चित्रपट होता ४५ वर्षांपूर्वी आलेला ‘सिहांसन.’ निर्माते डी. व्ही. राव आणि प्रसिद्ध सिने दिग्दर्शक जब्बार पटेल! अरुण साधू या ज्येष्ठ पत्रकाराच्या ‘मुंबई दिनांक’ आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यांवर हा चित्रपट बेतला होता. खुद्द अरुण साधूनीच सुचवल्यामुळे पटकथा आणि संवाद विजय तेंडुलकर यांनी लिहिले.
त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शरद पवार होते. पटेलांनी त्यांच्याकडे थोडी वेगळीच मागणी केली. चित्रीकरणासाठी मंत्रालय आणि मंत्र्याचे बंगले मागितले. तो काळ वेगळा होता. शरद पवारही पठडीबाहेरचे नेते असल्याने त्यांनी जब्बार पटेलांना मंत्रालयही दिले आणि (त्यावेळचे) मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानही दिले. याशिवाय त्यांचे सहकारी सुशीलकुमार शिंदे आणि हशू अडवानी यांनी आपापले बंगलेही दिले.
सिंहासनमधील मुख्यमंत्र्यांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे वठवणारे स्व. अरुण सरनाईक आज हयात असते, तर त्यांनी परवा ४ ऑक्टोबरला ८९वा वाढदिवस साजरा केला असता! या मराठी स्टार अभिनेत्याने सिंहासनचे मानधन केवळ १ रुपया घेतले होते. सिनेमातील छोट्याशा भूमिकेसाठी नाना पाटेकर यांचे मानधन होते ३००० रुपये. चित्रपटाने अजून एक रेकॉर्ड केले ते म्हणजे त्यांचे संकलन केवळ एक दिवसात पूर्ण झाले. संपूर्ण चित्रपटाचा एकूण खर्च होता ४ लाख रुपये!
चित्रपटात मराठी नाट्य-चित्र क्षेत्रातील सगळे चमचमते तारकामंडळच जमा झाले होते. स्व. अरुण सरनाईक, निळू फुले, स्व. रवी पटवर्धन, मधुकर तोरडमल, उषा नाडकर्णी, मोहन आगाशे, दत्ता भट, रीमा लागू, श्रीराम लागू, सतीश दुभाषी, श्रीकांत मोघे, जयराम हर्डीकर आणि नाना पाटेकर. संगीत होते पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे आणि गीतकार होते सुरेश भट! मग काय सगळेच जुळून आले होते. त्यामुळे चित्रपट केवळ अविस्मरणीय ठरला. त्याला २७ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. आजही ‘सिंहासन’सारखा चित्रपट पुन्हा मराठीत झाला नाही असेच म्हणावे लागते.
चित्रपटातील सुरेश भटांनी लिहिलेली गाणी एकापेक्षा एक सरस होती. त्यांचे “उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली” हे गाणे तर त्यावेळचा कोणताही प्रेक्षक आयुष्यभर विसरणार नाही. काही कवींची त्यांच्या वाचकांवर/श्रोत्यांवर इतकी पकड असते की, त्यांनी काहीही केले तरी वाचक त्यांच्यावर फिदाच असतात. अर्थात हे सहजसाध्य मुळीच नसते. त्यासाठी भाषेचा, तिच्या शब्दभांडारातील सर्व शब्दांच्या अर्थ-आशयाच्या सूक्ष्म छटांचा, त्या भाषिक समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक जडणघडणीचा सखोल अभ्यास हवा.
स्व. सुरेश भट असेच एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी चक्क स्मगलर टोळीतील गुंडाच्या पत्नीचे दु:ख मांडणारे गाणे लिहिले, अत्यंत तरल अशा अभिजात भाषेत! त्यालाही प्रचंड लोकप्रियता लाभली. लतादीदींनी गायलेले हे गाणे खरे, तर सुरेश भटांच्या लेखणीतून उतरलेली एक अत्यंत मुग्ध, भावमधुर कविताच आहे. जब्बार पटेलांनी ती वापरलीही एका अगदी वेगळ्या प्रसंगासाठी!
