नागपूर : जनतेचा कौल नाकारून आपण सत्ता स्थापन केली. मग तशीच खेळी खेळून त्यांनी आपल्यावर मात केली. आता त्यांना कार्यकर्त्यांच्या बळावर धडा शिकवायचा आहे. पण सत्ता आल्यावर या कार्यकर्त्यांना विसरू नका. तेव्हा भाऊ, बहीण, बायको-मुलांना पुढे करू नका, याने काँग्रेसचेच नुकसान होईल, असा घरचा आहेर देत काँग्रेसचे उत्तर प्रदेश येथील अमेठीचे खासदार किशोरीलाल शर्मा (Kishorilal Sharma) यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिका-यांचे कान टोचले. यावेळी उपस्थित पदाधिका-यांनीही आपल्या नेत्यांच्या घराणेशाहीवर टीका केली.
डॉ. झाकीर हुसैन विचार मंचातर्फे काँग्रेसच्या नवनियुक्त खासदारांचा आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शर्मा बोलत होते.
स्मृती इराणी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचा २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. या निवडणुकीसंदर्भात किशोरीलाल शर्मा यांनी सांगितले की, निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे नव्हती. त्यावेळी मी रायबरेलीमध्ये होतो. मात्र, पराभवानंतरही अमेठी लोकसभेचे परिक्षण केले असता राहूल गांधी यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसचे व्यवस्थापन कमी पडल्याचेही त्यांनी मान्य केले.
किशोरी लाल शर्मा मूळचे पंजाबच्या लुधियानाचे असून, गांधी घराण्याचे जवळचे सहकारी असल्याचे सांगितले जाते. ते १९८३ मध्ये काँग्रेस कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा अमेठीत आले होते. तेव्हापासून ते माजी पंतप्रधान (दिवंगत) राजीव गांधी यांच्याशी जवळून संबंधित होते आणि अमेठीमध्ये राहिले. जिथे त्यांनी काँग्रेससाठी काम केले. १९९९ मध्ये सोनिया गांधींच्या पहिल्या निवडणूक विजयात नव्याने उतरलेल्या अमेठी उमेदवाराने महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्याद्वारे त्यांनी अमेठीमध्ये विजय मिळवून पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला होता. यंदा त्यांनी स्मृती इराणी यांचा अमेठी येथे पराभव केला.
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत हरल्यामुळे बिथरलेले आमदार विकास ठाकरे म्हणाले की, काँग्रेसचे शहरातील मोठे नेते लोकसभेत नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लढायला तयार नव्हते. पक्षाचा आदेश आला, मी लढलो, कार्यकर्ते राबले, नेत्यांनीही समर्थन दिले. पण काही नेते गडकरी यांच्या फोनमुळे दबले होते. कोण भाजपाच्या संपर्कात होते मला सगळे माहिती आहे, या सगळ्या गद्दारांची यादी माझ्याकडे आहे, असे सूचक वक्तव्य करीत आमदार विकास ठाकरे यांनी येत्या विधानसभेत बंडखोरी किंवा गद्दारी केल्यास याद राखा, अशी ताकीद दिली. आगामी विधानसभेच्या तोंडावर विकास ठाकरे यांच्या या विधानाने कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
यावेळी मंचावर अमेठीचे खासदार किशोरलाल शर्मा यांच्यासह मनोज त्यागी, उत्तर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक सिंह ठाकूर, माजी खासदार अविनाश पांडे, रामटेकचे खासदार श्याम बर्वे, प्रफुल्ल गुडधे पाटील, कार्यक्रमाचे आयोजक हैदर अली दोसानी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ठाकरे म्हणाले, ‘आता कार्यकर्त्यांचे चांगले दिवस येणार आहेत, यंदा पक्ष सर्वेक्षण करून तिकीट वाटप करणार आहेत. तिकीट कुणालाही मिळो मात्र एकजुटीने काम करायचे आहे हे लक्षात ठेवा. यंदा शहरातील सहा पैकी सहा जागा काँग्रेसला जिंकायच्या आहेत.’ यावेळी श्याम बर्वे, दीपक ठाकूर, मनोज त्यागी आदींनी सुद्धा विचार व्यक्त केले.