मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून वाशिममध्ये २३,३०० कोटी तर ठाण्यात सुमारे ३२,८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
पंतप्रधान सकाळी ११.१५ वाजता वाशिममधील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील आणि संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवर श्रद्धांजली वाहतील. वाशिममध्ये पंतप्रधान २३,३०० कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील.
या योजनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता वितरित केला जाणार असून, यामुळे सुमारे ९.४ कोटी शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे १,९२० कोटी रुपयांचे ७,५०० हून अधिक प्रकल्प समर्पित करतील. तसेच, 9,200 शेतकरी उत्पादक संघटनांचे राष्ट्रार्पण करतील. तसेच, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या ‘बंजारा विरासत संग्रहालयाचे’ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
दुपारी ४ वाजता, पंतप्रधान ठाणे येथे सुमारे ३२,८०० कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये मुंबई मेट्रो लाईन ३ फेज १ च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. हा प्रकल्प मुंबईतील शहरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी होईल. ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचा पायाभरणी समारंभही पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे.
‘नैना’ प्रकल्पातील अडीच हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन
नवी मुंबईत ‘नैना’ प्रकल्प जाहीर झाल्यापासून गेल्या ११ वर्षात प्रथमच सुमारे २,५०० कोटींची विविध पायाभूत सुविधांची कामे सिडकोने हाती घेतली आहेत. उद्या (ता.५) ठाणे येथे नियोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कामांचे भूमिपूजन होणार आहे.
शनिवारच्या भूमिपूजनानंतर टीपीएस २ ते ७ यामधील ३० मीटर रुंदीचे ०.६ किलोमीटर, ४५ मीटर रुंदीचे १३.२८ किलोमीटर लांबीचे आणि ६५ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे ३.७१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामासोबत नैना प्राधिकरण उड्डाणपूल, वेगवेगळे लहान १२ पूल, २६ ठिकाणी पादचाऱ्यांसाठी अंतर्गत मार्ग, वाहनांसाठी लहान अंडरपासपूल बांधण्यात येणार आहेत. तसेच टीपीएस २ ते ७ या दरम्यान २६.६६ किलोमीटर अंतरावर पावसाळी नाल्यांसाठी गटार आणि युटीलीटी ट्रॅंच (विविध वाहिन्यांसाठी मोकळी व्यवस्था) बांधण्यात येणार आहे.
टीपीएस २ ते ७ येथील रहिवाशांसाठी पाणी पुरवठा होण्यासाठी ३२.९३ किलोमीटर क्षेत्रावर पाणी वितरण जाळे विविध जलवाहिनीचे तयार करण्यात येणार आहे. तसेच या परिसरात २५.७६८ किलोमीटर क्षेत्रावर मलनिसारण वाहिनी भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
याची तयारी सिडकोने केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होताच नैना प्रकल्प परिसरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. गेल्या अनेक वर्षांपासून नैना प्रकल्पात पायाभूत सुविधांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे सिडको मंडळ आणि नैना प्राधिकरणाविरोधात नागरिकांमध्ये रोष आहे.
दरम्यान, नैना प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांकडून कोणतेही भूसंपादन न करता या शेतजमिनीवर सिडकोने नैना प्रकल्पाची रचना केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतेच सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना लेखी पत्र दिले. नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे ४० टक्के भूखंडाचा ताबा सिमांकन करुन निश्चित करुन द्या, त्यानंतर कामे सुरु करा. अन्यथा कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. माजी आमदार बाळाराम पाटील यांनीही ४० टक्के भूखंडाचा प्रस्ताव अमान्य असल्याचे सांगत युडीसीपीआर कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना स्वत:च्या जमिनीचा स्वत: विकास करण्यास हक्क आहे तो द्यावा, नैना प्रकल्प येथून रद्द करावा, अशी भूमिका घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सशक्तीकरण अभियानासाठी आज ठाण्यात
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या भव्यदिव्य सोहळ्याच्या निमित्ताने ठाणे शहराजवळील कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे ५ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासनाकडून जय्यत तयारीही केली जात आहे. या कार्यक्रमाला ४० हजार नागरिकांची उपस्थिती राहणार असून, तब्बल १२०० वाहनांचे पार्किंग, हेलिपॅड व सभास्थळाच्या आढाव्यासाठी प्रशासनाच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे या भागात रस्ते वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता आहे.
दुपारी ४ च्या सुमारास ते ठाण्यातील ३२,८०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर संध्याकाळी ६ च्या सुमारास बीकेसी आणि आरे जेव्हीएलआरदरम्यानच्या मेट्रो लाइन-३ च्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी ते बीकेसी मेट्रो स्टेशनकडे प्रयाण करतील. मेट्रो ३ च्या १० स्थानकांपैकी नऊ भूमिगत आहेत. १४,१२० कोटी रुपयांचा मेट्रो मार्ग मुंबई शहर आणि उपनगरांना जोडेल. पूर्णतः कार्यान्वित असलेली लाइन ३ दररोज जवळपास १२ लाख प्रवाशांची वाहतूक करू शकते. ठाण्यात, पंतप्रधान मोदी सुमारे १२,२०० कोटी रुपयांच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २० उन्नत आणि दोन भूमिगत स्थानकांचा समावेश आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे ठाण्याच्या वाढत्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण होतील आणि राज्यातील एक मोठे औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र होण्याचा मार्ग मोकळा होईल. ते ठाण्यातील छेडा नगर ते आनंदनगरपर्यंतच्या एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवेच्या विस्तारासाठी ३,३१० कोटी रुपयांची पायाभरणी करतील. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई आणि ठाणे दरम्यान सुरळीत कनेक्टिव्हिटी मिळेल. ते नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र फेज-१ ची पायाभरणी करतील, जो २,५५० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये प्रमुख धमनी रस्ते, पूल, उड्डाणपूल, अंडरपास आणि एकात्मिक उपयोगिता पायाभूत सुविधांचे बांधकाम समाविष्ट आहे. सुमारे ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या ठाणे महापालिकेच्या नवीन इमारतीची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार आहेत.
मुंबईकरांना मेट्रो ३चा दिलासा
‘मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा आरे ते बीकेसीपर्यत आहे. मुंबईतील संपूर्ण भूमिगत ही मेट्रो ३ असणार आहे, आरेपासून बीकेसीदरम्यान याचे 10 स्टेशन आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही लाईन सुरु होईल. काही डॉक्युमेंटेशन सुरु आहे, नवीन मेट्रोच्या दरदिवशी ९६ ट्रिप होणार आहेत. या लाईनवर एकूण ९ गाड्या सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत धावणार. यामध्ये ४८ ट्रेन कॅप्टन आहेत. त्यापैकी १० महिला आहेत. तिकीट दर पहिल्या टप्प्यासाठी कमीत कमी १० रुपये असणार आहे आणि जास्तीत जास्त ५० रुपये असेल. ट्रेनचे काम पूर्ण होईल, तेव्हा तिकीटचे दर जास्तीत जास्त ७० रुपये असेल.