साधूंच्या कादंबरीत दयानंद पानीटकर नावाचा स्मगलर टोळीचा सदस्य सतत बोटीवर किंवा रात्री माल उतरवून घेण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर असतो. तो मुळात एक सज्जन कामगार होता; परंतु मिलच्या युनियनचा छोटा नेता असल्याने त्याला संपात नोकरी गमवावी लागते. त्यामुळे या ‘धंद्यात’ पडलेल्या दयानंदची पत्नी एकटेपणाचे दु:ख भोगत असते. तिने खूप आर्जव केल्यावर एका रात्री दयानंद लवकर घरी येतो. त्यावेळी त्यांच्या कधीनवत फुलू लागलेल्या शृंगाराच्या पार्श्वभूमीवर जब्बार पटेलांनी हे गाणे चित्रित केले आहे.
‘मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग,
राजसा किती दिसात, लाभला
निवांत संग…’
सुरेश भट या गाण्यातून श्रोत्याला एक अलौकिक अनुभव देतात. पतीच्या प्रेमासाठी आणि सहवासासाठी आसुसलेली प्रिया खूप हळवी झालेली आहे. तिला मिलनाच्या क्षणीही आश्वस्त वाटत नाही. मोठ्या नवसायासाने साध्या झालेली ही सुखद जवळीकसुद्धा किती वेळ टिकेल याची शाश्वती तिला वाटत नाही. म्हणून जणू तिच्या वतीने गाण्याचे शब्द येतात-
‘त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात,
हाय तू करू नकोस, एवढ्यात स्वप्नभंग.
राजसा किती दिसात, लाभला
निवांत संग…’
थोडा धीर आल्यावर ती स्वत:च जणू पतीला विनवताना म्हणते-
‘गार गार या हवेत घेऊनी मला कवेत,
मोकळे करून टाक एकवार अंतरंग…’
जेव्हा ती म्हणते ‘मोकळे करून टाक एकवार अंतरंग’ तेव्हा आपल्याला तिच्या मनातील प्रणयाच्या तहानेची खोली कळते. कारणही तसेच आहे, तिला पतीचा व्यवसायही माहीत नाही. तो रात्ररात्र का घरी येत नाही, हे ही तिच्यासाठी एक गूढच आहे. ती बिचारी रोजच त्याची वाट पाहत कुढत असते.
आज तो दुर्मीळ योग आल्यावर त्यांच्या जवळीकतेचे क्षण पडद्यावर दिसत असताना सुरेशजींचे हे गाणे मात्र आपल्याला दूर कुठेतरी जी. ए. कुलकर्णींसारख्या गूढ प्रदेशातच घेऊन जाते. नकळत श्रोत्यालाही चांदण्यात नहात बसलेल्या पहाट नावाच्या सुंदरीचे दर्शन होते. इतके सामर्थ्य सुरेश भटांच्या लेखणीत होते-
‘दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग’
पुढच्या ओळी तर अतिशय हळव्या, आर्जवी स्वरात एकालेपणाचे कोणत्याही विरहिणीचे अव्यक्त दु:ख सांगतात-
‘हे तुला कसे कळेल? कोण एकटे जळेल?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग?
कितीतरी मोठ्या विरहानंतर मिळालेले सुख अनुभवताना ती हळवी झाली आहे, अतिशय हळुवारपणे ती आपला आनंद व्यक्त करते. तेव्हाही तिला त्या वातावरणाची लय बिघडू नये अशी चिंता सतावते. ‘कुणी थोडे जरी मोठ्याने बोलून या क्षणाचा आनंद व्यक्त केला तरी या कशाबशा जमून आलेल्या चांदण्यावर तरंग उठून ते विस्कळीत होईल, अशी तिला भीती आहे-
काय हा तुझाच श्वास? दर्वळे इथे सुवास.
बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग!
राजसा किती दिसात लाभला निवांत संग…’
दीर्घ दुराव्यामुळे प्रेयसी किती हळवी झाली आहे ते या ओळी प्रेक्षकांच्या मनावर ठसवून जातात. प्रेक्षकाला हुरहूर लावतात, अस्वस्थ करतात. खरे सांगायचे म्हणजे पूर्ण सुरेश भट हीच एक सतत सजणारी तरल, हळव्या शब्दांची, मैफलच होती. त्यात असे हे विरहिणी-वजा-मिलनगीत काहीतरी वेगळेच मिश्रण बनून समोर येते तेव्हा मराठी भाषेचा, अशा सिद्धहस्त मराठी कवींचा अभिमान मनात दाटून येतो आणि ज्ञानदेवांच्या ‘अमृताशी पैजा’ जिंकणाऱ्या या आपल्या मायबोलीची आजची अवस्था पाहून दु:खही वाटत राहते.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…