१९२५ साली नागपूर येथे रा. स्व. संघ या संघटनेची स्थापना झाली. पण संपूर्ण जगात कुतूहल आणि औत्स्क्याचा विषय बनलेली ही अभूतपूर्व संघटना स्थापन होत असताना तिच्या स्थापनेची वैशिष्ट्ये पण लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रथम म्हणजे ही संघटना स्थापना होताना कुठलाही ग्रंथ किंवा कुठलीही लिखित घटना तयार केलेली नव्हती. संघटनेचे नावही ठरलेले नव्हते आणि मुख्य म्हणजे निश्चित अशी कार्यपद्धती पण ठरलेली नव्हती. उद्दिष्ट आणि तत्त्व मात्र ठरले होते. उद्दिष्ट होते हिंदू समाज संघटित करण्याचे आणि तत्त्व किंवा अधिष्ठान होते भारत हे हिंदू राष्ट्र आहे हे.
रवींद्र मुळे
१९२५ साली नागपूर येथे रा. स्व. संघ या संघटनेची स्थापना झाली. या स्थापनेच्या दिवशी कुठलेही मोठे प्रदीर्घ भाषण संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी केले नाही. गर्दी जमवली नाही. कुठलीही जाहिरात नव्हती आणि कुठली बातमी पण वृत्तपत्रात दिलेली नव्हती. अर्थात हा एका दिवसात डॉ. हेडगेवार यांना साक्षात्कार झाला आणि संघटना स्थापन झाली असा हा विषय नव्हता. या मागे संघ संस्थापक पूजनीय डॉ. हेडगेवार यांची बालपणी, तरुणपणी वेळोवेळी अभिव्यक्त झालेली देशभक्ती होती. या मागे तरुणपणी वैद्यकीय शिक्षण घेत असताना कलकत्ता येथे केलेल्या अनुशिलन समितीच्या क्रांतीकार्याची अनुभवाची शिदोरी होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूर येथे आल्यावर काँग्रेसच्या माध्यमातून विविध आंदोलने आणि त्यासाठी भोगलेल्या कारावासाची पार्श्वभूमी होती. दरम्यान काँग्रेसच्या व्यासपीठावर अली बंधू यांनी वंदे मातरम् ला विरोध करून ही त्यांचा होणारा सन्मान, खिलापत सारख्या चळवळीमध्ये काही संबंध नसताना सामील होण्याचा काँग्रेसचा धोरणात्मक निर्णय आणि त्यातून हिंदूंच्या झालेल्या कत्तली आणि महिलांवर झालेले बलात्कार हा घटनाक्रम डॉ. हेडगेवार यांना अस्वस्थ करत होता.
डॉ. हेडगेवार सतत अस्वस्थ होते. हिंदू समाजातील हे दोष दूर कोण करणार ? हे दोष दूर झाले नाही आणि उद्या इंग्रज निघून गेले, तर मिळालेले स्वातंत्र्य किती स्थायी असेल ? या प्रश्नांना घेवून सतत डॉ. हेडगेवार समाजधुरीण, स्वातंत्र्य चळवळीतील नेते यांच्याशी चर्चा करत होते. त्या चर्चेतून जो निष्कर्ष निघत होता तो म्हणजे निर्दोष हिंदू समाज संघटन आणि त्यातून स्वराज्य प्राप्ती ! या उपायाबद्दल सर्वांचे एकमत होत होते पण हे करणार कोण ? याचे उत्तर कुणी देत नव्हते. कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. हिंदू समाज संघटन ही अशक्यप्राय गोष्ट आहे हेच सगळे जण डॉ. हेडगेवार यांना समजावत होते. नागपूरमध्ये त्यावेळी एका सभेत कुणी तरी वक्ता
‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेची खिल्ली उडवताना म्हणाले होते कोण मूर्ख म्हणतो हे हिंदुराष्ट्र आहे तेंव्हा श्रोत्यांच्या मध्ये बसलेले डॉ. हेडगेवार म्हणाले होते मी केशव बळीराम हेडगेवार म्हणतो हे हिंदुराष्ट्र आहे ! आणि पुढील वाक्य महत्त्वाचे होते. ‘या देशात एक जरी हिंदू शिल्लक राहिला तरी हे हिंदू राष्ट्रच असेल !’ आजच्या भाषेत एक मोठा विमर्श त्यांनी त्यावेळी मांडला होता. जो आज देशभरात निर्माण झालेले वातावरण आणि जगभरात लोकांची हिंदू जीवन पद्धती बदल वाढलेली उत्सुकता यातून सत्यात उतरताना दिसत आहे. पण हे आपोआप घडलेले नाही. डॉ. हेडगेवार यांनी स्वतः मांडलेल्या विमर्शला एका अद्भुत कार्यपद्धतीची जोड दिली. व्यक्ती निर्माणच ही पद्धती डॉ. हेडगेवार यांनी सर्व स्वयंसेवकांना एकाग्र चित्ताने गिरवण्यास सांगितली आणि सर्व स्वयंसेवकांनी त्याप्रमाणे आजपर्यंत निष्ठेने गिरवली त्याचा परिणाम म्हणून आज सर्वत्र संघाला डॉ. हेडगेवार यांनी दिलेला परम वैभवंम नेतुं एतद स्व राष्ट्रम ! हा धेय्य मंत्र प्रत्यक्षात येताना दिसत आहे. निसर्गातील क्रमबद्ध विकासाच्या नियमानुसार संघ बीज रूपाने ९९ साली स्थापन झाला आणि ९९ वर्षांत पूर्ण विकास पावण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे . अर्थात संघाच्या आणि डॉ. हेडगेवार यांच्या संकल्पनेनुसार ही लागलेली ९९ वर्षे काही अभिमानाचा विषय नाही कारण डॉ. हेडगेवार म्हणायचे ,’याची देही याची डोळा आपल्याला कार्य पूर्ण करायचे आहे’ . दुसरे त्यांचे वाक्य होते ‘संघाला जुबली साजरी करायची नाही.’ त्यांची कल्पना लवकरात लवकर समाज आणि संघ एकरूप करण्याची होती.