत्त दिसला नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण यम राजाकडे गेले व त्यांच्याकडे गुरू पुत्राची मागणी केली. यमदेव म्हणाले, हे भगवंत माझ्याकडे आलेले सर्व प्राणीमात्र जीवात्म्याच्या रूपातच असतात. त्यामुळे मी त्याचा केवळ आत्मा देऊ शकतो असे नम्रपणे सांगून यमदेवाने पुनर्दत्तचा आत्मा भगवान श्रीकृष्णाच्या स्वाधीन केला. भगवान श्रीकृष्णाने त्याला मानवी शरीरप्रदान करून त्याला घेऊन गुरुमाता व गुरूकडे आले. आपल्या पुत्राला जिवंत पाहून माता व संदीपनी गुरूंना अत्यानंद झाला. गुरू मातेने श्रीकृष्णाला ज्याप्रमाणे तू मला आनंदी केले त्याचप्रमाणे सर्व जगातील दु:खी जनतेचे दुःख हरण करण्याची शक्ती देव तुम्हाला देवो असा आशीर्वाद दिला. अशाप्रकारे असामान्य अशी गुरुदक्षिणा भगवान श्रीकृष्णाने आपल्या गुरू दाम्पत्याला दिली.