Saturday, February 8, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमनका विश्वास कमजोर हो ना...

मनका विश्वास कमजोर हो ना…

श्रीनिवास बेलसरे

हिंदी सिनेगीतांनी आपल्याला खूप काही दिले आहे. प्रेमगीते, अंगाईगीते, सणावारासाठी खास गाणी, समरगीते, राष्ट्रभक्तीपर गाणी, भजने, कव्वाल्या, अगदी विनोदी गाणीही दिली आहेत. त्यातला एक प्रकार आहे प्रेरणादायी गाण्यांचा! मन कितीही उदास असले तरी काही गाणी ऐकल्यावर जणू हरवलेली सकारात्मकता पुन्हा सापडल्यासारखे वाटते. आयुष्य पुन्हा नव्या जोमाने जगायची उमेद मिळते. ‘अंकुश’ नावाचा सिनेमा आला होता १९८६ साली. सुभाष दुर्गकर यांनी निर्माण केलेला आणि चंद्रशेखर नार्वेकर ऊर्फ ‘एन.चंद्रा’ यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा केवळ १२ लाखांत तयार झाला आणि त्याने धंदा मात्र ९५ लाखांचा केला इतका तो यशस्वी झाला! प्रमुख भूमिकेत होते नाना पाटेकर, निशा सिंग, मदन जैन, अर्जुन चक्रवर्ती, महावीर शहा, राजा बुंदेला, रवी पटवर्धन, सुहास पळशीकर, दिनेश कौशिक आणि आशालता वाबगावकर. नार्वेकर यांच्यावर गुलजार यांच्या दिग्दर्शनाचा, विशेषत: त्यांच्या ‘मेरे अपने’(१९७१)चा प्रभाव होता. त्यातून अंकुशची निर्मिती झाली. ‘मेरे अपने’मधील विनोद खन्नाच्या भूमिकेसाठी नार्वेकरांनी रवींद्र महाजनींना डोळ्यांसमोर ठेवले होते; परंतु मानधनाच्या रकमेवरून ही भूमिका नाना पाटेकरांकडे गेली. त्यांनी केवळ १०,००० रुपयांत ही संस्मरणीय भूमिका वठवली. अंकुशचे दोन रिमेकही आले. तमिळमध्ये ‘कविताई पादा नेरामिल्लाई’ तर कन्नडमध्ये ‘रावण राज्य’ या नावाने.

मुंबईत राहणारे चार बेकार तरुण प्रामाणिकपणे कष्ट करून जगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या शेजारी एक वृद्धा आणि त्यांची सुंदर मुलगी येते. एक दिवस तिच्या कंपनीचा मालकच तिच्यावर अत्याचार करतो. दु:खाने ती आत्महत्या करते. कायद्याचे सोपस्कार पार पडून नेहमीप्रमाणे अत्याचारी सुटतात आणि एका सज्जन मुलीचा असा अंत पाहून या तरुणांना संताप अनावर होतो. मग ते सुडाने पेटून उठतात आणि सामूहिक बलात्कारातील सर्व गुन्हेगारांना एकेकटे गाठून ठार करतात. इतका काळ निद्रिस्त असलेली न्यायव्यवस्था आरोपी सामान्य तरुण आहेत हे पाहून नेहमीप्रमाणे जागी होते आणि चारही मुलांना फाशीची शिक्षा देते अशी ही कथा होती. एक प्रार्थनावजा गाणे अनिता आणि तिची आई रोज म्हणत असते. त्या दोघी या तरुणांनाही त्या प्रार्थनेत सामील करून घेत असतात. पुष्पा पागधरे, सुषमा श्रेष्ठ आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या कर्णमधुर गाण्याला संगीत होते कुलदीप सिंग यांचे. मोजकीच पण अतिशय आशयघन गाणी लिहिलेल्या अभिलाष यांच्या तब्बल ४ कडव्यांच्या या गाण्यातील दोनच कडवी सहसा ऐकायला मिळतात. हे गाणे कधीही ऐकले तरी एक प्रसन्न वातावरण तयार होतेच. गाण्याचे शब्द होते –

‘इतनी शक्ति हमें देना दाता,
मनका विश्वास कमजोर हो ना.
हम चलें नेक रस्ते पे हमसे,
भूलकर भी कोई भूल हो ना.’

