Sunday, December 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजCM Eknath Shinde : हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे सरकार नाही तर...

CM Eknath Shinde : हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे सरकार नाही तर बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणार

रिसोडमधील प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

अमरावती/ वाशीम : महायुतीचे सरकार शेतकऱ्यांचे असून सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार आहे. सोयाबीन कपाशीचे जेव्हा भाव पडतात तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान होते. त्यासाठी राज्यात भावांतर योजना लागू करुन २० टक्क्यांपर्यंत किंमतीतील तफावत भरुन काढण्यासाठी अनुदान देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे वचन दिले आहे. याशिवाय शेतकरी सन्मान योजनेत १५००० रुपये देणार आहोत. विदर्भात नागपूर येथे ३ आणि अमरावतीमध्ये २ ठिकाणी आधुनिक संत्र प्रक्रिया केंद्र सुरु होतील. वैनगंगा आणि नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील पाऊणे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

भावना गवळी या लढणाऱ्या भगिनी असून खासदार म्हणून त्यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात भरीव काम केले. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेमार्ग, शकुंतला रेल्वे, वाशिम पुसद माहूर अदिलाबाद रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा केला, असे मुख्यमंत्री म्हणाले. रिसोडमधील झनकला येत्या २० तारखेरला झटकून टाकायचे आणि भावना ताईला विजयी करण्याचे काम मतदारांना करायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

तत्पूर्वी महायुती उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या निवडणूक प्रचारार्थ अमरावती दर्यापूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की आमदार नसताना अभिजित अडसूळ यांनी अमरावती, दर्यापूर आणि अंजनगावचे प्रश्न सोडवले, इथ निधी आणला. अभिजित यांच्या पाठपुराव्यामुळे मुरा देवी आणि जगदंबा मंदिर विकासासाठी राज्य सरकारने ३ कोटी निधी दिला. इथल्या प्रश्नांबाबत आग्रही असणाऱ्या कॅप्टन अभिजित अडसूळ याला विधानसभेत पाठवायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी मतदारांना केले.

Assembly election 2024: राज्यात महायुतीला कौल!

ते पुढे म्हणाले की अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी उमरखेड, डिवरवाडी, तळेगाव, हिसारवाडी आणि चांदूरबाजार या पाच ठिकाणी संत्रा इस्टेट उभारली जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर चांदूर बाजार येथ लिंबुवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट उभारत आहोत.

बांग्लादेशातील निर्यात होणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्काच्या ५० टक्के रक्कम अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना दिली. अमरावतीमध्ये पीएम मित्रा पार्क, मेगा टेक्सटाईल पार्क विकसित केले जाणार आहे. यासाठी १० हजार कोटींची गुंतवणूक आणि ३ लाख रोजगार निर्माण होतील, असे ते म्हणाले. कॅप्टन अडसूळ विधानसभेत पोहचल्यास येथील विकासाला गती येईल, असे ते म्हणाले. महायुती राज्यभरात मजबुतीने लढत आहे. महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकू नये, महायुतीमध्ये राहायचे आणि महायुतीविरोधी काम करायचे हे चालणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना ठणकावले.

बुलढाण्यातील मेहकर येथे संजय रायमूलकर यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभा घेतली. मेहकर शिवसेनेचा बालेकिल्ला असून यंदा संजय रायमूलकर विजयी चौकार मारतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मेहकर विधानसभा मतदार संघात मागील दोन वर्षात ४५०० कोटींचा विकास निधी आणला.त्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये केवळ ३० ते ४० कोटींचा निधी दिला होता. मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमूलकर यांचे डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे मेहकरला काही कमी पडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अडीच वर्ष राज्यात स्पीडब्रेकर टाकण्याचे काम केले. शिवसैनिकांचे खच्चीकरण उघड्या डोळ्यांनी बघत होतो. पापाचा घडा भरला आणि निर्णय घेतला. उठाव केला आणि सरकार उलथवून टाकले. त्यानंतर राज्यात विकास कामे सुरु झाली. लाडकी बहिण योजना सुरु केली. बहिणींच्या खात्याता पैसे जमा केले. हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे सरकार नाही तर बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली. अडीच वर्षात महाविकास आघाडीने जनतेला काही दिले नाही. आता आमच्या सरकारने दिले त्याची चौकशी करुन जेलमध्ये टाकायची भाषा करताय, राज्यातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी यांच्यासाठी एकदा काय शंभरदा जेलमध्ये जायला तयार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले. महाविकास आघाडी हे विकास विरोधी आणि खोटारडे लोक आहेत. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ महाविकास आघाडीला नाकारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवरायांना अपेक्षित सुराज्य आपल्याला आणायचं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समतेचे राज्य आणायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभेत संविधान बदलणार, आरक्षण जाणार असे सांगून अल्पसंख्यांकाना घाबरवले, मात्र लाडकी बहिण योजनेत सर्वच जाती धर्माच्या बहिणींना लाभ मिळाला. केंद्र सरकारच्या लखपती दिदी, ड्रोन दिदी, ८० कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याचाही लाभ सर्व जाती धर्माचे लोक घेत आहेत, असे ते (CM Eknath Shinde) म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -