प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
श्रीगुरूचेनि नांवें माती। डोंगरीं जयापासीं होती।
कोळिये त्रिजगतीं। (सर्वमान्य) येकवद केली॥ ओवी क्र. १७३०
‘श्रीगुरूंच्या नावाने डोंगरावर द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती स्थापून त्यांची सेवा करून एकलव्य कोळ्याने आपल्या विद्येची कीर्ती त्रिजगतात सर्वमान्य करून घेतली. ओवी क्र. १७३०
‘चंदनाच्या आसपास असलेले वृक्ष त्याच्या अंगाच्या सुगंधाने सर्व चंदन होतात, व वसिष्ठांनी आकारलेली छाटी आपल्या तेजाने सूर्याबरोबर भांडू लागली.’ ओवी क्र. १७३१
श्रीगुरू निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानदेवांच्या अतीव आदराचे स्थान! म्हणून प्रत्येक अध्यायाच्या आरंभी त्यांचे स्तवन येते. ही स्तुती इतकी असते की, एक वेळ निवृत्तीनाथ स्वतः त्यांना म्हणाले, ‘न बोल बहू’ आता माझी स्तुती पुरे कर. गीतेचा अर्थ सांगायला सुरूवात कर. निवृत्तीनाथांविषयी बोलताना ज्ञानदेवांचे अंतःकरण असे भरून येते. त्यांच्याविषयी काय आणि किती बोलू असे त्यांना होते!
याचा अनुभव देणाऱ्या अठराव्या अध्यायातील समारोपप्रसंगी आलेल्या या ओव्या. ‘गीतेचा अर्थ सांगण्यास मी कोणामुळे समर्थ झालो?’ तर सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथ यांच्या कृपेमुळे, यांच्या आशीर्वादामुळे – ज्ञानदेवाची अशी भावना आहे. तेव्हा आपली मनाची ही भावना प्रकट करताना ते सुंदर दाखले देतात. यातील एक दाखला प्रख्यात धनुर्धारी एकलव्य याचा.
द्रोणाचार्यांना गुरू मानून त्यांच्या मृत्तिका मूर्तीचे पूजन करणारा एकलव्य जगात कीर्तिमान झाला. याला कारण त्याच्या गुरूंचे सामर्थ्य आहे आणि त्याची गुरूंवर असलेली पराकोटीची निष्ठा होय. पुढील दाखला चंदनाचा आहे. चंदनाचा सुगंध आसपास सर्व झाडांना लागतो. गुरू हे जणू चंदनाप्रमाणे आहेत. त्यांच्या सामर्थ्याचा सुगंध भोवतालच्या सर्व शिष्यसमुदायाला लागतो. हा सुगंध म्हणजे काय?, तर गुरूच्या ठिकाणी असलेले सद्गुण होय.
ज्ञानदेवाच्या प्रतिभेचे अनोखेपण जाणवते ते यानंतरच्या दृष्टांतातून. वसिष्ठ हे प्रख्यात ऋषी होते. त्यांची छाटी त्यांच्यासोबत नेहमी असे. ज्ञानदेव किती बहारीची कल्पना करतात! ही छाटी वसिष्ठ मुनींच्या सहवासात असल्याने तिच्या ठिकाणीही तेज आले. इतके तेज की, ती साक्षात तेजोनिधी, सकल जगाला प्रकाशित करणाऱ्या सूर्याशी भांडू लागली. किती रोचकता आहे ज्ञानदेवांच्या या दृष्टांतात! निर्जीव छाटीला सजीव रूपात पाहणे, वसिष्ठ मुनींच्या घडवण्यातून तिच्यात तेज अवतरणे, त्या दिव्य तेजाने तिने सूर्याशीदेखील भांडणे! काय सूचकता आहे यात?
निर्जीव छाटीलाही वसिष्ठ मुनींसारख्या समर्थ गुरूंमुळे तेज लाभते. यातून गायचा आहे गुरूमहिमा, म्हणून ज्ञानदेव पुढे तो स्पष्ट करतात. ‘मग मी तर गुरूमयचित्ताने युक्त आणि माझा सद्गुरू समर्थ धनी जो दृष्टीने अवलोकन केल्याबरोबर आपले स्वरूप देतो, असा आहे. (१७३२) ‘म्हणून मी ही आयती गीता जगताला मराठी भाषेत सांगण्यास समर्थ झालो’ असे ते म्हणतात. अशा तऱ्हेने आपल्या ज्ञानेश्वरी लेखनाचे सारे श्रेय ते श्रीसद्गुरू निवृत्तीनाथांना देतात. एकाअर्थी सारे श्रीकृष्णार्पण करतात. ही शिकवण आपणा सर्वांसाठी –
‘ठेवा गुरूपदी निष्ठा
करा प्रयत्नांची पराकाष्ठा
टाकून द्या ‘मी’ पणाचा ताठा’
manisharaorane196@ gmail.com