राज चिंचणकर
मराठी रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाट्यकृती सातत्याने येत असतात. कौटुंबिक, सामाजिक, ऐतिहासिक, विनोदी, आध्यात्मिक, रहस्यमय, वैचारिक आदी पठडीतली नाटके रंगभूमी गाजवत असतात. यापैकी विनोदी बाजाची नाटके म्हणजे हमखास मनोरंजनाची हमी, हे सूत्र ठरलेले आहे. विनोदी नाटकांचे एक अंग असलेला ‘फार्स’ हा नाट्यप्रकार, तर रंगभूमीवर धुमाकूळ घालतोच. याच मांदियाळीत आता ‘बाप कुणाचा ताप कुणा…!’ या ‘फार्स’ने आता रंगभूमीवर ‘एन्ट्री’ घेतली आहे. श्री शिवाजी मंदिरात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मोठ्या उत्साहात रंगला आणि आता हे नाटक सर्वत्र धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहे. ‘बाप कुणाचा ताप कुणा…!’ हे नाटक रंगभूमीवर ‘एन्ट्री’ घेतानाच सोबत अनेक वैशिष्ट्ये घेऊन आले आहे. नाटककार श्रीनिवास भणगे यांनी हे नाटक लिहिले आहे आणि कुमार सोहोनी यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. दिग्दर्शक या नात्याने कुमार सोहोनी यांचे हे १२० वे नाटक आहे. बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी रंगभूमीवर ‘फार्स’ हा प्रकार हाताळला आहे. याविषयी बोलताना कुमार सोहोनी म्हणतात, “ही माझी १२० वी कलाकृती आहे, याचा मला अभिमान वाटतो. मी वेगवेगळ्या पद्धतीची नाटके आतापर्यंत केली असली, तरी विनोदी पद्धतीची नाटके फार कमी केली आहेत. हे नाटक म्हणजे ‘फार्स’ आहे. १९८७ मध्ये मी ‘वासूची सासू’ हा ‘फार्स’ केला होता आणि त्याच्यानंतर मी आता पुन्हा एकदा ‘फार्स’ घेऊन आलो आहे. श्रीनिवास भणगे यांनी अतिशय उत्तम असा हा ‘फार्स’ लिहिलेला आहे. माझे भाग्य असे की संतोष पवार याच्यासारखा नट या नाटकाच्या निमित्ताने माझ्यासोबत आहे”.
या नाटकात ज्येष्ठ मंडळींपासून नव्या पिढीपर्यंतच्या कलावंतांची फळी काम करत आहे. विजय गोखले व संतोष पवार या दोन हरहुन्नरी कलावंताची जोडी या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. या रंगकर्मींना नाटकांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्याचा फायदा अर्थातच या नाटकाला होत आहे. त्यांच्यासोबत धनश्री काडगावकर हिची हटके भूमिका या नाटकात आहे. साधारण आठ वर्षांनंतर ती पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळली आहे. त्यामुळे तिचे या नाटकातले अस्तित्व हा या नाटकाचा आकर्षणाचा भाग ठरला आहे. या कलावंतांसोबत प्रशांत निगडे, वरदा साळुंके, श्रुती पुराणिक व दुर्गेश आकेरकर हे कलाकार या नाटकात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारत आहेत. या नाटकात भूमिका रंगवत असलेला संतोष पवार म्हणतो, “या नाटकात मी फक्त एक कलाकार म्हणून काम करतोय. कुठल्याही कलाकाराची इच्छा असते की, वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे काम करावे.
तशी कुमार सोहोनी यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा होती. आम्ही बरेच दिवस एकत्र काम करण्याचा प्रयत्न करत होतो आणि हा योग आता या नाटकाच्या निमित्ताने जुळून आला आहे. हे नाटक म्हणजे अतिशय धमाल अशी कॉमेडी आहे”.या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रंगभूमीवर सक्रिय झालेली धनश्री काडगावकर सांगते, “खूप वर्षानंतर मी एक धमाल आणि हटके नाटक घेऊन आले आहे. यात मी ‘रोमा’ हे पात्र रंगवत आहे. हे नाटक करताना मला खूप काही शिकायला मिळत आहे आणि हे नाटक मी एन्जॉय करतेय”. तर, एकूणच या नाटकाविषयी बोलताना विजय गोखले म्हणतात, “या नाटकातली माझी भूमिका खळखळून हसवणारी आहे; डोक्याला ताप देणारी नाही.हे नाटक विनोदी बाजाचे असल्याने रसिकांनीही डोक्याला ताप करून घेऊ नये. रसिकांनी नाटकाला यावे आणि खळखळून हसत नाटकाचा मनमुराद आनंद घ्यावा”. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. नाटकाचे नेपथ्य राजन भिसे यांनी केले आहे.कुमार सोहोनी यांची प्रकाशयोजना, पूर्णिमा ओक यांची वेशभूषा आणि किशोर पिंगळे यांची रंगभूषा या नाटकाला लाभली आहे. निर्माते सचिन व्ही. यू. यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले आहे. सी. टी. निर्मित व स्मित हरी प्रॉडक्शन्स प्रकाशित ‘बाप कुणाचा ताप कुणा…!’ हे नाटक शुभारंभापासूनच रंगभूमीवर धमाल उडवत असल्याची चर्चा नाट्यसृष्टीत रंगली आहे.