नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात ४ सभा प्रस्तावित होत्या. या सभांसाठी अमित शहा शनिवारी संध्याकाळी नागपुरात पोहोचले होते. मात्र अचानक काही कारणांमुळे रविवारी सकाळी अमित शहा यांनी ४ बैठका रद्द करून तत्काळ दिल्लीला रवाना झाले. दरम्यान सभा रद्द करण्याचे नेमके कारण काय, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राजकीय वर्तुळात गेम चेंजर मानले जातात. त्यामुळे अमित शहा यांच्या निवडणुकीतील राज्यांतील उपस्थितीचे वेगळेच महत्त्व आहे. परिणामी महाराष्ट्रातील विदर्भातील वर्धा, सावनेर, काटोल आणि गडचिरोली येथे रविवारी अमित शहांच्या एकूण ४ सभा नियोजित होत्या. या सभांसाठी अमित शहा शनिवारी (१६ नोव्हेंबर) संध्याकाळी नागपुरात पोहोचले. नागपुरातील हॉटेल रेडिसन ब्लू येथे त्यांनी भाजपचे महत्त्वाचे अधिकारी आणि बड्या नेत्यांशी चर्चा केली. यानंतर अमित शहा यांनी स्थानिक संपादकांची भेट घेतली. मात्र रविवारी सकाळी अचानक या सर्व सभा रद्द करून अमित शहा दिल्लीला रवाना झाले. अमित शाह कुठल्या कारणामुळे अचानक दिल्लीला रवाना झालेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, मणिपूरमध्ये पुन्हा भडकलेल्या हिंसाचारामुळे अमित शहांना दिल्लीत परतावे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान अमित शहांऐवजी आता केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि स्मृती इराणी या सभांना संबोधित करणार आहेत. यासोबतच नागपूर शहरात काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांच्या दोन रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. याला काऊंटर करण्यासाठी भाजपने हिमाचल प्रदेशच्या खासदार कंगना राणावत यांचा रोड शो आयोजित केला आहे.