भिवंडी : भिवंडी महापालिकेत प्रभाग समिती क्र.४ मधील केबिन क्र.९ ब मध्ये स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रल्हाद मानकर हे वार्डात मनमानी कारभार करत असून त्यांनी त्यांच्या केबिन मधील सुमारे १० ते १२ सफाई कर्मचाऱ्यांना हप्त्यावर ठेवले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांकडून हप्त्यापोटी दरमहा ५ ते १० हजार रुपये हप्ता घेत आहेत. ज्या सफाई कर्मचाऱ्यांना हप्त्यावर ठेवले असून त्यांच्या अतिरिक्त कामांचा ताण इतर व नियमित कामावर हजर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांवर वाढला आहे. त्यामुळे मनपा सफाई कर्मचाऱ्यांमध्ये स्वच्छता निरीक्षक मानकर यांच्या विषयी तीव्र संताप व्यक्त होत असून मानकर यांच्या हप्तेखोरीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष साळवी यांनी मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मनसेच्या या लेखी मागणी नंतर भिवंडी महापालिकेतील हप्ताखोरी प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
मागील ७ ते ८ वर्षांपासून प्रल्हाद मानकर हे प्रभाग क्र.४ मधील केबिन क्र.९ ब मध्ये एकाच ठिकणी कार्यरत असल्याने या वार्डातील राजकीय व्यक्तींची खासगी कामे देखील मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून करवून घेत असतात. या राजकीय पुढाऱ्यांच्या खासगी कामांमुळे या वार्डातील सफाई कर्मचारी त्रस्त झाले असून मानकर केवळ या राजकीय पुढाऱ्यांची मर्जी संपादन करण्यासाठी व राजकीय आशीर्वादासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरत असून कर्मचाऱ्यांवर त्यांची दादागिरी वाढली असल्याचेही साळवी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
त्यांच्या या मनमानी कामामुळे या वार्डात काम करणारे कर्मचारी मानसिक तणावात आले असून त्यांचे हप्तेखोरीचे धंदे त्वरित बंद करण्यात यावे यासाठी त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी मनवि सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष साळवी यांनी मनपा आयुक्त अजय वैद्य यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मनपा प्रशासनाकडे आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील साळवी यांनी आपल्या निवेदनात आयुक्तांना दिला आहे.