भालचंद्र ठोंबरे
पुराणातील श्रीकृष्ण व सुदाम्याची मैत्री ही कोणत्याही प्रकारची उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, असा भेदाभेद न पाळता असणाऱ्या अतूट मैत्रीचे प्रतीक आहे. तसेच ते सुदाम्याने आपल्या परम मित्रासाठी केलेल्या त्यागाचेही प्रतीक मानले जाते. भगवान श्रीकृष्ण व सुदामा हे संदीपनी ऋषींच्या गुरुकुलात अध्ययन करीत होते. या जीवनात गुरुची आज्ञा पाळणे, गुरू सांगतील ती सेवा करून ज्ञान मिळवणे हे अपेक्षित असते. एके दिवशी गुरुपत्नीने श्रीकृष्ण व सुदामा यांना जंगलातून लाकडे आणण्यास सांगितले. जाताना सुदाम्याजवळ एका पोतडीत चणे देऊन भूक लागल्यास तुम्ही दोघेही यातील अर्धेअर्धे घ्या असे सांगितले. जंगलात गेल्यानंतर अचानक आलेल्या पावसापासून रक्षण करण्यासाठी दोघेही एका झाडावर चढले. श्रीकृष्ण बसले त्यापेक्षा उंच व न दिसेल अशा ठिकाणी सुदामा जाऊन बसला. थोड्या वेळाने सुदामाला भूक लागली. तेव्हा त्याने पोतडीतील चणे हळूहळू खाण्यास सुरुवात केली. कोणी काही तरी खात असल्यासारखा आवाज आल्याने कृष्णाने सुदामाला विचारले, सुदामा कसला आवाज येतोय? तू काही खात आहेस का? तेव्हा सुदामा म्हणाला काही नाही. थंडीमुळे माझे दात कडकडा वाजत आहेत, त्याचा आवाज आहे. असे म्हणून सुदाम्याने सर्व चणे खाऊन टाकले.
या संदर्भात एका पौराणिक आख्याकिकेनुसार संदीपनी ऋषींच्या गुरुकुलापासून थोड्या अंतरावर गावात एक गरीब वृद्ध ब्राह्मण स्त्री राहत असे. ती दिवसभर गावात भिक्षा मागून ते सेवन करीत असे. एकदा सततच्या पावसामुळे तिला पाच दिवस सतत उपास घडला. सहाव्या दिवशी ती गावात फिरत असतात तिला संध्याकाळच्या समयी एक पोतडी थोडे चणे दान म्हणून मिळाले. उद्या सकाळी देवाला नैवेद्य अर्पण करून मगच आपण त्याचे ग्रहण करू या विचाराने तिने ते ठेवून दिले. काही चोरांनी धनाच्या आशेने ती पोतडी पळवली. चोरांची चाहूल लागताच वृद्ध ब्राह्मणीने गलबला केला. चोर पळून गेले ते संदीपनी ऋषींच्या आश्रमात लपले; परंतु तेथूनही पळून जाताना त्यांच्या जवळील पोतडी आश्रमात पडली.
इकडे चण्याची पोतडी चोरी जाताच भुकेल्या वृद्ध ब्राह्मणीने कळवळून चोरांना श्राप दिला की, जो कुणी या पोतडीतील चणे खाईल तो कायम दारिद्र्यात राहील. ही शापवाणी जंगलातून परत येणाऱ्या व ही घटना पाहणाऱ्या सुदामाच्या कानी पडली.
दुसऱ्या दिवशी गुरू पत्नीला झाडताना आश्रमात ही पोतडी सापडली. ती उघडून पाहता त्यातील चणे तिला दिसले. तेव्हा जंगलात लाकडे आणण्यासाठी जाणाऱ्या कृष्ण व सुदामासाठी तिने ही पोतडी सुदामाच्या हवाली केली व भूक लागल्यास यातील चणे दोघांनी मिळून ग्रहण करा असे सांगितले. पोतडी हाती पडतात व त्यातील चणे पाहताच सुदामाला वृद्ध म्हातारीची शापवाणी आठवली. तेव्हा सुदामाने विचार केला मी मूळचाच एक गरीब आहे त्यामुळे मी गरिबीतच राहिल्याने फारसा फरक पडणार नाही. मात्र श्रीकृष्ण व त्याचे पिता एक प्रतिष्ठित व संपन्न घराण्यातले आहेत त्यांना जर गरिबी आली, तर आपल्या परम मित्राला गरिबीत आयुष्य घालवावे लागेल. त्यामुळे कान्हाने (श्रीकृष्णाने) हे चणे खाल्ल्यास आपल्या मित्राला नाहक वृद्ध ब्राह्मणीच्या कोपाला बळी पडावे लागेल. म्हणून सुद्धा सुदामाने सर्व चणे स्वतःच खाऊन टाकले. अशाप्रकारे मित्र प्रेमासाठी स्वतः सुदामाने दारिद्र्यात राहण्याचा धोका पत्करला. सर्वज्ञानी भगवान श्रीकृष्णाला यांचे ज्ञान होते, म्हणूनच जेव्हा सुदामा कृष्णाच्या भेटीला येतो तेव्हा सुदामाचा हा त्याग जाणून भगवान श्रीकृष्ण त्याला आलिंगन देऊन साश्रुनयनाने त्याचे चरण धुतात व सुदामाने काहीही न मागता त्याला सर्व प्रकारची धनसंपत्ती सुख-समृद्धी प्रदान करतात.