सद्गुरू वामनराव पै
संगीताचे जसे सात स्वर असतात सा, रे, ग, म, प, ध, नि तसे जीवनसंगीताचे सात स्वर आहेत. ते म्हणजे पहिला जग, दुसरे कुटुंब, तिसरा स्वर शरीर, चौथा इंद्रिये, पाचवा बहिर्मन, सहावा अंतर्मन, सातवा परमेश्वर. हे सातही स्वर महत्त्वाचे आहेत हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. आज काय झालेले आहे लोकांचा असा समज झालेला आहे की, परमेश्वर फक्त महत्त्वाचा आणि जग म्हणजे मिथ्या, कुटुंब हा आपल्या प्रगतीच्या आड येणारा धोंडा वगैरे वगैरे. ज्या कल्पना आहेत त्या सर्व चुकीच्या आहेत. जीवनसंगीताचे सातही स्वर अत्यंत महत्त्वाचे आहेत तरी यातला परमेश्वर हा स्वर आपण आधी निरूपणासाठी घेतला त्याचे कारण परमेश्वर आणि बाकीच्या सहाही स्वरांचा एकमेकांशी संबंध आहे हे मला सांगायचे आहे. परमेश्वर हा विषय प्रथम का घेतला, तर परमेश्वराशी बाकीच्या स्वरांचा घनिष्ट संबंध आहे. परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वराचे रूप काय? परमेश्वराचे स्वरूप काय? परमेश्वराचे आपल्या जीवनात स्थान काय? परमेश्वर आपल्या जीवनांत काय करतो? काय करत नाही? तो कसा करतो? का करतो? हा सगळा विषय जर आपण नीट पाहिला तर आपल्या ध्यानांत येईल की, परमेश्वर हा विषय आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. दुर्दैवाने लोक परमेश्वर या विषयाकडे फक्त अध्यात्मिक दृष्टीनेच पाहतात. अध्यात्मांत पडलेले लोक जे आहेत तेच त्याचा विचार करतात. संसारी लोक त्याची आपल्यावर कृपा व्हावी, कोप होऊ नये एवढ्यापुरता विचार करतात. बाकीचे लोक म्हणतात की, तो आहे हे ठीक आहे. आपण आपला त्याला नमस्कार करावा. जेणेकरून त्याचा आपल्यावर कोप होऊ नये.
सांगायचा मुद्दा असा की, परमेश्वर हा विषय जर आपल्याला समजला नाही, तर हे जग सुखी होणे शक्य नाही हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. कधीच सुखी होणे शक्य नाही आणि आज काय परिस्थिती आहे? जगाचा इतिहास पाहिला तर काय कळते? पुरातन काळापासून आजतागायत पहिले तर जग सुखी झालेले नाही. जग सुखी व्हावे म्हणून अवतार होतात असे आपण म्हणतो. रामावतार, कृष्णावतार हे जगाचे कल्याण करण्यासाठी झाले असे आपण म्हणतो. इतके अवतार झाले तरी जग आहे तिथेच आहे, जग जिथे होते तिथेच आज आहे, त्यात काही फरक पडलेला नाही. पूर्वीचा काळ व आज यात काही फरक पडलेला नाही. पूर्वीच्या काळी राक्षस होते, आजही राक्षस आहेत. पूर्वीच्या काळी दुष्ट लोक होते, आजही दुष्ट लोक आहेत. अनेक प्रेषित झाले तरी जग आहे तिथे आहे, उलट या प्रेषित लोकांनी अनेक धर्म निर्माण केले. हे अनेक धर्म निर्माण झाल्यामुळे या धर्माच्या अनुयायांमध्ये म्हणजे धार्मिक लोकांमध्ये आपापसांत तंटेबखेडे, दंगेधोपे, युद्धलढाया निर्माण झाल्या आणि या धर्मांच्या नावाखाली जेवढा रक्तपात या पृथ्वीवर झाला तेवढा अन्य कुठल्याच कारणासाठी झालेला नाही. प्रेषित आले, त्यांनी धर्म निर्माण केले तरी जग सुखी होण्याऐवजी अधिकच दुःखी झाले. अवतार झाले तरी जग आहे तिथेच आहे. अनेक साधू फकीर आहेत, त्यांनी जगाचा उद्धार केला का? मी नेहमी सांगत असतो की, पुरातन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत परमेश्वराचा विचार जसा व्हायला पाहिजे होता तसा झाला नाही, म्हणून ही परिस्थिती ओढवली आहे.