Sunday, April 20, 2025

मराठीची धुरा

मेघना साने

मुंबई मराठी साहित्य संघाच्या एकोणनव्वदाव्या वर्धापन दिनाची आमंत्रण पत्रिका आम्हा सभासदांना मिळताच त्यावरील दोन नावे वाचून अतिशय आनंद झाला. ती म्हणजे चित्रकार वासुदेव कामत आणि लेखक दिग्दर्शक अभिराम भडकमकर. चित्रकार वासुदेव कामत हे प्रमुख पाहुणे असल्याने त्यांचे भाषण ऐकायला मिळेल आणि अभिराम भडकमकर यांच्या साहित्यिक शब्दसुमनांनी संपूर्ण कार्यक्रमच उजळून निघेल, या विचारांनी मी कार्यक्रमाला अगदी वेळेवर जाऊन बसले. साहित्य संघाची वास्तू खूप जुनी आहे. अनेक दिग्गज नाट्यलेखक, दिग्दर्शक, नट यांनी येथे पायधूळ झाडली असेल, कला सादर केली असेल, संगीत नाटकांच्या तालमी येथे झाल्या असतील, यामुळे त्या वास्तूत शिरताच त्या काळाची एक सावली आपल्यावर पडल्यासारखी वाटते. आपण अधिकच नम्र आणि कलासक्त होऊन त्या वास्तूत शिरतो. आज मुंबई मराठी साहित्य संघाची धुरा सांभाळत असलेल्या अध्यक्ष अचला जोशी, कार्यवाह प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्ष अशोक बेंडखळे यांचीही भेट अतिशय आनंददायी असते. अनेक वर्षे जबाबदाऱ्या पेलूनही यांचे खांदे दमलेले नाहीत. मराठीची धुरा वाहण्यासाठी असेच भक्कम खांदे हवेत. आता या कार्यासाठी पुढील पिढीनेही सरसावून उभे राहायला हवे. नाहीतर अभिजात मराठीचे नुसते डंके वाजतील. प्रत्यक्ष तिला पेलण्यासाठी कुणीच पुढे येत नाही असे व्हायला नको. वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू झाला.

उज्ज्वला चव्हाण निवेदन करत होत्या. अशोक बेंडखळे यांनी स्वागतपर भाषणात साहित्य संघाच्या वाटचालीतील अनेक महत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर प्रा. उषा तांबे प्रास्ताविक करण्यासाठी उभ्या राहिल्या आणि अतिशय विश्वासाने बोलू लागल्या, “आम्ही साहित्य स्पर्धा घेतो. संमेलने घेतो. तेव्हा अनेक तरुण लेखक पुढे आलेले दिसतात. मराठी भाषेत सातत्याने नवे नवे लेखक सकस साहित्य निर्माण करीत आहेत. त्यामुळे मराठी भाषेची चिंता नाही.” उषा तांबे यांनी आमच्या मनातील संदेह दूर केला. साहित्य संघातर्फे दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार हे महाराष्ट्रात साहित्यक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना दिले जातात. एक एक व्यक्ती आयुष्यभरात किती लेखन करते, किती संशोधन करते आणि ग्रंथ लिहिते हे नुसते वाचूनच आपली दमछाक होईल. हे योगी पुरूषच असतात असे म्हणावे लागेल. माननीय लक्ष्मण दिवटे यांना ‘कथाकार शांताराम पुरस्कार’ जाहीर झाला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत हे सहशिक्षक म्हणून काम करीत आहेत. पण अनेक दिवाळी अंकात यांच्या ग्रामीण कथा तसेच विनोदी कथा गाजत असतात. हे सगळे दिवाळी अंक कोल्हापूर, बीड येथील आहेत. त्यामुळे मुंबईकरांना हे नाव परिचित नसेलही. पण २००८ पासून सातत्याने यांचे लेखन सुरू आहे. पुणे, संभाजीनगर येथील अनेक कथास्पर्धांमधे यांच्या कथांना पारितोषिके आहेत. त्यांचे लेखन कसदार आहे. असा हा लेखक साहित्य संघाने शोधून काढला आहे.

तुलसी विवाह आणि दशावतारी नाटके

‘वैचारिक साहित्य पुरस्कार’ केशव चैतन्य कुंटे यांना दिला गेला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस्’च्या संगीत विभागात गुरू व सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. ‘मराठी विश्व कोष’ प्रकल्पात संगीत विषयाचे ते तज्ज्ञ सल्लागार आहेत. संगीताचा एकंदर मानवी संस्कृतीशी असणारा संबंध यावर डॉ. चैतन्य कुंटे हे चौफेर विचार करीत असून त्यांचे संगीतविषयक विपुल लेखन प्रकाशित आहे. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांना ‘ह.भ.प. दिगंबर भास्कर परुळेकर स्मृती पुरस्कार’ प्रदान केला गेला. डॉ. अनिल यांनी सर्व साहित्यप्रकारांमधे उल्लेखनीय काम केले आहे. लोकवाङ्मय तसेच संत साहित्यावर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. साहित्यशास्त्र, संशोधन, वैचारिक अशीही पुस्तके आहेत. अशा विषयांवर पुस्तके लिहिणारी व्यक्ती पुढे कविता, नाटक, कथासंग्रहदेखील लिहीत असते हे ऐकून आपण चाट होतो. बालसाहित्यातही पुरस्कार घोषित केले जातात. बालांचे वैचारिक व भावनिक पोषण होण्यासाठी बालवाङ्मय निर्माण होणे गरजेचे आहे. डॉ. सुरेश गोविंदराव सावंत यांना ‘बालसाहित्य पुरस्कार’ दिला गेला. कथा, कविता, कादंबरी, चरित्र, बालसाहित्य, समीक्षा, संशोधन आणि संपादन इत्यादी वाङ्मयप्रकारात त्यांची बावन्न पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘जांभुळबेट’, ‘बालकनीती’ आणि ‘पळसपापडी’ या बालगीतसंग्रहांस महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार आहेत. उपक्रमशील व प्रयोगशील मुख्याध्यापक तसेच शिक्षणतज्ज्ञ असा त्यांचा लौकिक आहे. माननीय सुप्रिया राज यांना ‘कै. लक्ष्मीकांत बाबुराव चंद्रगिरी पुरस्कार’ जाहीर झाला. सुप्रिया यांनी मास्टर ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन (एम. सी. ए.) ही आय. टी. मधील डिग्री घेतल्यावर त्यांनी स्वतःच्या आवडीनुसार मुलांबरोबर काम करायला सुरुवात केली होती. ही मुले स्लो लर्नर्स, कॅन्सरने पीडित, अनाथ किंवा बेघर, हातून गुन्हा घडलेली अशी होती. २०१५ मधे त्यांनी स्वतःचा पहिला सोलो ट्रॅव्हल केला. सध्या त्या FOCCUS प्रोग्रॅम नावाची ऑनलाईन शाळा चालवतात.

या पुरस्कार सोहळ्यानिमित्त विदर्भातील विजय प्रकाशन ही संस्था आमच्या ओळखीची झाली. विजय प्रकाशनचे सचिन उपाध्याय ‘वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार’ स्वीकारण्यास उपस्थित होते. साहित्याच्या सर्व प्रकारातील पुस्तके यांनी प्रकाशित केली आहेत. यापैकी एकूण ऐंशी पुस्तकांना आजवर महाराष्ट्र शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. मार्क्सवाद आणि मराठी साहित्य या डॉ. वि.स.जोग लिखित पुस्तकाला सोव्हिएट लँड नेहरू हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तसेच विजय प्रकाशनने आजवर साठ प्रबंध पुस्तकरूपाने प्रकाशित करून अभ्यासकांची मोठीच सोय केलेली आहे. साहित्य संघाच्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे. मराठी पुस्तके छापली जातात. त्याचे श्रेय केवळ लेखकांना नसते, तर पुस्तकांसाठी काम करणारे संगणक तज्ज्ञ, मुद्रितशोधक, मुखपृष्ठकार, प्रकाशक, सारेच महत्त्वाचे असतात. मराठी साहित्याची धुरा अशा सर्वांनी सांभाळली आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -