नवी मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आता येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अवघ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. सध्या राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दिल्लीतील दिग्गज नेत्यांनी प्रचारासाठी देखील महाराष्ट्रात तळ ठोकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याही सभा विविध मतदारसंघात पार पडत आहेत. आज नवी मुंबईत पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना मोदींनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर चांगलीच घणाघाती टीका केली आहे. ‘काँग्रेसने गरिबी हटावचा खोटा नारा दिला गरिबांना लुटण्याचं काम केलं’, असा हल्लाबोल मोदींनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“महाराष्ट्राचं सरकार महिलांना डबल लाभ देत आहे. सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मदत करत आहे. मात्र, हे महाविकास आघाडी वाले या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले होते. त्यामुळे त्यांचा उद्देश काय आहे? हे तुम्ही ओळखा. यावेळी महाविकास आघाडीला संधी देऊ नका. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता नाही. अनेक राज्यात आणि महाराष्ट्रात सत्ता नाही. त्यामुळे आता ते सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. द्वेशाचं विष पेरण्याचं काम काँग्रेसवाले करत आहेत. काँग्रेसची मानसिकता ही दलित आदिवासी कमजोर व्हावे, ओबीसी कमजोर व्हावेत, अशी मानसिकता त्यांची आहे. या समाजाला वेगळं करून सत्तेत येण्याची धडपड आणि जातीच्या आधारावर वाद लावण्याचा काँग्रेसचं षडयंत्र आहे. त्यामुळे ‘हम एक है तो सेफ है!”, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
महायुतीसाठी आमचे शेतकरी बंधू-भगिनी हे विकसित महाराष्ट्राचे भक्कम आधारस्तंभ आहेत. येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडत नाही आहोत. pic.twitter.com/yRBUJPWcYS
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2024
“तुमचं सर्वांचं भवितव्य हे महायुतीच्या हातात सुरक्षित आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात हंव. आमच्या सरकारने गेल्या १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरीबीमधून बाहेर काढलं. ४ कोटी लोकांना पक्की घरे दिली. सर्वात जास्त लाभार्थी सर्वसामान्य लोक आहेत. याआधीही अशा प्रकारचं काम होऊ शकलं असतं. मात्र, काँग्रेसची ही मानसिकता नाही. आजही काँग्रेस गरिबांसाठी सरु केलेल्या योजनेला विरोध करण्यात काम करतं. आम्ही देशातील ८० कोटी लोकांना मोफत राशन देत आहोत. मात्र, काँग्रेस यालाही विरोध करतं. काँग्रेसने गरिबी हटावचा खोटा नारा दिला”, असा हल्लाबोल मोदींनी विरोधकांवर केला.