सेवाव्रती – शिबानी जोशी
वंदे मातरम्’ हे आपले प्रेरणादायी राष्ट्रगीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिले होते. या गीताला १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सन २००० मध्ये संपूर्ण देशात हे वर्ष साजरे करण्यात आले. संघानी सुद्धा वर्षभर खूप कार्यक्रम आयोजित केले. इथल्या समितीचे सचिव म्हणून सतीश सिन्नरकर यांनी काम पाहिले होते आणि अध्यक्ष पंड्या होते. ते वर्ष संपल्यानंतर काम बंद होणार होते; परंतु हे काम तसेच पुढे सुरू ठेवावे यासाठी वंदे मातरम् फाउण्डेशनची त्यांनी सुरुवात केली. वंदे मातरम् फाउण्डेशन(मुंबई)ची स्थापना या राष्ट्रव्यापी कार्याचा भाग म्हणून करण्यात आली. सुरुवातीला वंदे मातरम् गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले होते. आपल्या समाजाच्या उन्नतीकडे वाटचाल करण्याच्या हेतूने भारताला शोषण, गरिबी आणि निरक्षरता यापासून स्वतंत्र बनवण्याचे संस्थेचे ध्येय आहे.
वंदे मातरम् फाउण्डेशन गेली २१ वर्षे शिक्षण, क्रीडा, आरोग्य, बालिका सक्षमीकरण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आणि आपल्या समाजात मूल्य वाढवण्यासाठी काम करत आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित आणि पात्र घटकांना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नती प्रदान करणे आणि प्रोत्साहन देणे तसेच आपल्या समाजातील तरुणांना आपल्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करण्यासाठी जोडणे हे उद्दिष्ट आहे. शाश्वत कार्यक्रम राबविणे जे युवकांना शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राच्या सुधारणेसाठी पावले उचलण्यासाठी आणि सामाजिक आणि सांस्कृतिक समस्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी गुंतवून ठेवतील ही दृष्टी डोळ्यांसमोर ठेवून फाउण्डेशनचे काम चालते. २००३ पासून हे एनजीओ म्हणून कार्यरत नोंदणीकृत सार्वजनिक ट्रस्ट करण्यात आले.
महापालिकेच्या शाळांमधील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षकांमार्फत संगणकाचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे असे सिन्नरकर सांगतात. मालाड पश्चिमेतील तीन शाळांमध्ये प्राथमिक सेटअप केले जात आहेत. या उपक्रमामुळे २५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. वंदे मातरम फाउण्डेशनने मुंबईतील अनेक महापालिका शाळा दत्तक घेतल्या आहेत. संस्कार शिबीर या शाळांमध्ये प्रत्येक उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीत व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे आयोजित केली जातात. या शिबिरांमध्ये इयत्ता ५ वी, ६ वी आणि ७ वीचे विद्यार्थी सहभागी होतात. शिबिरांचे आयोजन आणि व्यवस्थापन तरुण स्वयंसेवक करतात. विद्यार्थ्यांसाठी संगीत, कला, सामाजिक आणि नागरी जबाबदाऱ्या, देशभक्ती अशा विविध विषयांच्या कार्यशाळा घेतल्या जातात.
आणखी एक महत्त्वाचे कार्य वंदे मातरम् फाउण्डेशनतर्फे चालते, ते म्हणजे शहरी बेघर किंवा निराधारांसाठी केंद्र सरकारची एक योजना आली होती. त्याला अनुसरून माटुंगा लेबर कॅम्प भागामध्ये महानगरपालिकेकडून मिळालेल्या जागेवर गेल्या ६ वर्षांपासून एक निवारागृह संस्थेतर्फे चालवले जाते. या ठिकाणी सर्वांना निशुल्क प्रवेश दिला जातो. ज्यांना मुंबईमध्ये राहायची कुठेच सोय नसते, त्यांच्यासाठी तात्पुरता निवारा याठिकाणी उपलब्ध करून दिला जातो. मुंबईत औषधोपचारासाठी काही गरीब येतात किंवा एखाद दोन दिवसांसाठी काही परीक्षा देण्यासाठी, इंटरव्ह्यूसाठी गरीब विद्यार्थी येतात किंवा एखादा निराधार वृद्ध असतो, अशांची तात्पुरती राहण्याची सोय इथे केली जाते. राहण्याबरोबरच त्यातल्या गरजूंना नाश्ता, जेवणही उपलब्ध करून दिले जाते. अशा केंद्रांची माहिती मिळावी यासाठी मुंबईतल्या सर्व उपनगरी रेल्वे स्थानकांवर अशा निवारागृहांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक लिहिलेले आहेत. त्यांनी फोन केल्यावर जागा उपलब्ध असेल, तर त्यांना इथे राहण्याची सोय केली जाते. कमीत कमी २० आणि जास्तीत जास्त ५० व्यक्ती एकाच वेळी या ठिकाणी राहू शकतात, अशी सोय आहे.
