यंदाच्या मराठी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांची निवड केली जाणे हे मराठी भाषेच्या दृष्टीने गौरवास्पद आहेच. पण तमाम मराठी लोकांच्या दृष्टीने ती एक अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. तारा भवाळकर या लोकसंस्कृतीच्या गाढ्या अभ्यासक म्हणून ख्यातनाम आहेत. तसेच त्या लोककलांच्या अभ्यासासाठीही ओळखल्या जातात. तारा भवाळकर यांनी अनेक वर्षे पुण्यातील ललित कला अकादमीत काम केले आहे, तसेच मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीमध्ये प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पण यापेक्षाही त्यांची जास्त ओळख आहे ती म्हणजे लोकसंस्कृतीच्या अभ्यासक म्हणून आणि त्यांच्या सम्मेलन अध्यक्षपदी निवडीने खऱ्या अर्थाने मराठी लोकसंस्कृतीचा गौरव झाला आहे, असे म्हणायला हवे. लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोककला या विषयांवर त्यांचं गाढं लेखन आहे आणि त्यांना यासाठी वेळोवेळी पुरस्कारही मिळाले आहेत. दुर्गा भागवत मराठी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्ष असताना मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचे झालेले वाद गाजले होते. दुर्गा भागवत यांच्या तोडीच्या तारा भवाळकर आहेत हे म्हणणे अनाठायी होणार नाही. त्या भागवत यांच्यासारख्या कडव्या विद्रोही नसतील, पण त्यांच्यातही तीच प्रवृती आहे ती सत्ताधीशांपुढे न झुकण्याची आणि आज त्याचीच गरज आहे.
मराठी ज्ञानकोश, मराठी विश्वकोष यांच्यासाठीही त्यांचे योगदान मोठे आहे.यंदाचे साहित्य सम्मेलन हे दिल्लीत होत आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ते प्रथमच दिल्लीत होत आहे हेही कमी महत्त्वाचे नाही. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देतानाच आता मराठी साहित्य सम्मेलन दिल्लीत होत आहे ही निश्चितच मराठी नागरिकांसाठी गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. १९७० ते १९९९ पर्यंत सांगलीच्या चंपाबेन वालचंद शहा यांच्या महाविद्यालयात प्राध्यापिका राहिलेल्या या लेखिकेने आपल्या अजस्त्र कार्याच्या बळावर ही एवढी मोठी झेप घेतली हे निश्चितच प्रत्येक मराठी भाषाभिमानासाठी ऊर भरून येणारी गोष्ट आहे. तारा भवाळकर यांचा दृष्टिकोन हा मुख्यतः स्त्रीवादी आहे आणि स्त्री मुक्ती चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन असे विषय त्यांनी हाताळले. तारा भवाळकर यांचे अलीकडचे पुस्तक म्हणजे सीतायन यातून त्यांनी सीतेच्या वेदना विशेषत्वाने साहित्यातून मांडल्या आहेत आणि अशा लेखिकेची साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवड व्हावी हे मराठी भाषिकाचा ऊर अभिमानाने भरून यावा असे आहे.
