केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केले उद्धव ठाकरेंना लक्ष्य
मुंबई : काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने प्रस्ताव ठेवला की कलम ३७० पुन्हा लागू केले पाहिजे. सगळ्यात आधी मला उद्धव ठाकरे यांना विचारायचे आहे. उद्धवजी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगा की कलम ३७० पुन्हा आणायचे आहे की नाही. जाऊ द्या, उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यांच्या उत्तराची अपेक्षा ठेवू नका. पण मी सांगून जातो, राहुल गांधी तुमची चौथी पिढी जरी आली तरी कलम ३७० पुन्हा लागू होणार नाही. भाजपासाठी जम्मू काश्मीर हा आमच्या सत्तेपेक्षाही प्रिय मुद्दा आहे. काश्मीर मधून दहशतवाद संपवण्याचे काम आमच्या पंतप्रधान मोदींनी (PM Modi) केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत आले आहेत. राज्यभरात अमित शहा यांनी सभांचा धडाका लावला असून त्यांनी मंगळवारी अनेक भागांचा दौरा केला. मुंबईत संध्याकाळी घाटकोपर येथे झालेल्या प्रचारसभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. कलम ३७० हटवण्यावरूनही अमित शाह यांना उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.
PM Modi : मुख्यमंत्रीपदासाठी एकमेकांशी भांडणारे अस्थिर लोक स्थिर सरकार देऊ शकत नाहीत -पंतप्रधान
संसदेत जेव्हा मी कलम ३७० हटवण्यासाठी विधेयक घेऊन उभा होतो, तेव्हा राहुल गांधी शरद पवारांचा पक्ष ममता बॅनर्जींचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ओरडत होते. ते म्हणाले की ३७० हटवू नका. मी का असे विचारले. त्यावर ते म्हणाले की जर ३७० हटवले तर देशात रक्ताच्या नद्या वाहतील. राहुल गांधींनी लक्षात ठेवावे, कलम ३७० हटवून सहा वर्षे झाली रक्ताच्या नद्या सोडा कोणाची दगड फेकण्याची हिंमत नाही. पंतप्रधान मोदींनी देशाला आतंकवाद दहशतवाद आणि नक्षलवादापासून मुक्त केले आहे, असे अमित शहा म्हणाले.