सुदामाचे मित्र प्रेम

जुन्या काळच्या बहुतेक भक्तीगीतात संपूर्ण शरणागतीची भूमिका असे. त्रासलेला भाविक देवाची करुणा भाकत आहे असेच दृश्य असे. अलीकडच्या अशा गाण्यात मात्र एक वेगळी भावना डोकावताना दिसते. ‘देवा, आम्ही आव्हानांना सामोरे जाऊ. तू फक्त आम्हाला ती पेलण्याची शक्ती दे.’ असा आत्मविश्वासपूर्ण सूर नंतरच्या अनेक गाण्यात दिसतो. आम्हाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढ, ज्ञानाचा उजेड दे. आम्हाला वाईटापासून दूर राख, कुणाबद्दलही आमच्या मनात वैराची, सुडाची भावना नसावी असा काहीसा संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ‘कोण्याही जीवाचा न घडो मत्सर’सारखा विचार अभिलाषजींनी मांडला होता.

‘दूर अग्यान के हो अँधेरे,
तु हमें ग्यानकी रौशनी दे,
हर बुराईसे बचते रहें हम,
जितनी भी दे भली ज़िन्दगी दे.
बैर हो ना किसीका किसीसे,
भावना मनमें बदलेकी हो ना.
इतनी शक्ति हमें देना…’

समाजाकडून काय मिळाले आहे असा विचार न करता आम्ही समाजाला काय देतो ते महत्त्वाचे मानायला आम्हाला शिकव, आमच्या वागण्याने इतरांना आनंद मिळावा, सर्वांचे जीवन सुखी व्हावे असे कर. अमंगलाला पवित्र करण्याच्या गंगाजलाच्या शक्तीबद्दलची श्रद्धा अलगद सूचित करताना कवी म्हणतो, ‘परमेश्वरा, आमच्या मनातल्या प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात तुझ्या करुणेचे जल वाहू दे, आमची मने धुवून निर्मल, पवित्र कर, आमचा चांगल्यावरचा विश्वास सुरक्षित राहू दे.

‘हम न सोचें हमें क्या मिला है,
हम ये सोचें किया क्या है अर्पन.
फूल खुशियोंके बांटें सभीको,
सबका जीवनही बन जाए मधुवन,
अपनी करुणाका जल तू बहाके,
कर दे पावन हर एक मनका कोना.’

सिनेमात मांडलेले वास्तवही कवी दुर्लक्षित करत नाही. उलट तेच मांडताना म्हणतो, ‘आज सगळीकडे अत्याचार आहेत, निरागसांची अगतिकता आहे. प्रत्येकजण धास्तावलेला आहे, जगभर पापाचे ओझे वाढताना दिसते आहे. परमेश्वरा, ही तुझी धरणी कशी काय तग धरून आहे ते तूच जाणतोस. आता दया कर, तुझे ममत्व दाखव, पापाचा अंत कर, नाहीतर तुझे हे जग वाचणे अशक्य दिसते.

हर तरफ जुल्म हैं, बेबसी हैं,
सहमा सहमासा हर आदमी हैं.
पापका बोझ बढताही जाये,
जाने कैसे ये धरती थमी हैं.
बोझ ममतासे तू ये उठा ले,
तेरी रचनाका ही अंत हो ना,
हम चले नेक रस्तेपे हमसे…

कवी देवाकडे जागृतीचा प्रकाश मागतो आहे. तो म्हणतो, आम्ही जर अत्याचारांचा बदला घ्यायला निघालो, तर स्वत:मधला तुझा अंश हरवून बसू. उलट आम्हाला आमच्या चुकीची शिक्षा मिळाली, मग ती मृत्यूदंड का असेना, ती शांतपणे भोगावी अशी बुद्धी दे. संताप, वेदना, सूडभावनेने घेरलेल्या कालच्या दिवसासारखा आमचा आजचा दिवस नसू दे.

हम अँधेरे में हैं रोशनी दे,
खो ना दे खुदको ही दुश्मनीसे.
हम सज़ा पायें अपने किएकी,
मौत भी हो तो सहले ख़ुशीसे.
कल जो गुज़ारा है फिरसे ना गुज़रे,
आनेवाला वो कल ऐसा हो ना…
इतनी शक्ति हमें देना…

अशी गाणी त्या त्या सिनेमाच्या कथेपलीकडे जातात. मनाला प्रसन्न, चिंतनशील बनवतात. खरे तर त्या निर्मल मनाने केलेल्या सुंदर प्रार्थनाच असतात. आज सगळ्याच चांगल्या गोष्टींवरचा विश्वास उडून जावा असे दिवस असताना ‘मनका विश्वास कमजोर हो ना’ ही प्रार्थना किती महत्त्वाची आहे ते लक्षात येते आणि एखाद्या प्रसंगाला निगडित ठेवतानाही गाण्यात इतका व्यापक आशय ठेवणाऱ्या गीतकाराचे कौतुक वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -