पल्लवी अष्टेकर
स्रीच्या जीवनातील विविध टप्पे, जसे की मुलगी, तरुणी, आई, आजी. अशा वेगवेगळ्या वयात तिच्या भूमिका निरनिराळ्या असतात. ‘मुलगी’ असताना अवखळ, हुंदडणारी, आई-वडिलांची लाडकी लेक. ‘तरुणी’ या रूपातील स्त्री, म्हणजे काॅलेजात शिकणारी, असंख्य गोष्टींची जाण येणारी, तारुण्यातील मोरपंखी दिवसांमध्ये रमणारी. ‘आई’ या रूपातील स्त्री म्हणजे अनेक जबाबदाऱ्यांचे भान असलेली, आपल्या मुलांची काळजी घेणारी, त्यांच्या भवितव्याबद्दल चिंता असणारी, त्यांच्यासाठी क्षणोक्षणी धावणारी. आजीबाईच्या रूपातील स्त्री म्हणजे बऱ्याचशा सांसारिक जबाबदाऱ्या संपत आलेली, नातवंडांवर सायीसारखी माया करणारी, विचारांनी परिपक्व असलेली, सुनेला-मुलीला सल्ले देणारी, त्यांच्या अडी-अडचणींमध्ये मार्ग दाखविणारी. आजीची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. यातील आजीची निरनिराळी रूपे अनेक अनुभवांवर अवलंबून असतात.
आमच्या एम. जी. रोडवरून फिरताना फुटपाथच्या एका कोपऱ्यावर मला एक आजीबाई झेंडूची फुले व हार घेऊन बसलेल्या दिसतात. त्यांच्यापाशी बेल व दुर्वाही असतात. नऊवारी लुगड्यातल्या या आजी तल्लीन होऊन हार करत असतात. मोठी सुई व जाड दोरा घेऊन त्यांच्या झेंडूच्या माळा करणे सुरू असते. आजींचे सुरकुतलेले हात, डोक्यावर पदर, डोळ्यांवर चष्मा असे सर्व रूप असते. या आजीबाईंकडून मी अनेकदा हार विकत घेतला आहे. मला बरेचदा वाटते की, या आजीबाईंसोबत बसून थोडा वेळ गप्पा कराव्यात. पण तशी संधी अजून मला मिळाली नाही. अंदाजे दरेक अर्ध्या-पाऊण तासांनी कोणीतरी गिऱ्हाईक येऊन आजीबाईकडून हार अथवा फुले घेऊन जात. त्यामुळे त्यांच्यासोबत बसून गप्पा करायला इच्छा असूनही शक्य होत नसे. त्यांच्या उत्साही स्वभावाचे व धडपडणाऱ्या वृत्तीचे मला नेहमी कौतुक वाटत असे.
मला कोल्हापूर जवळील पन्हाळा येथील अंबरखाना येथे अजून एक आजी भेटली. त्यांना काहीजण मुडेकर मावशी असेही म्हणतात. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी चुलीवरच्या गरमागरम भाकरी, पिठले, भरलेलं वांग, अख्खा मसूर, मिरचीचा ठेचा त्या बनवितात. सोबत पिण्यासाठी दाटसर ताकही असते. पन्हाळ्याची स्वच्छ, थंडगार हवा, भरपूर वारा यामुळे फिरून, वेगवेगळी ठिकाणे पाहून आलेल्या पर्यटकांना कडकडून भूक लागते. तेव्हा लोक ‘दुर्वा समर्थ नाष्टा सेंटर’ या मुडेकर आजींच्या नाष्टा सेंटर येथे थांबतात. मुडेकर आजींच्या चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या तुमच्या समोरच होत असतात. आम्ही त्यांच्याकडे जेवणाचा आस्वाद घेत असताना अजून दहा-पंधरा माणसे तिथे जेवायला आली. पाठोपाठ दोन-तीन भाकऱ्या माणसे सहजा-सहजी रिचवत होती. मुडेकर आजींचा मुलगा आपल्या आईच्या हाताला किती चव आहे ते सांगत होता आणि खरंच याची प्रचिती सर्वांना येत होती. अंगावर नायलाॅनची साडी, गळ्यात दोरी लावलेला मोबाईल व पुढील मोठ्या डब्यातील भाकरीचे पीठ परातीत घेऊन भराभर भाकरी करणाऱ्या मुडेकर आजी म्हणजे उत्साहाचे प्रतीक. मी मुडेकर आजींना विचारले, “अंदाजे दिवसाला किती भाकऱ्या बनविता?’’
“तसे काही नाही. जसे लोक येतात, तशा गरमागरम भाकऱ्या मी बनविते, काही वेळा सकाळी १०.३० वाजता सुरू केलेल्या भाकऱ्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालू राहतात.” याआधी सकाळी १०.३०च्या सुमारास त्यांनी पिठलं, अख्खा मसूर, तेलवांग, ठेचा हे पदार्थ तयार ठेवलेलेे असतात. जाताना अनेकजण मुडेकर आजींच्या जेवणाचे कौतुक करून जातात. अशाप्रकारे आपल्या कुटुंबाला मदतीचा हात देणाऱ्या स्वावलंबी व स्वाभिमानी मुडेकर आजी सर्वांना प्रिय आहेत. मालू आजी म्हणजे एक अजब रसायन आहेत. त्यांचा नवरा मिलिटरीमध्ये जवान होता. तो जेमतेम वयाच्या पस्तीशीच्या आसपास असताना, एकदा त्याच्या स्वत:च्या हाताने त्याच्या बंदुकीचा दट्ट्या ओढला गेला व त्याच्या डोक्यात गोळी जाऊन तो मरण पावला. मालूसाठी हा मोठा धक्काच होता. आता दोन मुलांची जबाबदारी मालूवर पडली. नवऱ्याच्या निधनाने तिचे जग होत्याचे नव्हते झाले. माहेरच्या आधाराने ती आपल्या मुलांसहित जीवन व्यतित करू लागली. भावांना शेतीकामात जमेल तशी मदत करू लागली. पाठोपाठ वर्षे संपत होती. आता जरा सावरलेल्या मालूने गावात स्वत:चे छोटेसे घर बांधले. मुलीचे लग्न करून दिले. मालूचा मुलगा मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर पोहोचला. मालूने त्याचे लग्न करून दिले. काही वर्षांत मालूची मालू आजी झाली. आता नातवंडात मालू आजी मन रमविते.
कुमुद आजींचा स्वभाव सर्वांशी मिळते-जुळते घेणारा होता. त्यांनी सुरुवातीलाच ठरविले होते की, आपण मुलाशी व सुनेशी जुळवून घेत त्यांच्या संसाराला मदत करायची. कुमुद आजींनी साड्या विकून आपल्या पतीच्या मागे संसाराला हातभार लावला होता. त्यांचा एकुलता एक मुलगा अजय याला आपल्या आईच्या अतोनात कष्टांची जाणीव होती. अजयची बायको जया हिला माॅँटेसरीचा कोर्स केल्यानंतर एका शाळेत नोकरी मिळाली. कुमुदताईंनी आपल्या नातीला – मधुराला, सांभाळण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली. अजयची नोकरी चांगली होती. कुमुदताईंचा दिवस आपल्या नातीसोबत, मधुरा सोबत पटकन संपून जाई. तिला भरविणे, गोष्टी सांगणे, संध्याकाळी देवळात, बागेत घेऊन जाणे इ. गोष्टींमुळे कुमुदताई व्यस्त राहात असत. संध्याकाळी मधुराचे आई-वडील घरी परतले की, आजी तिचे वाचन, टी. व्ही. पाहाणे अशा गोष्टी करायची. हळूहळू सहवासाने आजीचे व मधुराचे नाते दृढ होत गेले. आजी कधी तरी मधुराच्या सोसायटीतील मैत्रिणींसोबत भातुकली, कॅरम, सापशिडी अशा खेळात व्यस्त होई. आजी व नातवंडे यांच्या सहवासातून प्रेम, सुरक्षितता, आपलेपणा, संस्कार या गोष्टी मुलांमध्ये रुजत जातात. आधुनिक काळात मोबाईल, लॅपटाॅप, आय-पॅड यासारखी असंख्य साधने मुलांच्या करमणुकीसाठी उपलब्ध आहेत; परंतु ही साधने आजीसारखी मुलांवर थोडी ना माया करणार? आजी व नातवंडे यांच्या सहवासातील रुजवातीमुळे मुलांमध्ये अनेक चांगल्या गोष्टींना सुरुवात होऊ शकते.
आधुनिक काळात चौकोनी कुटुंबे, आजीचे वैयक्तिक स्वातंत्र्य अशा कारणांनी आजी व नातवंडातील नाते रूक्ष होत जाण्याची शक्यता जास्त आहे. आजीपाशी अनुभव, आठवणी, शहाणपणा यांचा साठा भरपूर असतो. आजी या संज्ञेत आदर, ऊबदारपणा व कौटुंबिक बंधाची खोल भावना असते. ज्या मुलांचे पालक परदेशात कायमस्वरूपी स्थायिक झालेले आहेत, ती मुले आजी-आजोबांच्या प्रेमाला, सहवासाला पारखी होतात, तेव्हा केवळ फोनवर बोलून परस्परांना समाधान मानावे लागते. त्यामुळे सहवासाच्या अभावाने हे कौटुंबिक बंध कमकुवत राहण्याची शक्यता दाट असते. अशी ही आजी मंडळी. कधी कौटुंबिक, कधी आर्थिक अडचणी असोत, आजीबाई जीवनाशी लढत, तडजोड करत सर्वांना सांभाळून घेते.