आज प्रत्येकच जण स्वतःला स्त्रीवादी म्हणवतो. पण प्रत्यक्षात त्याच्या जीवनात तो स्वतःच्या स्त्रीशी असेच वागतो असे नाही. अगदी रामांनीही सीतेशी वर्तन अशाच प्रकारे केले होते आणि एका परिटाने सीतेच्या चारित्र्याचा संशय घेतला म्हणून रामांनी तिचा त्याग केला होता. ती सीतेची वेदना आणि विद्रोह भवाळकर यांनी उत्तमरीत्या आपल्या पुस्तकात मांडला आहे. त्यांनी नाट्य चळवळीतही तितकेच मोलाचे योगदान दिले आहे आणि त्यांनीच सांगलीत प्रायोगिक नाट्यसंस्थाही सुरू केली. तारा भवाळकर यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि त्यापैकी काही महत्त्वाची म्हणजे माझिया जातीच्या, तिसऱ्या बिंदूच्या शोधात अशा कित्येकांची नावे यादीत समाविष्ट आहेत. तारा भवाळकर यांनी आपली साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जे उद्गार काढले ते चिंत्य आहेत. त्या म्हणतात की, माझ्या आजवरच्या कार्याचे फलित म्हणूनच मला हा साहित्य सन्मान मिळाला आहे. मराठी वाड्.मय सोहळ्यात मराठी साहित्य सम्मेलन हा महत्त्वाचा सोहळा असतो. अशा सम्मेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मला आयुष्याच्या उत्तरार्धात मिळाला ही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. जात्यावर दळण दळणाऱ्या स्त्रियांपासून ते असंख्य मराठी गृहिणींच्या व्यथा-वेदनांना आपल्या साहित्यातून वाट दाखवणाऱ्या आणि त्यातून मार्ग शोधणाऱ्या तारा भवाळकर यांना हा सन्मान मिळाला ही खरोखरच त्यांच्यासाठी नव्हे तर प्रत्येक लोकसाहित्याच्या अभ्यासकांसाठीही गौरवाची बाब आहे.
मराठी साहित्यात स्त्रीवादी साहित्य कधीपासून लिहू जाऊ लागले ही कहाणी फार जुनी नाही. १९६० नंतरच्या दशकात त्याची सुरुवात झाली. यथावकाश स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह कथा-कादंबऱ्या, कविता या चारही अंगांनी विकसित होत गेला. याच मालिकेतील एक साहित्यिका म्हणजे तारा भवाळकर यांचे नाव घ्यावे लागेल. स्त्रीवादी साहित्य यातून स्त्रीच्या असण्याचे आणि तिच्या जगण्याच्या अर्थाचे मोल समजून घेऊन तो प्रवाह रूपांतरित करण्यात मोजक्या स्त्रीवादी लेखिका आघाडीवर होत्या त्यात तारा भवाळकर यांचे नाव घ्यावे लागेल. अगदी महदंबा, ताराबाई शिंदे यांच्यापासून ते आजच्या असंख्य लेखिकांच्या परंपरेपर्यंत जाऊन हा प्रवाह पोहोचतो. दुर्गा भागवत या अशाच स्त्रीवादी साहित्यिका. त्यांना पारंपरिक अर्थाने स्त्रीवादी म्हणता येणार नाही पण त्यांची जातकुळी तीच होती. तसेच सरोजिनी पंडित यांच्याबाबतीत म्हणता येईल. स्त्री शोषणाचे विश्लेषण करणारी मांडणी अनेक लेखिकांनी केली आणि त्यात तारा भवाळकर या आघाडीवर होत्या. पूर्वीच्या लेखिकांच्या मालिकेतील पुढचे नाव म्हणून त्यांचे नाव घेता येईल. या लेखिकांनी पुरुषवादी दृष्टिकोनावर प्रहार केले आहेत आणि ते केवळ आपले महत्त्व वाढावे यासाठी नाहीत तर पुरुषांना त्यांचा दृष्टिकोन किती संकुचित आहे हे पटावे यासाठी हे आहे. स्त्रियांच्या प्रश्नांचे किरकोळ महत्त्व आणि आज करिअर करायचे असेल, तर पुरुषाला महत्त्व दिले जाते आणि स्त्रीलाच किती प्रकाराने बलिदान दिले जाते ही शहरी स्त्रियांची व्यथा जी आहे तीच ग्रामीण स्त्रियांची आहे. तीच तारा भवाळकर यांनी शब्दबद्ध केली आहे. स्त्रीवादी मराठी साहित्याचा गौरव तारा भवाळकर यांच्या निवडीने झाला आहे, असे म्हणता येईल. कारण त्यांच्या साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवडीने ग्रामीण भागातील लोकसाहित्याच्या अभ्यासक स्त्रीचा गौरव होणार आहे. पुरुषवादी करिअर चौकटीत अडकलेल्या साहित्याला मोकळा श्वास घेता येणार आहे. हेच तारा भवाळकर यांच्या निवडीचे यश आहे.