गरीब घरातल्या मुलींसाठी ‘कन्या योजना’ संस्थेतर्फे चालवली जाते. यामध्ये अगदी जन्माला आल्यापासून अठरा वर्षांपर्यंतच्या गरीब मुली आढळल्या तर त्यांचे शिक्षण, आरोग्य या सर्वांचा खर्च संस्थेतर्फे केला जातो. अशा प्रकारे दरवर्षी साधारण आठ ते दहा मुलींचा खर्च संस्था करत असते.
वंदे मातरम् फाउण्डेशनची सुरुवातच मुख्यत्वे सांस्कृतिक, सामाजिक काम करण्यासाठी झाली आहे. सांस्कृतिक कार्य बोरिवली ते अंधेरी या भागात संस्थेतर्फे मोठ्या प्रमाणावर केले जाते. २००८ पासून दरवर्षी एक दिवसाची रामलीला आयोजित केली जाते. स्थानिक कलाकारांना घेऊन रिहर्सल, त्यांची वेशभूषा, हातातली शस्त्र हे सर्व तयार करून संपूर्ण रामलीला सादर केली जाते. याला सात ते आठ हजार लोक उपस्थित असतात. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद रामलीलेला मिळतो. या माध्यमातून अनेक स्थानिक कलाकार तयार होतात. या मुलांना रामायण थोडे फार माहीत असते पण रामायणातील इतक्या अनेक घडामोडी त्यांना नाटकात काम करायला आल्यामुळेच शिकायला मिळतात आणि हा देखील त्यामागचा एक हेतू साध्य होत असतो. रामलीलामध्ये राम जन्मापासून रावण वधापर्यंतच्या सर्व कथा मांडल्या जातात आणि शेवट रावणाच्या प्रतिमेचे दहनही केले जाते. जानेवारीमध्ये अयोध्येला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळी देखील दोन ठिकाणी असे कार्यक्रम घेण्यात आले होते. त्याशिवाय बीकेसीला एक आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव झाला होता त्यातही संस्थेन सहभाग घेतला होता.
त्यानंतर संस्थेतर्फे भारतरत्न बिस्मिल्ला खान यांचेही दोन शहनाई वादनाचे मोठे कार्यक्रम नेहरू सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले होते आणि बिस्मिल्ला खान यांना थोडी आर्थिक मदतही करण्यात आली होती.
वंदे मातरम् फाउण्डेशनची आणखी एक मोठी बाजू ती म्हणजे प्रकाशन. आतापर्यंत मराठी, हिंदी, गुजराती या भाषेतील अनेक पुस्तकांचे प्रकाशन वंदे मातरम् फाउण्डेशनतर्फे करण्यात आले आहे. यामध्ये आनंद मठ ही बंगाली कादंबरी आहे. त्याचे हिंदी, गुजराती आणि मराठीमध्ये भाषांतर संस्थेतर्फे करण्यात आले. ज्ञानेश्वरीची शिकवण असे १००० पानी पुस्तक, गीतार्थ कोष अस भगवद्गीतेवर पुस्तक, तसेच गीतार्थ व्याकरण दर्शन अशी पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. राष्ट्रीय विचार दर्शवणारी तसेच इतर कोणीही सामान्यतः प्रकाशित करत नाही अशी पुस्तक प्रकाशित केली जातात.
थोडक्यात वंदे मातरम् गीताला १२५ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने २००० साली देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. वर्षभराने ती समिती बरखास्त झाली; परंतु त्यानिमित्ताने एकत्र आलेल्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी हे काम सुरू ठेवण्यासाठी वंदे मातरम् फाउण्डेशनची स्थापना केली आणि राष्ट्रीय विचार रुजवण्याचे काम सुरू ठेवले आहे.
joshishibani@yahoo. com