भाजपा बुथ प्रमुखांशी साधला पंतप्रधानांनी संवाद
मुंबई : महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळाने महाराष्ट्रातील जनता प्रभावित झाली आहे. मी जिथे जिथे गेलो आहे तिथे हे प्रेम पाहिले आहे. पुढील ५ वर्षे हे सरकार कायम राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. भाजपा-महायुती अहे, तर गती अहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, असा आवाज महाराष्ट्रात घुमत आहे. आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. महाविकास आघाडी महाराष्ट्रात खोटेपणा पसरवत आहे. त्याला रोखले पाहीजे. खरे काय आहे? महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असलेली महायुती मराठ्यांची शान वाढवण्याचे काम करत आहे. ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे हे बुथ प्रमुखांचे कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केले.
भाजपाच्या ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून पंतप्रधान बोलत होते. ते भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना म्हणाले, महायुती आघाडीत भाजपा सर्वाधिक जागा लढवत आहे. महायुती सरकार समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या सरकारमध्ये आणि आघाडीच्या सरकारमध्ये हाच फरक आहे आणि हा फरक लोकांना जाणवत आहे. आपल्या सरकारची दृष्टी आहे की आपण सर्वांनी मिळून इतका विकास केला पाहिजे की प्रत्येकाला पुढे जाण्याची संधी मिळेल.
काँग्रेसला त्यांचा इतिहास माहीत आहे, देशात एससी-एसटी-ओबीसी समाज जागृत होईपर्यंत काँग्रेस केंद्रात पूर्ण बहुमताने सरकार बनवत असे, पण जेव्हापासून एससी-एसटी-ओबीसी समाज एकत्र आला, तेव्हापासून काँग्रेसची स्थिती कमकुवत झाली. त्यामुळे काँग्रेसला आता एससी-एसटी-ओबीसी समाज इतका तोडायचा आहे की, काँग्रेसच्या विरोधात कोणतीही ताकद उरणार नाही, असे ते बघत आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या मतविभागणीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना (अविभक्त) आणि राष्ट्रवादी (अविभक्त) यांनी प्रत्येकी १२४ जागांवर निवडणूक लढवली होती. या सर्वांशिवाय यावेळी महायुतीने मित्र पक्षांसाठी ५ जागा सोडल्या आहेत.
एकनाथ शिंदे सध्याचे मुख्यमंत्री असल्याने महायुतीला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री कोण होणार हे निवडणुकीनंतर जाहीर होणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि भाजपाचे संसदीय मंडळ ठरवणार आहेत. महायुती संभ्रमात नाही, समस्या महाविकास आघाडीची (एमव्हीए) आहे. चेहऱ्याचा प्रश्न त्यांच्यासाठी आहे, महायुतीचा नाही. एमव्हीए मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याची घोषणा करत नाही कारण त्यांना माहित आहे की निवडणुकीनंतर त्यांचा मुख्यमंत्री येऊ शकत नाही, असे मोदी (PM Modi) म्हणाले.