सोलापूर : विकासाचे ध्येय असलेले स्थिर सरकारच महाराष्ट्राकरिता दूरगामी नीती राबवू शकते. काँग्रेस आणि त्यांच्या महाआघाडीच्या गाडीला चाके नाहीत, ब्रेक नाहीत, गाडी कोणी चालवायची यासाठी भांडणे सुरू आहेत. निवडणुकीआधीच मुख्यमंत्रीपदासाठी एकमेकांशी भांडणारे अस्थिर लोक स्थिर सरकार देऊ शकत नाहीत, राज्याचा विकास करू शकत नाहीत, त्यामुळे स्वच्छ नीती आणि सेवाभावाचे संस्कार असलेल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला साथ द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोलापूर येथे जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या विशाल जाहीर सभेत बोलताना केले.
खासदार धनंजय महाडिक, ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, आणि उमेदवार सुभाष देशमुख, विजय देशमुख, देवेंद्र कोठे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, राम सातपुते, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.
सर्वाधिक वेळा सोलापुरात आलेला बहुधा मी पहिलाच पंतप्रधान असेन, असे प्रतिपादन करून केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने देशात व राज्यात राबविलेल्या अनेक यशस्वी योजनांचा आढावा घेताना मोदी यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली. समस्या कायम ठेवून लोकांना त्यामध्ये गुरफटवून ठेवणे ही काँग्रेसची नीती असून यामुळे त्यांनी जनतेला अनेक दशके हलाखीचा अनुभव दिला. यामुळेच शेतकरी, माताभगीनी त्यांना कधीही माफ करणार नाहीत असे ते (PM Modi) म्हणाले.
काम रखडवण्यात महाविकास आघाडीची PHD; तर काँग्रेस ब्रेक लावण्यात तरबेज, PM मोदींचा हल्लाबोल
महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले, आता प्रत्येक शेतात सौर ऊर्जा पोहोचविण्यासाठी आम्ही झटत आहोत. प्रत्येक शेतीपंप सौरऊर्जेवर चालणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणाऱ्या अनेक योजना आम्ही देशात राबविल्या आहेत. ऊसाची आधारभूत किंमत निश्चित केली, इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिले, असे ते म्हणाले. इथेनॉल तंत्रज्ञान अगोदरपासूनच होते, पण अगोदरच्या सरकारांना शेतकऱ्यांना तडफडत ठेवण्यातच मजा वाटत होती, असा आरोप मोदी (PM Modi) यांनी केला.
महाराष्ट्राची श्रद्धास्थाने आणि संस्कृतीचा सन्मान करणारे महायुतीचे सरकार असते, तेव्हा विकासाची कामे कशा वेगाने होतात, याचा सोलापूरकरांनी अनुभव घेतला आहे. गेल्या अनेक दशकांपासून टांगणीवर असलेले अनेक विकास प्रकल्प महायुती सरकारने पूर्ण करून दाखविले आहेत. या विकासकामांमुळे दळणवळणाच्या सुविधा सुलभ झाल्या असून प्रवासी, भाविक, यात्रेकरूंचे हाल संपुष्टात आणण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले आहे. शहराच्या चारही बाजूंना चारपदरी महामार्ग झाले, शहरातून वंदे भारत ट्रेन धावते. काही दिवसांपूर्वी सोलापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण केले. हे सगळे केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारमुळेच शक्य झाले आहे. विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र हे समीकरण आहे. माझी लाडकी बहीण योजना हे राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी असलेल्या महायुती सरकारच्या कटिबद्धतेचे उत्तम उदाहरण आहे, पण यामुळेच महाआघाडीत अस्वस्थता पसरली. माताभगिनींना हे पैसे मिळू नयेत, यासाठी ते कोर्टापर्यंत गेले. पण जेव्हा महिलांच्या हाती पैसा असतो, तेव्हा अर्थव्यवस्थेलाही ताकद मिळते. महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच आमच्या सर्व योजना राबविल्या जात आहेत. तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचा आमचा संकल्प आहे, अशी ग्वाहीदेखील पंतप्रधानांनी (PM Modi) दिली.
काँग्रेस आणि त्यांचे साथीदार ओबीसी, आदिवासी, दलितांमध्ये फूट पाडून संघटित समाजात संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न करत असून त्या धोकादायक खेळापासून सावध रहा, एकत्र असू तरच सुरक्षित राहू असेही ते म्हणाले. ‘सबका साथ सबका विकास’ हा भाजप-महायुती सरकारचा मंत्र आहे, गरीबांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो. महाराष्ट्रात महायुती सरकार याच योजना पुढे राबवून महाराष्ट्राला, शेतकऱ्यांना समृद्ध बनवेल, अशी ग्वाहीही मोदी (PM Modi) यांनी दिली.
गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाचा वेग जनतेने अनुभवला आहे, आणि प्रत्येक विकास योजनेत खोडा घालणाऱ्या महाविकास आघाडीचा कारभारही जनतेने अनुभवला आहे, असे सांगून मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. महायुतीचे सरकार वेगवान काम करते, आणि महाविकास आघाडीवाले त्यामध्ये अडथळे आणतात. महाराष्ट्राचा एवढा वेगवान विकास ही आघाडीवाल्यांच्या आवाक्यातील बाब नाही, त्यांनी केवळ कामे लटकावणे, अडकविणे आणि भरकटविणे यांत नैपुण्य मिळविले आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस व महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली. त्यांना पुन्हा महाराष्ट्र लुटण्याचा परवाना देऊ नका, असे आवाहनही त्यांनी (PM Modi) केले.