‘दसरा मेळावा’च्या टीझरमधून ठाकरे गटावर जोरदार टीका
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. ही परंपरा आजही कायम आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फुट पडली. शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडल्याने दोन्ही गटांकडून एकाच दिवशी मेळावे होत आहेत. उद्धव ठाकरे यांचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असून एकनाथ शिंदे आझाद मैदानावर मेळावा घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाने दसरा मेळाव्याचे टीझर लॉन्च केले होते तर शुक्रवारी शिंदे गटाने टीझर लॉन्च केले असून टीझरमधून ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा २०२४
मराठी आपला श्वास
हिंदुत्व आपला प्राणचलो आझाद मैदान…
वाजत गाजत या, गुलाल उधळत यादिनांक – १२ ऑक्टोबर, २०२४
वेळ – सायंकाळी ५.३० वाजता#Shivsena #EknathShinde pic.twitter.com/YDLVD0aZJ6— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) October 11, 2024
मराठी आपला श्वास, हिंदुत्व आपला प्राण, चलो आझाद मैदान, वाजत गाजत या, गुलाल उधळत या, असे म्हणत शिंदे गटाकडून टीझर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या पंजाला बांधला होता, एकनाथ शिंदेंनी त्याला सोडवले, अशा थीमवर हा टीझर बनवण्यात आला आहे. टीझरच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ दिसतो. त्यानंतर शिवसेना नाव असलेला वाघ दिसतो. टीझरमध्ये पुढे वाघाच्या गळ्यात पट्टा असून, तो पट्टा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या पंजाला बांधल्याचे दाखवले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे बाहुबलीप्रमाणे धनुष्यबाण मारुन पंजाला बांधलेला पट्टा तोडतात. त्यानंतर शिवसेना नावाचा वाघ एकनाथ शिदेंना मिठी मारतो, असे या टीझरमध्ये दाखवले आहे.
दोन दिवसांपूर्वी ठाकरेंच्या मेळाव्याचे टीझर रिलीज
ठाकरे गटाकडून दोन दिवसांपूर्वी दसरा मेळाव्याचा खास टीझर रिलीज करण्यात आला. यामध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यात आली. त्याचबरोबर शिंदे गटाला टोला देखील लगावण्यात आला आहे. यात बाळासाहेब ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची काही क्षणचित्रे देखील दिसून येत आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या देखील भाषणाची तडफदार सुरुवात करण्यात आल्याने यंदा उद्धव ठाकरे दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलने भाषण करणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
हरियाणाचा ढोल पिटणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली
महाराष्ट्रातील सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्याच्या मार्गावर असल्याची टीका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र, कोणीही ‘माय का लाल’ आला तरी योजना बंद पडणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पहिल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकारमधील कार्यकाळ पहा आणि मागच्या दोन सव्वा दोन वर्षात आम्ही केलेला कामाचा कार्यकाळ पहा. फरक तुम्हाला स्पष्ट दिसेल, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या सर्व योजनांमध्ये आडवे येण्याचे काम विरोधक करत आहेत. मात्र त्यांना आडवे करण्याचे कामच जनता करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आमच्या कार्यकाळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हरियाणा मध्ये आमचा विजय होणार असे ढोल वाजत होते. मात्र हरियाणाच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. आता महाराष्ट्रात देखील तसेच होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.